वाशिम: एखादी गोष्ट करण्याचा उत्साह असला की कोणतीच गोष्ट अशक्य नसते. त्याला वयाचं बंधन देखील नसतं. याचाच प्रत्यय वाशिममध्ये पाहायला मिळाला आहे. वाशिमच्या सिव्हिल लाईन भागात राहणाऱ्या 75 वर्षीय सिद्धेश्वर पाठक या आजोबांनी ई सायकल तयार केली आहे. पाठक हे 36 वर्ष इंदौर आणि वाशिमच्या विमानतळावर नोकरी करून निवृत्त झाले आहेत.
वाढत्या वयामुळे दुचाकी वापरणं कठीण होत जातं. त्यामुळे गाडीचा तोल सांभाळणे कठीण होत जातं. त्यातच वाढत चाललेले इंधनाचे दर. यामुळं दुचाकी वाहन वापरणं कठीण होत चालले आहे. यावर पर्याय म्हणून सिद्धेश्वर पाठक यांनी ई सायकलची निर्मिती केली.
सिद्धेश्वर यांचे लहान भाऊ हे रेडिओ, टीव्ही मेकॅनिकच काम करतात. तर सिद्धेश्वर यांचे चिरंजीव हे कॉम्प्युटर दुरुस्तीचं काम करतात. त्यात सिद्धेश्वर यांचं आयटीआयचं झालेलं शिक्षण यांची सांगड घालून ई सायकल निर्मितीचा हा प्रयोग सुरु झाला. भावाच्या दुकानातून टाकाऊ वस्तू जमा केल्या. तर मुलांच्या दुकानातून बॅटरी आणि इतर साहित्य जमा केले आणि सायकलला जोडुन ई सायकल तयार केली.
यासाठी त्यांनी बाजारपेठेतून एक मोटर विकत आणली आणि सायकलला जोडणी केल्यानंतर ई सायकल रस्त्यावर धावायला लागली. सध्या प्रायोगिक तत्वावर म्हणून 20 किमी ही सायकल धावत असून यासाठी सात हजार असा वेगळा खर्च आला आहे, असं ते सांगतात. नवीन ई सायकल तयार करण्यासाठी 18 हजार रुपये खर्च येऊ शकतो असं सिद्धेश्वर यांनी सांगितलं.
एकदा 5 तास चार्जिंग केल्यानंतर 20 किमी ही सायकल धावते. त्यासाठी फक्त 5 रु खर्च येतो, तर एक युनिटपेक्षा कमी विज लागले. वृद्धांसह सर्वांनाच ही ई सायकल फायदेशीर ठरू शकते. पर्यायी इंधनाची बचत होऊन प्रदूषणही कमी होऊ शकते. एवढंच काय तर या सायकलसाठी परवान्याची आवश्यकता नाही. लवकरच या ई सायकल वर प्रयोग करून आणखी जास्त किलोमीटर जास्त कशी चालू शकते यासाठी प्रयत्न करणार असून भावाच्या इलेक्ट्रॉनिकच्या माहितीच्या मदतीने आणखी प्रयोग करून खर्च कमी करण्याचा मानस पाठक यांचा आहे.