अर्थशक्तीसाठी सहकार हा उपाय -डॉ. मोहन भागवत
‘टीजेएसबी’ सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ कार्यक्रम
ठाणे : पैसा असो किंवा सत्ता असो, तो जितका एका हातात केंद्रित होईल, तितकी त्याबद्दलची निश्चितता कमी होते. वाईटच होईल असे नाही तर चांगलेही होऊ शकेल. ते करणाऱ्यावर अवलंबून असते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ठाण्यातील कार्यक्रमात व्यक्त केले.
आपल्याकडे सत्ता आणि पैशाला विकेंद्रित स्वरूपात वाटण्याची परंपरा आहे. अर्थशक्तीसाठी सहकार हा उपाय आहे. अर्थशक्ती काही हातात केंद्रित होण्यापेक्षा ती हळूहळू सर्वसामान्य माणसांच्या हातात येईल, या दिशेकडे तिला चलित करण्यासाठी सहकार चळवळ आहे, असेही ते म्हणाले.
ठाण्यातील तीन हात नाका येथील टिप-टॉप प्लाझा सभागृहात शुक्रवारी आयोजित केलेल्या ‘टीजेएसबी’ सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. भागवत हे बोलत होते.
भारतात सहकार क्षेत्र हे पूर्वीपासूनच आहे. परंतु सगळय़ाच गोष्टींचे मूळ विदेशात असल्याचे दाखविण्याची एक प्रचलित फॅशन आहे. यातूनच अमेरिकेत सहकार चळवळीचा उदय झाला असे सांगितले जाते. पण, सहकार ही गोष्ट भारतीयांच्या रक्तात आहे, असेही त्यांनी सांगितले. संघाचे स्वयंसेवक हे सहकारी बँकेच्या क्षेत्रात आले. त्यांनी बँकिंग क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून पाहिले नाही. ते सेवा म्हणून या क्षेत्रात आले. या क्षेत्रात सचोटी, सेवा आणि नीती ही तीन मूल्ये महत्त्वाची आहेत, असेही ते म्हणाले.
टीजेएसबी बँकेच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. ५० वर्षांत आपण अनेक चढ-उतार पाहिले असतील. परंतु आपला संपूर्ण समाज समर्थ व्हावा आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र असल्याचा अनुभव यावा, सगळय़ांनी मिळून देश बलवान करावा, अशा एका भावनेने तो भारित व्हावा, यासाठी आणखी काही दशके काम करावे लागेल. त्यात आणखी चढ-उतार पाहायला मिळतील. परंतु ज्या उद्देशातून वसा हाती घेतला आहे. तो वसा घेऊन पुढे चालत राहा, तुमच्या उद्देशाचे विस्मरण तुम्हाला झाले नाही तर तुमचे भाग्य तुम्हाला कधीही सोडणार नाही, असे ते म्हणाले.
असा सल्ला त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. तुमच्या उद्देशाचे विस्मरण तुम्हाला झाले नाही तर तुमचे भाग्य तुम्हाला कधीही सोडणार नाही. शीड उभारा, बंधन तोडा, नावेला सागरात ढकलून द्या आणि दिशा न बदलता तुम्ही सतत वल्लवाच्या तयारीत असाल तर तुमचे भाग्य तुमच्याशी जुगार खेळणार नाही, असेही ते म्हणाले.
मान्यवरांचा सत्कार
बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णा केळकर, गंगाधर साठे, मधुकर बापट, भालचंद्र दाते, सदाशिव जोशी, विद्याधर वैशंपायन, नंदगोपाल मेनन या सर्वाचा डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बँकेच्या ५० वर्षांतील कार्याचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे आणि कॉफी टेबल पुस्तकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. सामाजिक कार्य करणाऱ्या पुण्यातील ज्ञानदा संस्था, टिटवाळा येथील जीवन संवर्धन फाउंडेशन, भोगावती सांस्कृतिक मंडळ या तीन संस्थांच्या प्रतिनिधींचाही भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, उपाध्यक्ष शरद गांगल आणि टीजेएसबी सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे आणि नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावली. त्यांनी भागवत यांची भेट घेतली. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हेसुद्धा या वेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment