Wednesday, September 1, 2021

नांदेडात खळबळ ! मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक

नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात साईसदन हे अशोक चव्हाण यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाला सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. असे असतानाही ही दगडफेकीची घटना घडली आहे. एका अज्ञात महिलेने ही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीतच या घटनेमुळे नांदेडात खळबळ उडाली आहे.



दगडफेकीच्या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दगडफेक करणारी महिला नेमकी कोण होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ती मनोरुग्ण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दगडफेकीची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे एक पथक अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळेही घटनास्थळी दाखल झाले, परंतु तोपर्यंत ही महिला पसार झाली होती.


या घटनेनंतर शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. या महिलेने अशोक चव्हाण यांच्या घराच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरूवात केली, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने फेकलेला दगड घराच्या दर्शनी भागात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या केबिनवरील काचावर लागला. त्यामुळे केबिनची काच फुटली. पोलिस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष राहा - विजय वडेट्टीवार


सोलापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील कोरोना स्थिती, आश्रमशाळा, कायदा व सुव्यवस्था, चारा छावणी याबाबत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपलेला नसल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली असून लहान मुले बाधित होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा.


लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. कोरोनासाठी काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हिताचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सेटलमेंटमध्ये म्हाडाच्या घराचा प्रस्ताव, सांस्कृतिक सभागृहाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.




जिल्हाधिकारी शंभरकर यांनी चारा छावण्यांच्या निधीबाबत सांगितले. यावर वडेट्टीवार यांनी प्रस्तावाला मंत्रालय स्तरावरून मान्यता देण्यात येईल, असे सांगितले. जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा. टॅबचे संनियंत्रण करा, तांडा वस्तीचा प्रस्ताव आणि घरकुलांच्या 30 कोटींच्या प्रस्तावाला मंत्रालय स्तरावरून मंजुरी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही त्यांनी आढावा घेतला. कोरोना महामारीतील गुन्ह्यांचे प्रमाण, महिलांवरील अत्याचाराबाबत त्यांनी श्रीमती सातपुते यांच्याकडून माहिती घेतली. सोलापूर शहराच्या पाण्याबाबत योग्य नियोजन करून पुनर्वापर प्रक्रिया राबवा. ग्रीन बिल्डींगसाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही वडेट्टीवार यांनी केल्या.

Tuesday, August 31, 2021

बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना नाव न घेता टोला

ठाणे: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

केवळ बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत. त्यासाठी कामं करावी लागतात, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणेंना नाव न घेता लगावला. (cm uddhav thackeray slams narayan rane over jan ashirwad yatra)



शिवसेना आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला. प्रतापने ऑक्सिजन प्लांटचं जे काम केलं ते खरं काम. हे खरे आशीर्वाद. या कामातून जनतेचे आशीर्वाद मिळतात. नुसतं बोंबलून काही आशीर्वाद मिळत नाही. आशीर्वाद द्या हो… आशीर्वाद द्या हो… कशासाठी देऊ? काय नाही… असेच द्या… असे नाही आशीर्वाद मिळत. या कामातून आशीर्वाद मिळतात, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.


हे खूप दुर्देवी


दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे, असंही ते म्हणाले.


हे काही स्वातंत्र्य युद्ध नाही


मनसे आणि भाजपने कोरोनाचे नियम मोडून दहीहंडी उत्सव साजरी केली. त्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. कोरोनाचे नियम मोडून आम्ही करून दाखवलं असं सांगायला हे काही स्वातंत्र्य युद्ध नाहीये. हे काही स्वातंत्र्य मिळून दाखवलं नाही. त्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. कोरोनाचे नियम सरकारने का घालून दिले आहेत? याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे ना. निर्बंधांना विरोध करायला फुकट कोरोना वाटप करण्याचा हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये, अशी टीका त्यांनी मनसे आणि भाजपचे नाव न घेता केली.


खुमखुमी असेल तर कोरोनाविरोधात आंदोलन करा


तिसरी लाट येऊ शकते. त्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे. केंद्राने पत्रं दिलं आहे. त्यात त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सवात निर्बंध पाळा असं म्हटलं आहे. त्यामुळे कोणतंही सरकार कोणत्याही सणांविरोधात नाहीये. आपण कोरोना विरोधात आहोत. त्यामुळे आंदोलन करण्याची ज्यांना खुमखुमी आहे. त्यांनी कोरोनाविरोधात आंदोलन करावं. प्रतापने जे आंदोलन केलं ते कोरोनाविरोधातील आंदोलन आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाविरोधात आंदोलन करण्याची यांची हिंमत नाही, कुवत नाही. विचार नाही आणि तेवढी प्रगल्भताही नाही. त्यांना रस्त्यावर उतरून गोंधळ घालायचा आहे. आणि शिस्त पाळणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालायचा आहे. हे लोक बेजबाबदारपणे वागत आहे. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. मला मात्र माझ्या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे, असंही ते म्हणाले. (cm uddhav thackeray slams narayan rane over jan ashirwad yatra)

Monday, August 30, 2021

मुंबईसह ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचेच; ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी

मुंबई: गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मात्र, पावसामुळे कुठेही पाणी साचल्याच्या किंवा वाहतूक कोंडी झाल्याच्या घटना घडल्या नसल्याचं वृत्त आहे. तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. (Mumbai, Thane, and Palghar continue to receive heavy rains)



मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, आतापर्यंत या भागात कुठेही पाणी साचलेले दिसत नाही. मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईच्या इस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर दृष्यमानता कमी झाली आहे. येत्या तीन ते चार तासात मुंबई, ठाणे, पालघर परिसरात तुफान पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे.


ठाण्यात जोरदार पाऊस


दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा ठाण्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र या भागात कोणतीही वाहतूक कोंडी झाली नाही. सद्या तरी सखोल भागात पाणी साचले नसले तरी पावसाचा जोर जर वाढला तर सखल भागात पाणी साचू शकते. तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.


अंबरनाथ, बदलापूरला झोडपले


अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि ग्रामीण परिसरातही रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू झाली आहे. सकाळपासून या भागात पावसाचा जोर वाढला आहे. मात्र अजून कुठेही पाणी साचल्याची किंवा अन्य घटना नाही घडलेली नाही. कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या भागात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

शिवसेना खासदार भावना गवळींच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीची छापेमारी

यवतमाळ - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर छापेमारी केली आहे. खासदार भावना गवळी यांनी या कारवाईनंतर भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

यावेळी त्यांनी ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगितले. तसेच भाजप आमदारांच्या मागे ईडी लावणार का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.



भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने आज कारवाई केली असून ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. ईडीचे पथक भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर जिल्ह्यात दाखल झाले आहे. पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.


ईडीची मला कोणतीही नोटीस आलेली नाही. ईडीचे अधिकारी संस्थांवर आले आहेत. ते चौकशी करत आहेत. आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहेत. सर्वच शिवसेनेच्या मंत्री, नेत्यांना जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे. मी स्वत: माझ्या संस्थेचा एफआयआर नोंदवला होता. मला तो हिशोब मिळाला नाही, म्हणून मी तक्रार दाखल केली. त्यातील एकच वाक्य पकडायचे आणि त्यातील एकच आकडा घ्यायचा आणि ट्वीट करत मोठा राईचा पर्वत बनवायचा. असा खेळ मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी मांडलेला आहे.


माझ्या संस्थेची जी चौकशी होत आहे. तिथे ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत. गेल्या २० वर्षांपासून शिक्षण घेतले आहे. त्या ठिकाणाहून विद्या देण्याचे काम होत आहे. या भागातून मी पाचवेळा खासदार झाली आहे. कदाचित काही लोकांना ते चांगले दिसत नसल्याची प्रतिक्रिया भावना गवळी यांनी दिली.


या भागात भाजपचे एक आमदार आहेत. ते भूमाफिया आहेत. ५०० कोटींचा घोटाळा त्यांनीही केला आहे. केंद्र सरकार त्यांचीही ईडी चौकशी लावणार का? हा माझा प्रश्न आहे. माझी जशी चौकशी सुरु आहे. तशी त्यांचीही चौकशी करावी ही विनंती आहे. केवळ शिवसेनेच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. आणीबाणी लावल्यासारखे दिसत आहे. राजकारणाची पातळी घसरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रवासी विमानांवरील निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत वाढवले; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घेतली खबरदारी

मुंबई : भारतातून ये-जा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे.

भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर १७ महिन्यांपासून हे निर्बंध लागू आहेत.

'डीजीसीए'ने रविवारी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जाहीर केला.

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कायम राहतील. त्यापुढील निर्णय कोरोनास्थितीनुरूप घेण्यात येईल. मात्र, मालवाहू (कार्गो) विमानांचे प्रचलन कोणत्याही बांधनांविना सुरू राहील. शिवाय, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवर नियोजित फेऱ्या मर्यादित स्वरूपात चालविण्यात येतील. त्याचा निर्णय 'केस टू केस' तत्त्वावर प्राधिकरणाकडून घेतला जाईल.




तथापि, वंदे भारत अभियान आणि एअर बबल कराराअंतर्गत सुरू असलेली उड्डाणे वेळापत्रकानुसार प्रचलन करतील. सरकारी मापदंडांनुसार पात्र लोक त्या माध्यमातून भारतात ये-जा करू शकतील, असे स्पष्ट केले आहे. भारताने १८हून अधिक देशांशी एअर बबल करार केले असून, त्याअंतर्गत दोन्ही देशांतील प्रमुख विमान कंपन्यांना आठवड्यातून ठराविक दिवस पूर्वनियोजित विमान फेरी चालविण्यास परवानगी देण्यात येते.


निर्बंध न वाढवण्याची होत होती मागणी


भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध आणखी वाढवू नयेत, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेद्वारे करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि काही देशांत डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढू लागल्याने खबरदारी म्हणून डीजीसीएने हा निर्णय घेतल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. २३ मार्च २०२० पासून हे निर्बंध लागू आहेत.

KBCमध्ये सहभागी झाल्यानं अधिकाऱ्याला मोठा आर्थिक फटका; रेल्वेच्या कारवाई संपूर्ण कुटुंब तणावाखाली

कोटा: कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेल्या रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कोटा विभागातील कार्यालय अधीक्षक देशबंधू पांडे यांच्यावर रेल्वे प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. त्यांना चार्जशीट पाठवण्यात आली आहे. याशिवाय ३ वर्षांसाठी त्यांची पगारवाढ थांबवण्यात आली. रेल्वे प्रशासनानं केलेल्या कारवाईला कर्मचारी संघटनेनं विरोध केला आहे. पांडे यांच्याविरुद्ध झालेली कारवाई अयोग्य असल्याचं पश्चिम मध्य रेल्वे मजूर संघाचे सचिव अब्दुल खालिद यांनी म्हटलं आहे. मजूर संघ पांडेवर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देईल, असंही खालिद म्हणाले.




केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी कोटा विभागात कार्यरत असलेले देशबंधू पांडे यांनी ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान मुंबईत होते. यासाठी सुट्टी गरजेची होती. त्यासाठीचा अर्ज पांडे यांनी अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र त्यांच्या अर्जावर कोणताही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सुट्टी मंजूरच झाली नाही. सुट्टी नसताना पांडे केबीसीच्या चित्रीकरणासाठी मुंबईला गेले. पांडेंनी केबीसीमध्ये ३ लाख २० हजार रुपये जिंकले. मात्र ही रक्कम पांडे यांना महागात पडली. रेल्वेनं त्यांचा चार्जशीट पाठवली आहे. पांडे अतिशय घाबरले असून ते या विषयावर भाष्य करायला तयार नाहीत.


केबीसीमध्ये सहभागी होऊन घरी परतलेल्या पांडे यांना १८ ऑगस्टला चार्जशीट पाठवण्यात आली. त्यांची पगारवाढ तीन वर्षांसाठी थांबवण्याचे आदेशही प्रशासनानं दिले. यामुळे केबीसीत ३ लाख २० हजार जिंकणाऱ्या पांडेंच्या आनंदावर विरजण पडलं. रेल्वेनं केलेल्या कारवाईमुळे पांडे आणि त्यांचं कुटुंब तणावाखाली आहे. केबीसीमध्ये सहभागी झाल्यानं त्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पगारवाढ रोखण्यात आल्यानं पांडे यांना जवळपास दीड लाख रुपयांवर पाणी सोडावं लागणार आहे. केबीसीत त्यांनी ३ लाख २० हजार जिंकले. ही रक्कम बक्षिसाची असल्यानं त्यातून कर कापला जाईल.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...