Monday, September 20, 2021

राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील चार नेत्यांचे चार जावई रडारवर, किरीट सोमय्यांनी वात पेटवली!

मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर नवा आरोप केला आहे.

हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रमाणे (Santaji Ghorpade) गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलावडे (Appasaheb Nalawade) या कारखान्यातही बोगस कंपन्यांद्वारे घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. आप्पासाहेब नलावडे कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या जावयाचंही नाव घेतलं आहे.



भाजपच्या किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीच्या किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार बड्या नेत्यांच्या जावयावर आरोप केला आहे. यामध्ये आज आरोप केलेले हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन हसीन मंगोली, नवाब मलिक यांचे जावई समीर खान, अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर आतापर्यंत आरोप केले आहेत. यापैकी मुश्रीफ वगळता सर्वांच्या जावयांना एक तर चौकशीला सामोरं जावं लागलं किंवा जेलमध्ये.


मुश्रीफांचे जावई मतीन हसीन यांच्यावर आरोप


किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांच्यावर बेनामी कंपन्यांद्वारे पैसे कमावल्याचा आरोप केला आहे. “मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट लिमिटेडचे, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे”, असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे.


ब्रिक्स आणि सरसेनापती कारखान्यात ५० कोटींचे व्यवहार झालेत. हे व्यवहार अपारदर्शी आहेत. हे लिलाव कोणत्या पद्धतीने झाले, किती लिलावात सहभागी झाले हे सर्व अपारदर्शी आहेत, असं सोमय्या म्हणाले.


नवाब मलिक यांचे जावई


या वर्षीच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मोठा झटका बसला होता. मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. दहा तासांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समीर खान यांना अटक केली होती. जानेवारी 2021 मध्ये ही कारवाई झाली होती.


एकनाथ खडसेंचे जावई


पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणात भाजपतून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे अडचणीत आहेत. याचप्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांना ईडीने अटक केली. जुलै महिन्यात ईडीने त्यांच्यावर कारवाई करुन कोठडीत पाठवलं.


अनिल देशमुख यांचे जावई


या महिन्याच्या सुरुवातीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्याचं वृत्त आलं होतं. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. त्यानंतर गौरव चतुर्वेदी बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. अनिल देशमुख प्रकरणात यापूर्वी गौरव चतुर्वेदी यांचं नाव यापूर्वी कधीही आलं नव्हतं. मात्र, आता अचानक त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

Saturday, September 18, 2021

शिवसेना भाजपला आठवलेंनी दिला मोलाचा सल्ला म्हणाले,'अजूनही वेळ गेलेली नाही; युती होऊ शकते

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात शिवसेना-भाजपच्या संभाव्य युतीच्या चर्चेला नव्यानं तोंड फुटलं आहे. भाजप शिवसेना युतीच्या मुद्यावरूनच आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सकारात्मक वक्तव्य केलं आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.



रामदास आठवले यांनी एका मराठी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना आणि भाजप पक्षाला सल्ला दिला आहे. ते म्हणाले,' अजूनही वेळ गेलेली नाही, अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर युती होऊ शकते' असा सल्ला त्यांनी दिला आहे.


ते पुढे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मात्र, त्यांनी मांडलेल्या अडीच-अडीच वर्षाच्या प्रस्तावावर शिवसेना-भाजपमध्ये एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळं जे व्हायला नको होतं, ते झालं. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा स्वगृही परतावे,' असा सल्ला आठवले यांनी दिला.


त्यांनी पुढे हटके स्टाईलमध्ये कविताही बोलून दाखवली आहे,'उद्धव ठाकरेंनी महायुतीत यावे आणि देवेंद्र फडणवीसांचे गीत गावे… फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे आणि उद्धवजींना घेऊन परत यावे,'

Thursday, September 16, 2021

दूरसंचार क्षेत्राला पावला बाप्पा; 100% प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा, व्होडा-आयडियावरील विघ्न दूर



नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या दूरसंचार कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसुली थकबाकी भरण्यासाठी 4 वर्षांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे व्होडाफोन-आयडिया, एअरटेलला मोठा दिलासा मिळाला आहे.



तसेच 100 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने टेलिकॉम क्षेत्रासाठी मदत पॅकेजला मंजुरी दिली. त्यानुसार, टेलिकॉम कंपन्यांना थकीत अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) आणि स्पेक्ट्रम शुल्क भरण्यासाठी 4 वर्षांची मुदत दिली आहे.

आता या क्षेत्रात 100% प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक (एफडीआय) ऑटोमॅटिक मार्गाने करण्याचीही परवानगी दिली आहे. या उपाययोजनेमुळे टेलिकॉम क्षेत्र आणि विशेषकरून व्होडा-आयडियाने नि:श्वास टाकला आहे. कॅबिनेटच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, टेलिकॉम क्षेत्रासाठी 9 पायाभूत सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने एजीआरची व्याख्याही बदलली आहे. सर्व नॉन-टेलिकॉम महसुलाला एजीआरच्या बाहेर करण्यात आले आहे.


दुसरीकडे, ऑटोमोबाइल, ऑटो कॉम्पोनंट्स आणि ड्रोन उद्योगांसाठी 26,058 कोटींच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, पीएलआय स्कीममुळे अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाची वैश्विक पुरवठा साखळीच्या भारतातील उपलब्धतेला चालना मिळेल. पुढील 5 वर्षांपर्यंत उद्योगाला हा इन्सेंटिव्ह दिला जाईल. मंत्रिमंडळाने AGR ची व्याख्या आणखी तर्कसंगत केली आहे. AGR व्याख्येबद्दल दीर्घ चर्चा झाली आहे, ज्यासाठी सरकारने दूरसंचार कंपन्यांचा गैर-दूरसंचार महसूल (non-telecom revenue) त्यातून वगळला आहे. दूरसंचार क्षेत्रात, AGR कंपनीला वैधानिक देयके भरण्यासाठी विचारात घेतलेल्या महसुलाचा (statutory dues)संदर्भ देते.


दरम्यान चार वर्षांनंतर व्होडा-आयडियाची थकबाकी आता इक्विटीत बदलू शकते. व्होडा-आयडिया कंपनीवर स्पेक्ट्रमची तब्बल 1,06,010 कोटी रुपये आणि एजीआरची 62,180 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या हप्त्याच्या रूपात 22 हजार कोटी रुपये पुढील वर्षी मार्चपर्यंतच द्यायचे होते. तथापि, कंपनीचे एकूण उत्पन्न या सहामाहीत 3,850 कोटी रुपये राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. कंपनीला आता चार वर्षांपर्यंतची सवलत मिळाली आहे.


चार वर्षांनंतरही कंपनी कर्ज परत करण्याच्या स्थितीत आली नाही तर केंद्र सरकार या कर्जाचे रूपांतर इक्विटीत करेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. एअरटेल कंपनीने सुमारे 43 हजार कोटी रुपयांच्या एजीआर थकबाकीपैकी 18 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. कंपनी 21 हजार कोटी रुपये राइट इश्यूद्वारे जमा करणार होती. आता एअरटेल कंपनी या रकमेचा वापर आपल्या विस्तारीकरणासाठी करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


जिओला एफडीआयद्वारे फायद्याची अपेक्षा रिलायन्स जिओवर सर्वात कमी 1053 कोटी रुपयांचीच एजीआर थकबाकी होती, कंपनीने ती याआधीच भरली आहे. कंपनी ऑटोमॅटिक रूटद्वारे एफडीआय प्राप्त करू शकेल. तिला यासाठी सरकारकडून मंजुरी घ्यावी लागेल. व्होडा-आयडिया आणि एअरटेल कंपन्यांना आपला प्लॅन आऊट करण्यास आणखी वेळ मिळाला आहे. तथापि, कायमस्वरूपी दिलासासाठी दूरसंचार कंपन्यांना प्रति युजर सरासरी महसूल वाढवावा लागेल. -आतिश मातलावाला, सीनियर अॅनालिस्ट, एसएसजे फायनान्स अँड सेक्युरिटीज.

जगातील प्रामाणिक शहरांमध्ये मुंबई दुसरी; आनंद महिंद्रा यांनी शेअर केली ही गोड बातमी

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतात... त्यांच्या ट्विटर हँडलवर आपल्याला रोज काहीना काही नवीन पाहायला, वाचायला मिळते.

त्यांच्या पोस्ट बऱ्याच उपयोगीही असतात आणि अशीच एक पोस्ट त्यांनी बुधवारी शेअर केली. ती वाचून मुंबईकर म्हणून तुम्हाला तर अभिमान वाटेलच, शिवाय भारताची मानही अभिमानानं ताठ होईल. जगात सर्वात प्रामाणिक शहर म्हणून मुंबईनं दुसरे स्थान (Mumbai Second Honest City in World) पटकावले आहे. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेलं ट्विट तुफान व्हायरल झालं आहे. 


रिडर्स डाईजेस्ट यांनी सोशल मीडियावरून सर्व्हे करत जगातील सर्वात प्रामाणिक शहरांची माहिती घेतली. तेथील लोकांचे विचार व मानसिकता कशी आहे?; या आधारावर The Wallet Experiment या कॅम्पेनची सुरुवात केली. या कॅम्पेनच्या माध्यमातून जगातील १६ मोठ्या शहरांमध्ये १९२ मुद्दाम वॉलेट ( पॉकिट) हरवण्यात आले. यानुसार प्रत्येक शहरात १२ पॉकिट्स मुद्दाम हरवण्यात आली. या पॉकेट्समध्ये जवळपास ५० डॉलरच्या हिशोबानं पैसे ठेवण्यात आले. त्याच्यासोबत पॉकेटात संबंधित व्यक्तीचे नाव, कुटुंबीयांची माहिती, बिझनस कार्ड आणि कार्यालयाचा पत्ता ठेवण्यात आला. त्यानंतर कोणत्या शहरात किती पॉकिट्स सापडले याचा अभ्यास करून निकाल समोर ठेवण्यात आला.

 


या कॅम्पेनमध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबईनं दुसरे स्थान पटकावले. १२ पैकी ९ पॉकिट्स परत मिळाले, तर फिनलँडच्या हेलिस्की शहरानं अव्वल स्थान पटकावले. तिथे १२ पैकी ११ पॉकिट्स परत मिळाली. Erik Solheim या युजरनं हा डाटा पोस्ट केला आणि आनंद महिंद्रा यांनी त्याला रिट्विट करून त्यांचे मत मांडले. ''या निकालाचे आश्चर्य अजिबात वाटले नाही, परंतु प्रयोगाचा निकाल पाहून आनंद नक्कीच झाला. जर तुम्ही प्रत्येक देशाच्या उत्पन्नाच्या सापेक्ष पातळीवर विचार केला तर मुंबईचा परिणाम आणखी प्रभावी आहे,''असे ट्विट महिंद्रा यांनी केले.

Wednesday, September 15, 2021

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; पाच जणांवर आरोप निश्चित

पुणे, 15 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) हत्या प्रकरणातील पाच आरोपींच्या विरोधात दोषारोप निश्चित (Charges framed against 5 accused by Pune court) करण्यात आले आहेत.

आता या प्रकऱणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाने आरोपी वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे यांच्याविरुद्ध हत्येचा कट रचला असल्याचं निश्चित केलं आहे. आरोपी निश्चित झाल्याने आता आरोपींच्या विरोधात खटला चालवण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे झाल्यानंतर आरोपींना अटक झाली.



त्यानंतर आता हत्येच्या आठ वर्षांनंतर आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित झाले आहेत.


एएनआयच्या मते, आर्थर रोड जेल आणि हर्सुल जेलमध्ये असलेले आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना पुण्यातील येरवडा सेंट्रल जेलमध्ये स्थलांतरित करण्याचेही न्यायालयाने आदेश दिले आहेत. न्यायालयाने पाचही आरोपींच्या विरोधात आयपीसी 302, 120 बी, 34, यूएपीएच्या सेक्शन 16 आणि सेक्शन 3 (25), 27 (1), 27 (3) अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. आरोपींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती.

"मुंबईत दहशतवादी सापडणं ही धोक्याची घंटा"; मुंबईतील दहशतवाद्याच्या अटकेवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानकडून फंडिंग करण्यात आलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांनी ६ जणांना अटक केली आहे.

यातल्या एका दहशतवाद्याला मुंबईतून अटक करण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एकाचे मुंबई कनेक्शन आता समोर आले आहे. एवढंच नाही तर दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.


ते म्हणाले, ही फारच गंभीर गोष्ट आहे. देशाच्या विविध भागांमध्ये आणि विशेषतः मुंबईत दहशतवादी सापडणं ही धोक्याची घंटा आहे. मला वाटतं की ह्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढणं खूप गरजेचं आहे आणि पुन्हा असं काही घडू नये याची काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांना संपवूनच टाकायला हवं.

वाहनधारकांनो! पेट्रोल-डिझेलचा पैसा वाचणार; लागू होणार एक देश एक इंधन दर, 17 सप्टेंबरला लखनऊत बैठक

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहनधारकांच्या खिश्याला अधिकची झळ सोसावी लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की आपोआप आर्थिक गणित बिघडत असते.

इंधनाच्या दरवाढीमुळे अडचणीत येणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक गॅस व एटीएफसारखे पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणले जाऊ शकतात.



अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी मंत्रिसमूह याच आठवड्यात शुक्रवारी पेट्रोलियम पदार्थांसाठी एक देश-एक दराच्या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. याच दिवशी जीएसटी कौन्सिलची ४५ वी बैठकही आहे. कोरोना महामारीनंतर कौन्सिलची ही पहिलीच प्रत्यक्ष बैठक आहे. मंत्रिसमूहाने केरळ हायकोर्टाच्या आग्रहानंतर हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मंत्रिसमूहात एकमत झाले तर ते हा प्रस्ताव जीएसटी कौन्सिकडे सोपवतील. नंतर या प्रस्तावावर कधी विचार करायचा हे कौन्सिल ठरवेल.


जीएसटीनंतर सेस शक्य, मात्र त्याचाही फायदाच होईल


जीएसटीमध्ये कमाल स्लॅब रेट २८ टक्के आहे. मात्र, त्यावर अधिभार (तंबाखू उत्पादानांवर २१% ते १६०% पर्यंत आहे) आकारण्याचा पर्याय खुला आहे. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर त्यांच्यावरही सेस लागेलच. मात्र, यानंतरही प्रभावी दर सध्याच्या करांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय यामुळे पेट्रोल-िडझेलवर इनपुट टॅक्स क्रेडिटही मिळू लागेल. यामुळे व्यवसायाच्या खर्चात कपात होऊन दिलासा मिळू शकते

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...