हाय कोर्टाने जावयाला महिनाभर घरजावई म्हणून राहण्याचे दिले आदेश, अजब आहे प्रकरण
मुंबई : नवरा-बायको म्हटलं की भांडणं आली (Husband and wife disputes). काही वेळा ही भांडणं पोलीस स्टेशन आणि कोर्टापर्यंत पोहोचतात. असंच कोर्टात पोहोचलेल्या एका दाम्पत्याचा प्रकरण चर्चेत आलं आहे.
ज्यात कोर्टाने दाम्पत्याचा संसार वाचवण्यासाठी अजब आदेश दिला आहे. एका व्यक्तीला त्याचा सासरी राहण्याचा आणि त्याच्या सासरच्यांना त्याला घरजावई म्हणून राहू देण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर महिनाभराने या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मध्य प्रदेशच्या ग्वालिअरमधील हे प्रकरण आहे. ग्वालिअरच्या सेवानगर परिसरात राहणारी गीता रजकचं लग्न मुरैनातील गणेश रजकशी झालं. लग्नानंतर सुरुवातीला सर्व ठिक होतं. त्यांना एक मुलगाही झाला. पण नंतर परिस्थिती बिघडली. त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. काही दिवसांपूर्वी गणेश आणि त्याच्या कुटुंबाने गीताला घरातून बाहेर काढलं आणि मुलाला आपल्याकडेच ठेवून घेतलं. नवऱ्याने आपल्या लेकाला आपल्याकडे दिलं नाही म्हणून गीताने कोर्टात धाव घेतली.
गीतीने मुलाचा ताबा मिळवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली. याच्या सुनावणीवेळी गणेशही हजर झाला. त्याने आपल्यावरील आरोप फेटाळले. आपल्याला बायकोला आपल्यासोबत ठेवायचं आहे. आपण तिला घराबाहेर काढलं नाही ती स्वतः घर सोडून गेली असं सांगितलं. नवरा-बायको दोघांनीही आपल्या सासरच्यांविरोधात आरोप केले. कोर्टान पती-पत्नी दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर गणेशला महिनाभर सासरी राहण्याचे आदेश दिले.
कोर्टाने गणेशला सांगितलं की, मुलाला घेऊन बायकोकडे जा. एक महिना सासरी जाऊन राहा. त्यानंतर या प्रकरणावर सुनावणी होईल. तर गीताच्या कुटुंबाला सांगितलं की जावयासोबत चांगलं वर्तन करा. त्याची काळजी घ्या. त्यामुळे तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. बापलेक एकमेकांपासून दुरावणार नाही. नाहीतर लेक, जावई आणि २ वर्षांच्या मुलाचं आयुष्य खराब होईल.