मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानकडून फंडिंग करण्यात आलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांनी ६ जणांना अटक केली आहे.
यातल्या एका दहशतवाद्याला मुंबईतून अटक करण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एकाचे मुंबई कनेक्शन आता समोर आले आहे. एवढंच नाही तर दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, ही फारच गंभीर गोष्ट आहे. देशाच्या विविध भागांमध्ये आणि विशेषतः मुंबईत दहशतवादी सापडणं ही धोक्याची घंटा आहे. मला वाटतं की ह्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढणं खूप गरजेचं आहे आणि पुन्हा असं काही घडू नये याची काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांना संपवूनच टाकायला हवं.
No comments:
Post a Comment