Friday, February 25, 2022

ठाण्यात ईडी आणि केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडीचा एल्गारठाणे

ठाण्यात ईडी आणि केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडीचा एल्गार

ठाणे (प्रतिनिधी)-  केंंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर करीत विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ठाण्यात जोरदार निदर्शने केली. या निदर्शनांच्यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे फलक हाती घेतले होते. 
राष्ट्रवादी आणि काँग्रेस या  पक्षांच्यावतीने शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईडी आणि केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडन विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सीबीआय,  एनआयए,  आयकर विभाग, आणि ईडी या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, मा. विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, माजी  विरोधी  पक्षनेत्या प्रमिलाताई केणी, प्रदेश चिटणीस सुहास देसाई, उथळसर प्रभाग समिती सभापती वहिदा खान, नगरसेविका अपर्णा साळवी, सुनिता सातपुते, अंकिता शिंदे, आरती गायकवाड,  परिवहन सदस्य नितीन पाटील, मोहसीन शेख, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, राहुल पिंगळे, राजेश जाधव , रमेश इंदिसे  यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.  

यावेळी आनंद परांजपे म्हणाले की, आता लढा सुरु झालेला आहे. महविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत.  ज्यावेळी इडी अस्तित्वात नव्हती त्यावेळी घडलेल्या कृतीला आता लक्ष्य केले जात असेल तर त्यामध्ये राजकारण नाही का? ईडीच्या धाडी कोणाच्या घरावर पडणार आहेत हे भाजपावाल्यांना आधीच कळते. म्हणजेच ईडी ही भाजपाकडूनच चालविली जाते. हेच स्पष्ट होत आहे. गुरुवारी भाजपवाल्यांनी नवाब मलिक यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करुन त्यांचा अपमान केला आहे. 

विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, आजचे आंदोलन हे भाजपच्या दडपशाहीच्या विरोधातील आंदोलन आहे. त्यामुळे आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलो आहोत. सर्व सेक्युलर पक्ष रस्त्यावर  उतरले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गटनेते नजीब मुल्ला यांनीही यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. जे लोक विरोधात बोलतात त्यांना टार्गेट केले जात आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना पराभव दिसत असल्यानेच हे घाणेरडे राजकारण भाजपने केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरु केले आहे.  जो पर्यंत भाजप संपणार नाही; तोचपर्यंत हा लढा सुरुच राहणार आहे; नवाब मलिक हे निर्दोष असूनते मुस्लीम असल्यानेच त्यांना दाऊदचे नाव जोडण्यात आले आहे. प्रत्येकवेळी मुस्लीम नेतृत्व पुढे आले की त्यांना अडकविण्याचा भाजपचा हा प्रयत्न नेहमी असतो, अशी टीका मुल्ला यांनी केली. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीचे सदस्य, सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष,  ब्लॉक, प्रभाग अध्यक्ष, कार्यकर्ते   मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...