Saturday, February 26, 2022

ठाण्यात मराठी भाषा दिनी कार्यक्रमांची रेलचेल

ठाण्यात मराठी भाषा दिनी कार्यक्रमांची रेलचेल

मराठी राजभाषा दिनानिमित्त, मराठी भाषेशी संबंधित भरपूर कार्यक्रमांचे आयोजन ठाणे-डोंबिवलीत विविध ठिकाणी करण्यात आले आहे. लेखांचे सादरीकरण, बालकलाकारांना प्रोत्साहन, गाण्यांचे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. करोनाच्या संकटामुळे मागील वर्षी प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित करणे शक्य झाले नव्हते. काही संस्थांनी ऑनलाइन कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न केला. परंतु यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने करोनाविषयक बंधने पाळून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शाखेने या दिवसाचे औचित्य साधून काही लेख मागवले होते. त्यातीलच काही निवडक लेखांचे सादरीकरण रविवार, २७ फेब्रुवारी रोजी आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय येथे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बाळासाहेब खोल्लम आणि प्रा. हर्षला लिखिते उपस्थित राहणार आहेत. तर लहान मुलांना मराठी भाषेतील महान कवी, गीतकारांची ओळख व्हावी यासाठी ठाण्यातील स्वरसाज एन्टरटेन्मेंट आणि स्वरसाज म्युझिक अकॅडमीतर्फे मराठी राज्यभाषा दिनानिमित्त संगीत क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या गीतकारांना स्वरांजली म्हणून 'स्वरनक्षत्र' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरसाज एन्टरटेन्मेंटचे बालकलाकार या कार्यक्रमात सादरीकरण करणार असून शनिवार, दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गडकरी रंगायतन येथे होणार आहे. डोंबिवली ग्रंथसंग्रहालय आणि स्वररंग यांच्यातर्फे 'माय बोली साजिरी' - मराठी मनाचा कॅनव्हास हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अमेय रानडे, तपस्या नेवे, समीर सुमन, मेघा विश्वास, रुपेश गांधी हे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, २७ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजता विनायक सभागृह, दुसरा मजला, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे होणार आहे. मराठी भाषेचे विविधांगी पैलू उलगडून दाखवणारा 'बोली मराठीच्या' कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे जिल्हा केंद्रातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पुंडलिक म्हात्रे, स्मिता पाटील, संजय गगे, भारती सहस्त्रबुद्धे, मिलिंद पेडणेकर, किरण वालावलकर यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी सायं. ५.३० वाजता तळमजला, मंगला सभागृह, मंगला हायस्कूल, बँक ऑफ महाराष्ट्रसमोर, रेल्वे स्थानकाजवळ, ठाणे (पू.) येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...