Thursday, September 9, 2021

मुंबईत १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी घेतले निर्णय

 मुंबई - मुंबईत गणेशोत्सवादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत मुंबईत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश मुंबई पोलिसांनी यांनी जारी केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणार नाहीत असे आदेश लागू केले आहेत.

यासंदर्भातील सूचना मुंबई पोलीस आयुक्तलयाकडून जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळातील संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपात दर्शन घेण्यास बंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह अन्य शहरांत दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या वर्षीही सणासुदीनंतरच रुग्णसंख्या वाढली होती. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आगामी सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कशी टाळता येईल, यावर चर्चा करण्यात आली होती. सार्वजनिक मंडळांना आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्तीच्या प्रत्यक्षदर्शन व मुखदर्शनास सक्त मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक, समाजमाध्यमे यांद्वारे दर्शनाची व्यवस्था करावी, असाही नियम घालण्यात आला आहे.



कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे यंदाच्या गणेशोत्सवावरही प्रादुर्भावाचे सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक मंडळांना अनेक नियम पाळावे लागणार आहेत. पालिकेने गेल्या वर्षी सार्वजनिक मंडळांना जे नियम घातले होते, ते सर्व नियम यावर्षीही लागू करण्यात आले आहेत. पण तरीही प्रशासनाने नव्याने नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणेशमूर्ती आणणाऱ्यांकरिता ही नियमावली बंधनकारक असणार आहे. घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांपेक्षा, तर सार्वजनिक उत्सवातील मूर्ती चार फुटांपेक्षा उंच नसावी हा नियम कायम ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...