सोलापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.
वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील कोरोना स्थिती, आश्रमशाळा, कायदा व सुव्यवस्था, चारा छावणी याबाबत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपलेला नसल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली असून लहान मुले बाधित होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा.
लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. कोरोनासाठी काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हिताचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सेटलमेंटमध्ये म्हाडाच्या घराचा प्रस्ताव, सांस्कृतिक सभागृहाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी चारा छावण्यांच्या निधीबाबत सांगितले. यावर वडेट्टीवार यांनी प्रस्तावाला मंत्रालय स्तरावरून मान्यता देण्यात येईल, असे सांगितले. जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा. टॅबचे संनियंत्रण करा, तांडा वस्तीचा प्रस्ताव आणि घरकुलांच्या 30 कोटींच्या प्रस्तावाला मंत्रालय स्तरावरून मंजुरी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही त्यांनी आढावा घेतला. कोरोना महामारीतील गुन्ह्यांचे प्रमाण, महिलांवरील अत्याचाराबाबत त्यांनी श्रीमती सातपुते यांच्याकडून माहिती घेतली. सोलापूर शहराच्या पाण्याबाबत योग्य नियोजन करून पुनर्वापर प्रक्रिया राबवा. ग्रीन बिल्डींगसाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही वडेट्टीवार यांनी केल्या.
No comments:
Post a Comment