अतिवृष्टीमुळे मुंबईतील सखल भागांत पाणी साचण्याच्या समस्येवर उपाय म्हणून जमिनीखाली पेटी जलवाहिनी व जलसंचयन बोगदे बनवण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
मुंबईतील सखल भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पाणी साचण्याची समस्या सोडवण्यासाठी 'वर्षा' निवासस्थानी आमदार प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले व त्याबाबत चर्चा केली. वातावरणीय बदलामुळे पावसाळ्यात चार ते पाच तासांत अतिवृष्टी होते. समुद्राला मोठी भरती व लाटा उसळतात. यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे नाले तुंबणे, मिठीसह मोठय़ा नद्यांना पूर येणे अशी परिस्थिती निर्माण होते.
मुंबई महानगरपालिकेने माधवराव चितळे समितीच्या शिफारशींनुसार सखल भागातल्या पाण्याच्या निचऱयासाठी पंपिंग स्टेशनसह ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेतला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
पूरस्थिती रोखण्यासाठी टोकियोचा आदर्श
जपानची राजधानी टोकियोमध्ये पूरस्थितीवर नियंत्रणासाठी जमिनीखाली टाक्या आणि बोगदे बांधले आहेत. याच पद्धतीने सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकच्या खालून भूमिगत जल बोगदा बांधून ते पाणी बॉक्स ड्रेनद्वारे पर्जन्य जलवाहिनीमध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे या वर्षी हा परिसर पाणी साचण्याच्या समस्येपासून मुक्त झाला. अशाच पद्धतीने पाणी साचणारे भाग निश्चित करून हे पाणी जमिनीखालील पेटी वाहिनी (बॉक्स ड्रेन)द्वारे, जमिनीखाली असलेल्या जल संचयन बोगद्यात साठवले जाऊ शकते. सखल भागांत अशा पद्धतीचे जमिनीखालील पेटी वाहिनी व जल संचयन बोगदे अत्यावश्यक आहेत. यासाठी तांत्रिक सल्लागारांची नेमणूक करून उपाययोजना करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
No comments:
Post a Comment