Saturday, October 9, 2021

पुष्पक एक्स्प्रेसवर दरोडा, प्रवाशांना लुटत दरोडेखोरांकडून महिलेचा बलात्कार



मुंबई: लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकून हल्लेखोरांनी काही प्रवाशांना लुटलं आणि एका महिलेवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.




इगतपुरी-कसारा स्थानकादरम्यानची काल रात्री 8 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. सात ते आठ दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटलं आणि 20 वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून दोन आरोपींना ताब्यात घेतलंय.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मधून मुंबईत येत असणाऱ्या पुष्पक ट्रेनमध्ये दरोडेखोरांकडून लूट आणि एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पुष्पक ट्रेन लखनऊवरून मुंबईच्या सीएसएमटीला येत होती. त्यामध्ये आठ दरोडेखोरांकडून लुट आणि एका महिलेवर बलात्कार करण्यात आला.


ट्रेन इगतपुरी ते कसारा दरम्यान आली तेव्हा हा प्रकार घडला. हे सर्व आरोपी घोटी इगतपुरीमध्ये ट्रेन मध्ये चढले. या प्रकरणात कल्याण जीआरपीने गुन्हा नोंदवला असून 4 आरोपी ताब्यात घेतले आहे. तर इतर 4 आरोपी फरार आहेत. घटना इगतपुरी मध्ये घडली आहे. या आठ जणांनी बोगी मधील एकूण सोळा जणांना लुटलं. चार लोकांकडून रोख रक्कम लुटली तर 9 जणांचा मोबाईल हिसकावून घेतला.


तसेच ट्रेनमध्ये उत्तर प्रदेशमधून मुंबईत कामासाठी येत असणाऱ्या नवदाम्पत्यावर हल्ला करत 20 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेचा पती आणि एका प्रवाशाने जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण या आरोपीनी त्यांना जबर मारहाण केली. या 8 आरोपींपैकी 7 इगतपुरीमध्ये राहणारे आहेत तर 1 मुंबईच्या मालवणी मध्ये राहणार होता.


मुंबईमध्ये राहणार आरोपी व्यसन करत होता ज्यामुळे त्याला घरच्यांनी घराबाहेर काढलं आहे. तो घर सोडून घोटीमध्ये राहणाऱ्या इतर मित्रांसोबत राहत होता. हा गुन्हा नशेमध्ये केला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 4 आरोपी अजून ही फरार आहेत ज्यांचा शोध पोलीस करत आहेत.

Friday, October 8, 2021

नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावर 25 किलो हेरॉईन जप्त, किंमत तब्बल सव्वाशे कोटी रुपये

नवी मुंबई : सध्या ड्रग्जबाबतच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे. ड्रग्ज पॅडलर्सवर अंमली पदार्थविरोधी पथक दररोज कारवाई करत आहेत. त्यामुळे ड्रग्जचा व्यापार करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

विशेषतः बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरु आहे. यादरम्यान महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) कारवाईमध्ये एका कंटेनरमधून तब्बल 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे सव्वाशे कोटी रुपये असल्याची माहिती आहे. हा कंटेनर नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात पकडला गेला. या प्रकरणी जयेश संघवी नावाच्या व्यावसायिकालाही अटक करण्यात आली आहे.



इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, नवी मुंबईतील एक 62 वर्षीय व्यापारी इराणमधून शेंगदाणा तेलाच्या खेपेत 25 किलो हेरॉईनची तस्करी करत होता. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबईच्या न्हावा शेवा येथे इराणहून आलेल्या एका कंटेनरला ताब्यात घेतले आणि 4 ऑक्टोबर रोजी त्याचा शोध घेतला.


दोन महिलांना 5 किलो हेरॉईनसह अटक


गेल्या महिन्यात दोन महिलांना कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर सुमारे 5 किलो हेरॉईनसह अटक केली होती. जप्त केलेल्या डग्जची किंमत सुमारे 25 कोटी रुपये होती. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून आलेल्या आई आणि मुलीला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी पकडले होते. दोघांनीही हेरोईन त्यांच्या ट्रॉली बॅगच्या बाजूच्या खिशात लपवून ठेवले होते. त्यांच्याकडून 4.95 किलो हेरॉईन सापडले होते. विमानतळावर कोणत्याही व्यक्तीकडून ड्रग्जची ही सर्वात मोठी जप्ती असल्याचे सांगितले जात आहे.


अधिकाऱ्यांनी सांगितले की विमानतळावरील ही सर्वात मोठी जप्ती आहे कारण प्रवासी सहसा एका वेळी दोन किलोपेक्षा जास्त डग्ज घेऊन जात नाहीत. अटकेनंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


यावर्षी जानेवारीपासून मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांशी संबंधित 3,333 गुन्हे नोंदवले आहेत, तर3,575 लोकांना अटक केली आहे आणि 86.50 कोटी रुपये किंमतीचे 3,813 किलो विविध प्रतिबंधित मादक पदार्थ जप्त केले आहेत. ANC ने यापैकी 88 प्रकरणे नोंदवली आहेत. या प्रकरणांमध्ये 129 लोकांना अटक करण्यात आली आणि 60.16 कोटी रुपये किमतीचे 2,569 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

Thursday, October 7, 2021

श्रीनगरमध्ये शाळेत घुसून दहशदवादांचा गोळीबार; महिला शिक्षकेसह मुख्याध्यापकाचा मृत्यू


श्रीनगर - शाळेत घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. या हल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. जम्मू -काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील ईदगाह परिसरात हा दहशदवादी हल्ला झाला आहे. जम्मू -काश्मीरमध्ये मंगळवारी सुद्धा हल्ला झाला होता.



दहशदवाद्यांच्या या हल्यात मुख्याध्यापक आणि एका महिला शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हा हल्ला श्रीनगरमधील सफा कदल भागात झाला आहे.

दहशतवादी असल्याचा संशय असलेल्या बंदूकधाऱ्यांनी येथील अलोचीबाग येथील रहिवासी सतींदर कौर आणि दीपक कौर या दोघांवर सफा कडल येथे गोळीबार केला आणि ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर दोघांनाही SKIMS रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी जीएनएसला सांगितले आहे.

मलेरियाच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी

मुंबई : हजारो वर्षापासून मलेरिया हे मानवासमोरचं एक मोठं संकट ठरलेलं असून, यामुळे प्रामुख्यानं लहान मुलं आणि नवजात बालकांचा मृत्यू होतो.

जवळपास एका शतकाच्या संशोधन आणि प्रयत्नानंतर लस शोधण्यात मिळालेलं हे यश वैद्यकीय क्षेत्राच्या आजवरच्या सर्वांत मोठ्या यशांपैकी एक आहे.



RTS,S नावाची ही लस असून, ती प्रभावी असल्याचं सहा वर्षांपूर्वी स्पष्ट झालं होतं. मात्र, आता घाना, केनिया आणि मालावी याठिकाणी राबवलेल्या पथदर्शी लसीकरण कार्यक्रमाच्या यशानंतर यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मलेरियाच्या मध्यम ते उच्च संक्रमणाचं प्रमाण अधिक असलेल्या आफ्रिकेत आणि इतर भागांमध्येदेखील या लशीचा वापर सुरू करायला हवा, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)म्हटलं आहे.


WHO चे महासंचालक डॉ. ट्रेड्रोस यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे.


"मलेरियावरील बहुप्रतिक्षित लस ही चिमुकल्यांच्या दृष्टीनं विज्ञानाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसंच बाल आरोग्य आणि मलेरिया नियंत्रणासाठीही याचा मोठा फायदा होणार असून, त्यामुळे दरवर्षी हजारो चिमुकल्यांचे प्राण वाचू शकतील," असं ट्रेड्रोस म्हणाले.


जीवघेणा परजिवी


मलेरिया हा एक जीवघेणा परजीवी आहे. पुनरुत्पादनासाठी तो मानवी रक्तपेशींवर हल्ला करून, त्या नष्ट करतो. रक्त शोषणाऱ्या डास चावल्यानं त्याचा संसर्ग आणि प्रसार होतो.


परजीवींचा नाश करणारी औषधं, मच्छरदानी आणि डास मारणारी किटकनाशकं यामुळं मलेरियाचं प्रमाण कमी करण्यात आजवर मदत केली आहे.


मात्र, आफ्रिकेत या आजाराचा क्रूर चेहरा पाहायला मिळतो. याठिकाणी 2019 या एका वर्षामध्ये मलेरियामुळं 2 लाख 60 हजारांपेक्षा अधिक चिमुकल्यांनी प्राण गमावल्याचं समोर आलं आहे.


वारंवार संसर्ग होऊन त्यामाध्यमातून या आजाराच्या विरोधात रोगप्रतिकार शक्ती तयार होण्यासाठी अनेक वर्षं लागतात. ती तयार झाल्यानंतरही केवळ गंभीर आजारी पडण्याचा धोका कमी होतो.


या लसीचं मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणं प्रभावी आणि योग्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी डॉ.क्वामे अॅम्पोन्सा-अचिनो यांनी घानामध्ये सर्वांत आधी प्रयोग केले.


"हा आमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक असा क्षण आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यामुळं मलेरियाचं प्रमाण बरंच खाली येण्यास मदत होऊ शकेल याची मला खात्री आहे," असं ते म्हणाले.


डॉ. अॅम्पोसा-अचिनो यांना बालपणी अनेकवेळा मलेरियाची लागण होत होती. त्यातूनच त्यांना डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली.


"ही परिस्थिती अत्यंत तणाव देणारी होती. जवळपास प्रत्येक आठवड्यात शाळेला सुटी मारावी लागायची. मलेरियानं दीर्घकाळासाठी आपलं प्रचंड नुकसान केलं आहे," असं ते म्हणाले.


मुलांचे जीव वाचवणे

मलेरियाचे जवळपास 100 पेक्षा अधिक प्रकार आहे. मात्र त्यापैकी आफ्रिकेत सर्वाधिक जीवघेणा ठरणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या Plasmodium falciparum या प्रकाराला लक्ष्य करणारी RTS,S ही लस आहे.


2015 मध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षावरून असं लक्षात आलं की, या लशीमुळं 10 पैकी 4 जणांचा मलेरियापासून बचाव होऊ शकतो. तर गंभीर प्रकरणांत 10 पैकी 3 जणांना याचा फायदा होतो. तसंच चिमुकल्यांना रक्ताची आवश्यता भासण्याचं प्रमाणदेखील एक तृतीयांश एवढं कमी झालं.


मात्र, प्रत्यक्षात ही लस प्रभावी ठरेल की नाही याबाबत शंका होती, कारण लशीचा परिणाम होण्यासाठी चार डोस देणं गरजेचं होतं. पहिले तीन डोस पाचव्या, सहाव्या आणि सातव्या महिन्यात तर अखेरचा बूस्टर डोस हा जवळपास 18 व्या महिन्यात देणं गरजेचं आहे.


या पथदर्शी मोहीमेतून समोर आलेल्या निष्कर्षांवर WHO च्या दोन तज्ज्ञ सल्लागार गटांनी बुधवारी चर्चा केली.


23 लाखांपेक्षा अधिक डोस दिल्यानंतर खालील बाबी आढळल्या :


लस सुरक्षित असून मलेरियाचे गंभीर परिणाम 30% पर्यंत कमी करण्यात प्रभावी आहे.

झोपण्यासाठी जाळ्यांची सोय नसलेल्या बालकांपैकी जवळपास दोन तृतीयांश मुलांपर्यंत ही लस पोहोचवण्यात आली.

लहान मुलांच्या इतर नियमित लसी किंवा मलेरियाच्या इतर उपचारांवरही याचा काहीही नकारात्मक परिणाम आढळून आला नाही.

ही लस किफायतशीर होती.

"वैद्यकीय दृष्टीकोनानं विचार केला तर हे अत्यंत मोठं यश आहे, आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं विचार करता ही ऐतिहासिक अशी कामगिरी आहे," असं WHO च्या जागतिक मलेरिया कार्यक्रमाचे संचालक डॉय पेड्रो अलोन्सो म्हणाले.


"आम्ही जवळपास 100 वर्षांपासून मलेरियाच्या लशीच्या प्रतिक्षेत होतो. आता यामुळे आफ्रिकेतील चिमुकल्यांचं रोगापासून संरक्षण होईल आणि त्यांचे प्राण वाचू शकतील."


मलेरियावर नियंत्रण मिळवणं एवढं कठीण का?


कोव्हिड सारख्या आजारावर जगभरात अत्यंत विक्रमी वेळेत लशी तयार करण्यात आल्याचं आपण पाहिलं. मग मलेरियाची लस तयार करण्यासाठी एवढा काळ का लागला? याचं आश्चर्य तुम्हाला वाटत असेल.


मलेरियाची लागण एका परजीवीच्या माध्यमातून होते. कोरोनासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूच्या तुलनेत तो अत्यंत वेगळा आणि गुंतागुंतीचा आहे. त्यांची तुलना करणं म्हणजे मानव आणि कोबी यांची तुलना केल्यासारखं आहे.


मलेरियाचा परजीवी हा आपल्या रोगप्रतिकार यंत्रणेपासून बचाव करण्याच्या दृष्टीनं विकसित झालेला आहे. त्यामुळे पुरेशी प्रतिकारशक्ती अथवा संरक्षण प्राप्त होईपर्यंत, वारंवार आपल्याला मलेरियाची लागण होण्याची शक्यता असते.


या परजीवीचं दोन प्रजातींमध्ये (मानव आणि डास) गुंतागुंतीचं असं जीवनचक्र आहे. शिवाय आपल्या शरिरातही तो विविध रुपं बदलत असतो. कारण तो आपल्या यकृत आणि तांबड्या रक्तपेशींवर हल्ला करून त्या संक्रमित करत असतो.


मलेरियाची लस तयार करणं म्हणजे अत्यंत कठीण असं काम आहे. त्यामुळंच RTS,S ही लस केवळ या परजीवीच्या स्पोरोझॉईट (sporozoite) या रुपाला लक्ष्य करते. sporozoite म्हणजे डास चावल्यापासून ते हा परजीवी यकृताकडं जाण्याच्या दरम्याची पातळी.


यामुळंच ही लस केवळ 40 टक्केच प्रभावी आहे. मात्र तसं असलं तरीही हे मोठं यश असून या दिशेनं अधिक प्रभावी लस तयार करण्याचा मार्ग त्यामुळे सुकर होणार आहे.


औषधनिर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या GSK नं ही लस विकसित केली आहे. मात्र, मलेरियापासून बचावाच्या इतर सर्व उपाययोजना म्हणजे मच्छरदानी, किटकनाशकं याला ही लस पर्याय नाही. तर या सर्वांच्या मदतीनं मलेरियाचा पूर्णपणे नाश करण्यासाठी या लशीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.


तसंच आफ्रिकेबाहेर या लशीचा वापर केला जाणार नाही. कारण याठिकाणी मलेरियाची आणखी वेगळे प्रकार असून त्यापासून ही लस अधिक प्रमाणात संरक्षण देऊ शकणार नाही.


लस तयार होणं हा एक ऐतिहासिक क्षण असून त्यामुळे अनेक कुटुंबांची भीती कमी होण्यास मदत होईल, असं पाथ मलेरिया व्हॅक्सिन इनिशिएटिव्हच्या डॉ. अॅश्ले बर्केट म्हणाल्या.


"कल्पना करा की, तुमचं बाळ हे अत्यंत निरोगी आणि सुदृढ आहे. मात्र, मित्रांरोबर खेळताना किंवा झोपलेलं असताना त्याला एका संक्रमित मच्छरानं चावा घेतला तर, दोन आठवड्यांत त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो," असं या आजाराचं गांभीर्य सांगताना त्या म्हणाल्या. "मलेरिया ही अत्यंत मोठी समस्या आहे. तसंच ती अत्यंत भयावहदेखील आहे."

Wednesday, October 6, 2021

शिवसेना खासदार पुत्राचा पालघरमध्ये पराभव

 पालघर : 5 ऑक्टोबरला राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका झाल्या. आज या निवडणुकांची मतमोजणी आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या मतमोजणीवर आहे.

हळूहळू आता याचा निकाल समोर येत आहे. नुकतंच आता पालघमधील जिल्हा परिषद पोटनिवडणूकीचा निकाल समोर आला आहे.



पालखरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा पालघरमधून पराभव झाला. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित यांना संधी देण्यात आली होती. मात्र आता वणई गटात भाजपचे पंकज कोरे यांनी खासदार राजेंद्र गावितांच्या चिरंजीवाचा दारुण पराभव केला आहे.


भाजपच्या पंकज कोरे हे 3654 मतांनी विजयी झालेत. 412 मतांनी भाजपचे पंकज कोरे विजयावर शिक्कमोर्तब केला आहे. आता रोहित गावितच्या पराभवामुळे शिवसैैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे.


दरम्यान, नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेसाठी मतमोजणी होत आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 जागांचा आणि 144 पंचायत समितीच्या जागांचा निकाल घोषित होत आहे.

Tuesday, October 5, 2021

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे स्मारकाचे नूतनीकरण होणार; जितेंद्र आव्हाड यांनी केली पाहणी

ठाणे - ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगवास भोगला आहे.

याच कारागृहामध्ये राघोजी भांगरे या आदिवासी समाजातील क्रांतीकारकास फाशी देण्यात आली होती. मात्र, या क्रांतीवीराचे स्मारक अडगळीत गेले असल्याने त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारागृहास भेट देऊन पाहणी केली. तसेच, स्मारकासाठी कारागृहाच्या आवारातील जागा निश्चित केली. विशेष म्हणजे, हे स्मारक सामान्य जनतेसाठी खुले ठेवण्यात येईल, अशी घोषणाही आव्हाड यांनी केली.



आदिवासी श्रमीक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या स्मारकाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजितदादा पवार यांनी आव्हाड यांना या संदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच अनुषंगाने जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष विक्रम खामकर, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. हंसराज खेवरा, महाराष्ट्र सचिव तुकाराम वरठा साहेब, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राघोजी भांगरे यांचे वंशज सुनिल भांगरे यांच्यासोबत स्मारक परिसराची पाहणी केली. यावेळी कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांच्याशी या स्मारकाच्या उभारणीबाबत चर्चा केली. सद्यस्थितीमध्ये स्मारकाचे अवशेष झाले असून ते अडगळीत पडले असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे स्मारक सुटसुटीत जागेत स्थलांतरीत करण्याच्या सूचना आव्हाड यांनी दिल्या. हे स्मारक सामान्य नागरिकांसाठी खुले ठेवून ठाणे कारागृहातील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिखीत स्वरुपात फलकांवर लावण्यात यावा, अशा सूचना आव्हाड यांनी केल्या.

नवरात्र : गरबा, दांडिया आणि दसऱ्यासाठी 'हे' आहेत नवे नियम

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वच सण-उत्सव कोव्हिड-19 निर्बंधांसह साजरे करणं आता अनिवार्य बनलं आहे.


येत्या 7 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल.




या निमित्ताने मुंबई महापालिकेनंतर गृहविभागाने नागरिकांना नवरात्र अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना केली आहे.

प्रशासनाने गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. सर्व नागरिकांनी या सूचना पाळूनच उत्सव साजरा करावेत,


नियमांचा भंग केल्यास अशा व्यक्तींविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


गृहविभागाच्या सूचना


सार्वजनिक मंडळांनी नवरात्रौत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने केवेळ मर्यादित स्वरुपाचे मंडळ उभारावे.

सार्वजनिक मंडळांकरता देवीची मूर्ती 4 फूट उंच आणि घरगुती मूर्ती 2 फूट उंच असावी.

गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये. याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम ( उदा. रक्तदान शिबीर) राबवण्यास प्राधान्य द्यावे.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन किंवा केबल नेटवर्कद्वारे करण्यास प्रधान्य द्यावं.

देवीच्या दर्शनासाठी येताना भक्तांनी सुरक्षित अंतर आणि नियमांचे पालन करावं.

भजन, आरती, किर्तन किंवा इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसंच ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.

मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना परवानगी नसेल.

मंडपात खाद्यपदार्थ किंवा पेयपान आयोजित करता येणार नाही.

देवीचे आगमन आणि विसर्जनासाठी मिरवणूक काढण्याची परवानगी नाही. विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करू नये. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी याठिकाणी जाणं टाळावं.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी. कोरोना प्रतिबंधक क्षेत्रात विसर्जन करता येणार नाही.

दसऱ्यासाठी सूचना


दसऱ्यादिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम नियम पाळून करावा.

रावण दहनासाठी आवश्यक असणाऱ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी असतील.

याठिकाणी प्रेक्षकांना बोलवण्याची परवानगी नसेल.

समाज माध्यमातून प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करावी.

मुंबई महानगरपालिकेने काय म्हटलं?


मुंबई महापालिकेने गुरुवारी (30 सप्टेंबर) सार्वजनिक नवरात्रोत्सव 2021 संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केलं. यामधील माहितीनुसार,


नवरात्रोत्सव मंडळांना महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणं आवश्यक.

देवी-मूर्तींची सजावट करताना भपकेबाजी नसावी.

देवीची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट तर घरगुती मूर्तींकरिता 2 फूटांपेक्षा जास्त नसावी.

शक्यतो घरातील देवींच्या मूर्तींचेच पूजन करावे.

घरगुती देवीमूर्तींचे आगमन/विसर्जन मिरवणुकीच्या स्वरुपात नसावे, जास्तीत जास्त 5 व्यक्तींना परवानगी. सर्वांनी कोरोना लशीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस पूर्ण झालेले असावे.

 


सार्वजनिक मंडळांच्या देवी आगमन आणि विसर्जन 10 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. सर्वांनी कोरोना लशीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस पूर्ण झालेले असावे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...