नवी मुंबई: महाराष्ट्रात सुरु असलेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा फटका मुंबई बाजारसमितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याला देखील बसला आहे. भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर, ग्राहकांअभावी भाजीपाला खराब होत चालला आहे. बाजार समितीत भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पडून असल्याची माहिती आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये 650 गाडी आवक झाली. ग्राहक नसल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडून आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी जोरदार पावसामुळे बाजारात आवक झालेला शेतमाल पूर्णपणे भिजून मार्केटमध्ये आला आहे.
त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी भाजीपाला अंथरून सुकण्यासाठी ठेवला आहे. मात्र, ग्राहकांअभावी प्रमाणापेक्षा अधिक जवळपास 100 गाड्यांचा शेतमाल शिल्लक राहिला आहे.
खूपच भिजेलेला माल सडू लागल्याने फेकून देण्याची परिस्थिती बाजार आवारात दिसत आहे. त्यामुळे ग्राहक या भाज्यांची खरेदी करत नसल्याने भाज्यांच्या दरात मोठया प्रमाणात घसरण झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
भाज्यांच्या दरात घसरण
मुंबई बाजार समितीमधील घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास सर्वच भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. प्रत्येक भाजी 20 रुपये किलोच्या खाली विकली जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत. शिमला मिरची 4 ते 5 रुपये किलो, फ्लॉवर 5 ते 6 रुपये, कोबी 9 ते 10 रुपये, वांगी 5 ते 7 रुपये, काकडी 10 रुपये, टोमॅटो 20 रुपये प्रतिकिलो तर कोथिंबिरी 8 रुपये, मेथी 8 , पालक 5 व पुदिना 3 रुपये जुडी विकली जात आहे.
पावासाची स्थिती राहिल्यास भाजीपाल्याला फटका
राज्यात आणखी दोन दिवस असाच पाऊस राहिल्यास शेतातच भाजीपाला भिजून खराब होऊ शकतो. परिणामी मार्केटला सुद्धा भाज्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे मात्र किरकोळ बाजारात नियंत्रण नसल्याने सर्व भाज्या 15 ते 25 रुपये पावकिलो तर पालेभाजी जुडी 15 ते 20 रुपयाने विकली जात असल्याचे भाजीपाला व्यापारी बाळू जाधव यांच्याडून सांगण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment