Saturday, July 24, 2021

महापुराचा भाजीपाल्याला फटका, मुंबई बाजारसमिती भाज्यांचे दर घसरले, 100 गाड्या माल पडून



नवी मुंबई: महाराष्ट्रात सुरु असलेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा फटका मुंबई बाजारसमितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याला देखील बसला आहे. भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर, ग्राहकांअभावी भाजीपाला खराब होत चालला आहे. बाजार समितीत भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पडून असल्याची माहिती आहे.



मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये 650 गाडी आवक झाली. ग्राहक नसल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडून आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी जोरदार पावसामुळे बाजारात आवक झालेला शेतमाल पूर्णपणे भिजून मार्केटमध्ये आला आहे.

त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी भाजीपाला अंथरून सुकण्यासाठी ठेवला आहे. मात्र, ग्राहकांअभावी प्रमाणापेक्षा अधिक जवळपास 100 गाड्यांचा शेतमाल शिल्लक राहिला आहे.

खूपच भिजेलेला माल सडू लागल्याने फेकून देण्याची परिस्थिती बाजार आवारात दिसत आहे. त्यामुळे ग्राहक या भाज्यांची खरेदी करत नसल्याने भाज्यांच्या दरात मोठया प्रमाणात घसरण झाल्याचेही सांगण्यात येत आहे.


भाज्यांच्या दरात घसरण


मुंबई बाजार समितीमधील घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास सर्वच भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. प्रत्येक भाजी 20 रुपये किलोच्या खाली विकली जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत. शिमला मिरची 4 ते 5 रुपये किलो, फ्लॉवर 5 ते 6 रुपये, कोबी 9 ते 10 रुपये, वांगी 5 ते 7 रुपये, काकडी 10 रुपये, टोमॅटो 20 रुपये प्रतिकिलो तर कोथिंबिरी 8 रुपये, मेथी 8 , पालक 5 व पुदिना 3 रुपये जुडी विकली जात आहे.


पावासाची स्थिती राहिल्यास भाजीपाल्याला फटका


राज्यात आणखी दोन दिवस असाच पाऊस राहिल्यास शेतातच भाजीपाला भिजून खराब होऊ शकतो. परिणामी मार्केटला सुद्धा भाज्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे मात्र किरकोळ बाजारात नियंत्रण नसल्याने सर्व भाज्या 15 ते 25 रुपये पावकिलो तर पालेभाजी जुडी 15 ते 20 रुपयाने विकली जात असल्याचे भाजीपाला व्यापारी बाळू जाधव यांच्याडून सांगण्यात आलं आहे.

Friday, July 23, 2021

दैनिक जन खुलासा दिनांक २४ जुलै २०२१

 







पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले ट्वीट ; राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा

 

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले ट्वीट ; राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा 
मुंबई : मागील वर्षभरापासून संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. कोरोनाचा फटका शैक्षणिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बसला आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे बहुतांश भागात शाळा वर्षभरापासून बंद आहेत. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर दिला असला तरी त्यालाही अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात यंदाही २५ टक्के कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांनी यसंदर्भातील माहिती ट्विटरद्वारे जाहीर केली. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांवरील ताणदेखील कमी होणार आहे




याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता . ली ते . १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत,याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे.कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती लवकरच दिली जाईल असं त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र शासनानं अधिकृत परिपत्रक काढत याची घोषणा केली आहे. पत्रकात म्हटलंय की, केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मार्च २०२० पासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. दरवर्षी साधारणत: जूनमध्ये सर्व राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होते. मात्र २०२१-२२ मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरू करता आल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात असं त्यांनी सांगितले आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर २०२१-२२ मध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक यांच्याकडून प्रसिद्ध केली जाईल असंही शासकीय परिपत्रकात म्हटलं आहे.

रायगडच्या तळीये येथे रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात, मृत्यूचा आकडा ३६ वर पोहचला

महाड : महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळण्याच्या घटनेमुळे ३० ते ३५ घरे ढिगाऱ्याखाली आल्याची घटना गुरूवारी घडली होती. या घटनेमध्ये मृत्यूचा आकडा वाढतानाच ३६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या मदतीने मदतीची सुरूवात होतानाच याठिकाणी विविध यंत्रणांमार्फत रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात झाली आहे. थोड्या वेळापूर्वीच रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या रेस्क्यू ऑपरेशनबाबतची माहिती ट्विटरमार्फतच्या एका व्हिडिओतून दिली आहे. दरडीखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, कोस्टगार्ड यासारख्या टीम कार्यरत झाल्या आहेत. तर स्थानिक पातळीवर १२ रेस्क्यू टीम रवाना झाल्या होत्या.



बसच्या मदतीने याठिकाणी बचावसाहित्य पाठविण्यात आले आहे. महाडमध्ये झालेल्या दुर्घटनेत ३६ जणांना वाचवण्यात आले आहे. तर आणखी ३० जण अडकल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये गावात दरड घरांवर कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. या ढिगाऱ्याखाली आणखी ३० जण अडकल्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली. गुरूवारी सायंकाळीच ही घटना ४ वाजताच्या सुमारास घडलेली आहे. पण महाडला जाणारे सर्व मार्ग बंद झाल्याने कालपासून मदतकार्य पोहचवता आले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गुरूवारी सायंकाळी ५ वाजल्यापासूनच बचावकार्यासाठी हॅलिकॉप्टरची मदत घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले होते. पण सायंकाळी हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत पोहचवण्यात अडथळे आल्याने गुरूवारी मदत पोहचवता आली नसल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी एनडीआरएफची एक टीम पोहचली असून त्याठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारीही पोहचले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबईतून एनडीआरएफच्या एका टीमला एअरलिफ्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.



गुरूवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळाल्यावर दृश्यमानता अतिशय कमी झाली होती. त्यामुळे याठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत पोहचवणे कठीण झाले होते. पण आज सकाळीच एनडीआरफच्या टीमला याठिकाणी एअरलिफ्ट करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या टीमला लॅण्डिंगसाठीची जागा शोधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या संपुर्ण घटनेत मदतकार्य पोहचवण्यात प्रशासनाचे संपुर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मुंबईकर येऊन ठाण्यातून येऊन लोक मदत करू शकतात, पण प्रशासन पोहचू शकत नाही असाही आरोप त्यांनी केला.



तळीये गावामध्ये रात्री दरड कोसळल्याची घटना समोर आली होती. या दरडीखाली 30 ते 35 घरे दबल्याची भीती होती. मात्र सर्व पूरपरिस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने बचावकार्य सुरु करण्यात आले नव्हते. आज सकाळी पूराचे पाणी ओसरायला लागल्यानंतर याठिकाणी स्थानिकांच्या मदतीने एनडीआरएफ आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 30 ते 40 जण मातीच्या ढिगार्‍याखाली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आहे.

खबरदार, आमदार संजय केळकर यांचा प्रशासनास इशारा....ठाण्यातील वृक्षतोड तातडीने थांबवण्याची भाजपची मागणी..


ठाणे महापालिकेच्या हद्दीतील सर्व नियम धाब्यावर बसवून सत्ताधारी झाडांची बेसुमार कत्तल करत आहेत. ही मनमानी त्वरित थांबवावी व पर्यावरणाचे रक्षण करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांना देण्यात आले आहे.


ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी याविषयी आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत ठाण्यातील होणारी बेसुमार वृक्षतोड तातडीने थांबवावी अन्यथा वृक्षप्रेमी व ठाणेकरांच्या रोशाष सामोरे जावे लागेल असा इशाराही प्रशासनास दिला असून जुने वृक्ष ही नैसर्गिक संपत्ती असून त्याची देखभाल करण्याऐवजी ठा. म. पा मनमानी पद्धतीने बेसुमार वृक्षतोड करीत आहे असे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, महापालिका गटनेते मनोहर डुंबरे व सहकार विभाग अध्यक्ष अॅड. अल्केश कदम, रवी रेड्डी उपस्थित होते. 




ठाणे ढोकळी कोलशेत रोड वरील जवळपास ४३१ वृक्षतोड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. ढोकाळी येथील ५० वर्षांहूनही जुनी झाडे तोडली जात आहेत. विकासकामांच्या नावाखाली ही वृक्षतोड सुरू आहे. आमचा विकासाला विरोध नाही परंतु पर्यायी मार्ग असताना ही वृक्षतोड का करण्यात येते असा सवाल आ. केळकर यांनी यावेळी आयुक्तांकडे उपस्थित केला. वास्तविक मनोरमा नगर येथून प्रस्तावित डीपी रोड आहे. तसेच बाळकुम बायर कंपनीजवळूनही रस्ता रुंदीकरण करुन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता येईल याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असून त्याचा पर्यायी विचार व्हावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 



बेकायदा वृक्षतोड त्वरित थांबविली नाही तर भाजपा तर्फे आंदोलन करावे लागेल असे सहकार विभागाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अलकेश कदम यांनी बोलताना सांगितले.

Wednesday, July 21, 2021

मेथीचे पाणी दररोज पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे!


मुंबई : मेथी जास्त करून खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. मेथी दाणे आपल्या अन्नाची चव वाढवण्याशिवाय आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मेथीचे दाणे जीवनसत्त्वे आणि खनिज समृद्ध असतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मेथीचे दाणे आपल्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. मेथीचे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मेथीच्या पाण्याचे फायदे काय आहेत आणि ते कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. (Drinking fenugreek water is beneficial for health)



मेथीचे पाणी तयार करण्याची पध्दत


एका कढईत मेथीचे दाणे घ्या आणि त्याला चांगले भाजून घ्या.

त्यानंतर आता मेथी ब्लेंडरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मेथीची पूड घाला आणि मिक्स करा. अशा प्रकारे मेथीचे पाणी तयार केले जाते. हे मेथीचे खास पाणी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिले पाहिजे. ज्यामुळे याचे जास्त फायदे आपल्या शरीराला होतील.

मेथीचे पाणी पिण्याचे फायदे


1. मेथीचे पाणी पिल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळ भरल्यासारखे वाटते. मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. आपण दिवसातून दोन ते तीन वेळा मेथीचे हे खास पाणी पिले तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल.


2. मेथीच्या दाण्यांमध्ये केसांची वाढ करणारे पोषक घटक असतात. हे केस जाड आणि केसांचा कोंडा काढण्यास मदत करतात. हे पाणी पिल्याने आपले केस काही दिवसांमध्ये जाड आणि लांब होतील.


3. मेथीचे पाणी तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करते. हे आपल्याला पचन संबंधित समस्यांशी लढण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या इतर पाचन समस्यांना प्रतिबंधित करते.


4. मेथीचे दाणे मधुमेहासाठी एक उत्तम उपाय आहे. मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मेथीच्या बियामध्ये अमीनो अॅसिड असते. जे शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.


5. मेथीचे सेवन केल्यास मूत्रपिंडावर उपचार होण्यास मदत होते. मेथीचे दाणे मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.


6. हे पाणी आपल्या त्वचेसाठीही खूप चांगले आहे. मेथी आपल्या पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे मुरुम आणि त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्यांना प्रतिबंधित होतो.


7. मेथीच्या बियामध्ये नैसर्गिक विद्रव्य फायबर असते. जे आपल्या हृदयासाठी चांगले असते. ते हृदयविकाराच्या झटक्यापासून आपल्या हृदयाचे रक्षण करतात. मेथीचे पाणी पिल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.

कोकण रेल्वेची वाहतूक थांबवली, अतिवृष्टी-पूरपरिस्थितीमुळे घेतला निर्णय

मुंबई : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने कोकण किनारपट्टीला चांगलेच झोडपले आहे. कोकणातून वाहणाऱ्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरं आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहें. चिपळूण ते कामथे दरम्यान पुराचा धोका लक्षात घेऊन कोकण रेल्वेने गाड्या तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आल्या आहेत.



चिपळून आणि कामाठे रेल्वे स्थानकांदरम्यान वाहणाऱ्या वशिष्टी नदीच्या पुलाला पाणी लागले आहे. पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या मार्गावरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...