यवतमाळ - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर छापेमारी केली आहे. खासदार भावना गवळी यांनी या कारवाईनंतर भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
यावेळी त्यांनी ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगितले. तसेच भाजप आमदारांच्या मागे ईडी लावणार का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने आज कारवाई केली असून ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. ईडीचे पथक भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर जिल्ह्यात दाखल झाले आहे. पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.
ईडीची मला कोणतीही नोटीस आलेली नाही. ईडीचे अधिकारी संस्थांवर आले आहेत. ते चौकशी करत आहेत. आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहेत. सर्वच शिवसेनेच्या मंत्री, नेत्यांना जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे. मी स्वत: माझ्या संस्थेचा एफआयआर नोंदवला होता. मला तो हिशोब मिळाला नाही, म्हणून मी तक्रार दाखल केली. त्यातील एकच वाक्य पकडायचे आणि त्यातील एकच आकडा घ्यायचा आणि ट्वीट करत मोठा राईचा पर्वत बनवायचा. असा खेळ मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी मांडलेला आहे.
माझ्या संस्थेची जी चौकशी होत आहे. तिथे ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत. गेल्या २० वर्षांपासून शिक्षण घेतले आहे. त्या ठिकाणाहून विद्या देण्याचे काम होत आहे. या भागातून मी पाचवेळा खासदार झाली आहे. कदाचित काही लोकांना ते चांगले दिसत नसल्याची प्रतिक्रिया भावना गवळी यांनी दिली.
या भागात भाजपचे एक आमदार आहेत. ते भूमाफिया आहेत. ५०० कोटींचा घोटाळा त्यांनीही केला आहे. केंद्र सरकार त्यांचीही ईडी चौकशी लावणार का? हा माझा प्रश्न आहे. माझी जशी चौकशी सुरु आहे. तशी त्यांचीही चौकशी करावी ही विनंती आहे. केवळ शिवसेनेच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. आणीबाणी लावल्यासारखे दिसत आहे. राजकारणाची पातळी घसरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
No comments:
Post a Comment