कल्याण लोकसभा मतदारसंघातील पायाभूत विकासकामांना गती मिळाली आहे. शिवसेनेच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने आता डोंबिवली, कल्याणपासून बदलापूरपर्यंतचे रस्ते दर्जेदार आणि सुपरफास्ट होणार आहेत. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण बैठकीत याबाबत विविध विकासकामांचा आराखडा सादर केला.
काटई- बदलापूर पाईपलाईन रस्त्यावर नेवाळी नाका हे कल्याण श्रीमलंगगड क्रॉसिंग रोड असल्यामुळे सतत वाहतूककोंडी पहायला मिळते. अंबरनाथ, बदलापूर, वांगणी येथील प्रवाशांना कल्याण -शिळ या मुख्य रस्त्यावर येण्याकरिता याच बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.
परंतु नेवाळी नाका येथे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांच्या निदर्शनास आणून दिले. नेवाळी नाका येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी त्यांनी केली. तसेच खोणी तळोजा रोड (करवले गाव) ते महामार्ग क्र. 4 ते तळोजा रोडला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण लिंक रोडचे लवकर सर्वेक्षण करावे तसेच कल्याणतळोजा मेट्रो मार्गाचा आराखडा निश्चित करून हे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणीही खासदार शिंदे यांनी यावेळी केली.
शहाड पूल चार पदरी होणार
शहाड उड्डाणपूल हा दोन पदरी असल्याकारणाने वाहतूककोंडीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या उड्डाणपुलाचा वापर हा उल्हासनगर, टिटवाळा, मुरबाड,शहापूर, मालशेज व नाशिक या मार्गांवर जाण्याकरिता होतो तसेच या मार्गांवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी असायची त्यामुळे या अडचणींचा विचार करत याठिकाणी चौपदरीकारण करण्याचे निर्णय घेण्यात आले.

No comments:
Post a Comment