ठाणे - ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगवास भोगला आहे.
याच कारागृहामध्ये राघोजी भांगरे या आदिवासी समाजातील क्रांतीकारकास फाशी देण्यात आली होती. मात्र, या क्रांतीवीराचे स्मारक अडगळीत गेले असल्याने त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारागृहास भेट देऊन पाहणी केली. तसेच, स्मारकासाठी कारागृहाच्या आवारातील जागा निश्चित केली. विशेष म्हणजे, हे स्मारक सामान्य जनतेसाठी खुले ठेवण्यात येईल, अशी घोषणाही आव्हाड यांनी केली.
आदिवासी श्रमीक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या स्मारकाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजितदादा पवार यांनी आव्हाड यांना या संदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच अनुषंगाने जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष विक्रम खामकर, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. हंसराज खेवरा, महाराष्ट्र सचिव तुकाराम वरठा साहेब, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राघोजी भांगरे यांचे वंशज सुनिल भांगरे यांच्यासोबत स्मारक परिसराची पाहणी केली. यावेळी कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांच्याशी या स्मारकाच्या उभारणीबाबत चर्चा केली. सद्यस्थितीमध्ये स्मारकाचे अवशेष झाले असून ते अडगळीत पडले असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे स्मारक सुटसुटीत जागेत स्थलांतरीत करण्याच्या सूचना आव्हाड यांनी दिल्या. हे स्मारक सामान्य नागरिकांसाठी खुले ठेवून ठाणे कारागृहातील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिखीत स्वरुपात फलकांवर लावण्यात यावा, अशा सूचना आव्हाड यांनी केल्या.
No comments:
Post a Comment