मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आज पहाटेच्या सुमारास नरेंद्र मोदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे दाखल झाले.
वॉशिंग्टनला पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलं.
ते म्हणाले, "माझं अत्यंत उत्साहाने स्वागत केल्याबद्दल मी वॉशिंग्टन डीसीमधील सर्व भारतीय समाजाचा आभारी आहे. अनिवासी भारतीय नागरीक हे आपली ताकद आहेत. भारतीय नागरिकांनी जगभरात कसं स्वतःला प्रस्थापित केलं, ते कौतुकास्पद आहे."
आपल्या तीनदिवसीय दौऱ्यात नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांच्यासह क्वॉड समूहातील नेत्यांची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान या दौऱ्यात अमेरिकेतील सुप्रसिद्ध आणि दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखांचीही भेट घेतील.
अमेरिकेला रवाना होण्यापूर्वीही नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं होतं. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेला जात आहे, असं ते म्हणाले.
त्यांनी लिहिलं, "भारत आणि अमेरिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवरील रणनीतिक भागिदारी तसंच एकमेकांच्या हितांशी संबंधित क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करेन. आपल्या या दौऱ्यात उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांची भेट घेण्यासही मी उत्सुक आहे. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा केली जाईल."
पुढच्या एका ट्विटमध्ये त्यांनी लिहीलं, "मी राष्ट्राध्यक्ष बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांची वैयक्तिकरित्या पहिल्या क्वॉड बैठकीत सहभागी होईन. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात व्हर्चुअल शिखर संमेलन झालं होतं. त्याच्या परिणामांविषयी विचार-विमर्श करण्यात येईल. भारत-प्रशांत क्षेत्रातील आपला एकत्रित दृष्टिकोन भविष्यातील गतिविधींसाठी एक संधी प्राप्त करून देतो."
आज 5 दिग्गज कंपन्यांच्या CEO ना भेटणार
याठिकाणी नरेंद्र मोदी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या क्वॉड समूहातील देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेणार आहेत.
त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी या दौऱ्यात अमेरिकेतील दिग्गज कंपन्यांच्या प्रमुख व्यक्तींनाही भेटणार आहेत. यावेळी त्या उद्योजकांसाठी भारतातील संधी या विषयावर नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत.
गुरुवारी पंतप्रधान मोदी 5 अमेरिकन CEO सोबत बैठकीत सहभागी होतील.
यामध्ये दोन कंपन्यांचे CEO भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत.
एडोब कंपनीचे CEO शंतनू नारायण आणि जनरल अॅटोमिक्स कंपनीचे विवेक लाल हे भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक आहेत.
कोरोना काळात यावर्षी झालेल्या बांगलादेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेले आहेत.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले मोदी 26 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये परत येतील. नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यामध्ये 24 सप्टेंबर रोजी होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असेल.
अमेरिका दौरा कशासाठी?
राष्ट्रपती जो बायडन यांच्याबरोबर द्वीपक्षीय बैठक
जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांबरोबर क्वाड शिखर परिषदेत सहभाग
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण
विविध सरकारच्या नेत्यांनी सहभागी होण्याची क्वाडची ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या बैठकीकडे भारताचं लक्ष आहे.
जो बायडन यांनी जानेवारी महिन्यात पदग्रहण केल्यानंतर भारत आणि अमेरिकेतील ही पहिली द्वीपक्षीय शिखर परिषद आहे.
द्विपक्षीय बैठकीचा मुख्य अजेंडा काय आहे?
दोन्ही नेत्यांमध्ये द्वीपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दोन्ही नेते बहुआयामी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील असं परराष्ट्र सचिन हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितलं.
दोन्ही पक्ष द्वीपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणं, संरक्षण आणि संरक्षण सहकार्य बळकट करणं, नव्या आणि विकसनशील तंत्रज्ञानाचा विकास व अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी 24 सप्टेंबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये भेट होईल असं श्रृंगला यांनी स्पष्ट केलं.
या 50 मिनिटांच्या बैठकीत अफगाणिस्तानचा मुद्दा प्रामुख्याने येईल अशी शक्यता आहे. हर्ष श्रृंगला भारतीय शिष्टमंडळात सहभागी झाले आहेत. अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेते बोलतील असं ते म्हणाले.
क्वाडवर चीनचे आरोप
याआधी चीनने ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत आणि जपानच्या 'क्वाड' संघटनेला आशियाई देशांची 'नाटो संघटना' म्हणत टीका केली होती.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी 13 मे 2021 रोजी एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, "आपण सगळेच जाणतो की, 'क्वाड' कशा पद्धतीचा गट आहे. एक वेगळा गट बनवण्याच्या, चीनला आव्हान देण्याच्या, शेजारी देशांसोबत चीनचं भांडण लावण्याच्या प्रयत्नांचा चीन विरोध करत आहे."
आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात हुआ चुनयिंग यांनी म्हटलं की, "जिथवर क्वाडचा प्रश्न आहे, मला वाटतं की, भारत या प्रकारच्या तंत्राचा हेतू अधिक चांगलं जाणतो. चीनविरोधात छोटे छोटे गट तयार करण्याचा याचा हेतू नाहीय?"
याचप्रकारे चीन वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी क्वाड संघटनेवर टीका करत आलंय.
एस. जयशंकर काय म्हणाले?
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, या पत्रकार परिषदेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी चीनने 'क्वाड' संघटनेबाबत केलेलं वक्तव्य फेटाळलं.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला उत्तर देताना म्हटलं की, वास्तवाला चुकीच्या पद्धतीने सादर केलं जाऊ नये, हे महत्त्वाचं आहे आणि क्वाड संघटना देशासह जगाच्या कल्याणासाठी काम करणारं व्यासपीठ आहे.
ते पुढे म्हणाले, "मला वाटतं नाटो हा शीतयुद्धाशी जोडलेला शब्द आहे आणि त्यातून इतिहासात डोकावता येतं. क्वाड हा भविष्याकडे झेपावते आणि जागतिकिकरणाशी प्रतिबिंबित करतं. विविध देशांनी एकत्र येत काम करण्याची आवश्यकता क्वाड प्रकट करतं."
त्याचसोबत, एस. जयशंकर यांनी म्हटलं की, क्वाड लस, लशींचा पुरवठा आणि शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर आधारित होती.
क्वाडची नाटोशी तुलना केल्याबाबत एस. जयशंकर म्हणाले, "क्वाडसारखी संघटना आणि नाटो किंवा तत्सम संघटनांमध्ये मला कुठलाच संबंध दिसत नाही. त्यामुळे मला वाटतं की, वास्तवाला चुकीच्या पद्धतीने सादर केलं जाऊ नये."