अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचा तपास वेगात सुरू; 12 ठिकाणी छापेमारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या गावात चौकशी
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढताना दिसत असून सीबीआयने तपास चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सर्वांत मोठी छापेमारी मोहिम राबवली आहे. अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआय मार्फत करण्यात आली आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी राज्यात 12 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले. त्यासोबतच यासह सीबीआयनंही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासह काही जागांवर छापे टाकले.
राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सांगली आणि अहमदनगर येथे सीबीआय अधिकाऱ्यांनी छापे टाकत सर्च ऑपरेशन राबवले.
आजतक/ इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयितांव्यतिरिक्त मुंबई आणि अहमदनगरमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या जागेंची झडती घेण्यात आली. राजू भुजबळ हे समाजसेवा शाखेचे प्रभारी होते आणि एसीपी संजय पाटील हे देखील त्याच शाखेशी संबंधित होते. भुजबळ आणि पाटील यांचीही ईडीने चौकशी केली होती. दरम्यान या प्रकरणातील संशयितांना सीबीआय अटकही करू शकते, अशी माहिती मिळाली आहे.
बुधवारी 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडी (ED) च्या अधिकाऱ्यांनी अहमदनगर मध्ये चौकशी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी राजू भुजबळ अधिकाऱ्याच्या गावात जाऊन त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. मुंबई पोलिसांत उपायुक्त पदावर कार्यरत असलेले राजू भुजबळ यांचे मुळ गाव अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात आहे. बुधवारी या ठिकाणी ईडीचे पथक दाखल झाले आणि त्यांचा जबाब नोंदवला. या बाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती नसून दोन वाहनांमधून हे अधिकारी आले होते.
No comments:
Post a Comment