मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वच सण-उत्सव कोव्हिड-19 निर्बंधांसह साजरे करणं आता अनिवार्य बनलं आहे.
येत्या 7 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल.
या निमित्ताने मुंबई महापालिकेनंतर गृहविभागाने नागरिकांना नवरात्र अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना केली आहे.
प्रशासनाने गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. सर्व नागरिकांनी या सूचना पाळूनच उत्सव साजरा करावेत,
नियमांचा भंग केल्यास अशा व्यक्तींविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गृहविभागाच्या सूचना
सार्वजनिक मंडळांनी नवरात्रौत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने केवेळ मर्यादित स्वरुपाचे मंडळ उभारावे.
सार्वजनिक मंडळांकरता देवीची मूर्ती 4 फूट उंच आणि घरगुती मूर्ती 2 फूट उंच असावी.
गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये. याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम ( उदा. रक्तदान शिबीर) राबवण्यास प्राधान्य द्यावे.
देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन किंवा केबल नेटवर्कद्वारे करण्यास प्रधान्य द्यावं.
देवीच्या दर्शनासाठी येताना भक्तांनी सुरक्षित अंतर आणि नियमांचे पालन करावं.
भजन, आरती, किर्तन किंवा इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसंच ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना परवानगी नसेल.
मंडपात खाद्यपदार्थ किंवा पेयपान आयोजित करता येणार नाही.
देवीचे आगमन आणि विसर्जनासाठी मिरवणूक काढण्याची परवानगी नाही. विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करू नये. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी याठिकाणी जाणं टाळावं.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी. कोरोना प्रतिबंधक क्षेत्रात विसर्जन करता येणार नाही.
दसऱ्यासाठी सूचना
दसऱ्यादिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम नियम पाळून करावा.
रावण दहनासाठी आवश्यक असणाऱ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी असतील.
याठिकाणी प्रेक्षकांना बोलवण्याची परवानगी नसेल.
समाज माध्यमातून प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करावी.
मुंबई महानगरपालिकेने काय म्हटलं?
मुंबई महापालिकेने गुरुवारी (30 सप्टेंबर) सार्वजनिक नवरात्रोत्सव 2021 संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केलं. यामधील माहितीनुसार,
नवरात्रोत्सव मंडळांना महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणं आवश्यक.
देवी-मूर्तींची सजावट करताना भपकेबाजी नसावी.
देवीची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट तर घरगुती मूर्तींकरिता 2 फूटांपेक्षा जास्त नसावी.
शक्यतो घरातील देवींच्या मूर्तींचेच पूजन करावे.
घरगुती देवीमूर्तींचे आगमन/विसर्जन मिरवणुकीच्या स्वरुपात नसावे, जास्तीत जास्त 5 व्यक्तींना परवानगी. सर्वांनी कोरोना लशीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस पूर्ण झालेले असावे.
सार्वजनिक मंडळांच्या देवी आगमन आणि विसर्जन 10 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. सर्वांनी कोरोना लशीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस पूर्ण झालेले असावे.