Monday, August 30, 2021

शिवसेना खासदार भावना गवळींच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीची छापेमारी

यवतमाळ - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर छापेमारी केली आहे. खासदार भावना गवळी यांनी या कारवाईनंतर भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

यावेळी त्यांनी ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगितले. तसेच भाजप आमदारांच्या मागे ईडी लावणार का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.



भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने आज कारवाई केली असून ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. ईडीचे पथक भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर जिल्ह्यात दाखल झाले आहे. पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.


ईडीची मला कोणतीही नोटीस आलेली नाही. ईडीचे अधिकारी संस्थांवर आले आहेत. ते चौकशी करत आहेत. आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहेत. सर्वच शिवसेनेच्या मंत्री, नेत्यांना जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे. मी स्वत: माझ्या संस्थेचा एफआयआर नोंदवला होता. मला तो हिशोब मिळाला नाही, म्हणून मी तक्रार दाखल केली. त्यातील एकच वाक्य पकडायचे आणि त्यातील एकच आकडा घ्यायचा आणि ट्वीट करत मोठा राईचा पर्वत बनवायचा. असा खेळ मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी मांडलेला आहे.


माझ्या संस्थेची जी चौकशी होत आहे. तिथे ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत. गेल्या २० वर्षांपासून शिक्षण घेतले आहे. त्या ठिकाणाहून विद्या देण्याचे काम होत आहे. या भागातून मी पाचवेळा खासदार झाली आहे. कदाचित काही लोकांना ते चांगले दिसत नसल्याची प्रतिक्रिया भावना गवळी यांनी दिली.


या भागात भाजपचे एक आमदार आहेत. ते भूमाफिया आहेत. ५०० कोटींचा घोटाळा त्यांनीही केला आहे. केंद्र सरकार त्यांचीही ईडी चौकशी लावणार का? हा माझा प्रश्न आहे. माझी जशी चौकशी सुरु आहे. तशी त्यांचीही चौकशी करावी ही विनंती आहे. केवळ शिवसेनेच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. आणीबाणी लावल्यासारखे दिसत आहे. राजकारणाची पातळी घसरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रवासी विमानांवरील निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत वाढवले; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घेतली खबरदारी

मुंबई : भारतातून ये-जा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे.

भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर १७ महिन्यांपासून हे निर्बंध लागू आहेत.

'डीजीसीए'ने रविवारी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जाहीर केला.

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कायम राहतील. त्यापुढील निर्णय कोरोनास्थितीनुरूप घेण्यात येईल. मात्र, मालवाहू (कार्गो) विमानांचे प्रचलन कोणत्याही बांधनांविना सुरू राहील. शिवाय, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवर नियोजित फेऱ्या मर्यादित स्वरूपात चालविण्यात येतील. त्याचा निर्णय 'केस टू केस' तत्त्वावर प्राधिकरणाकडून घेतला जाईल.




तथापि, वंदे भारत अभियान आणि एअर बबल कराराअंतर्गत सुरू असलेली उड्डाणे वेळापत्रकानुसार प्रचलन करतील. सरकारी मापदंडांनुसार पात्र लोक त्या माध्यमातून भारतात ये-जा करू शकतील, असे स्पष्ट केले आहे. भारताने १८हून अधिक देशांशी एअर बबल करार केले असून, त्याअंतर्गत दोन्ही देशांतील प्रमुख विमान कंपन्यांना आठवड्यातून ठराविक दिवस पूर्वनियोजित विमान फेरी चालविण्यास परवानगी देण्यात येते.


निर्बंध न वाढवण्याची होत होती मागणी


भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध आणखी वाढवू नयेत, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेद्वारे करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि काही देशांत डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढू लागल्याने खबरदारी म्हणून डीजीसीएने हा निर्णय घेतल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. २३ मार्च २०२० पासून हे निर्बंध लागू आहेत.

KBCमध्ये सहभागी झाल्यानं अधिकाऱ्याला मोठा आर्थिक फटका; रेल्वेच्या कारवाई संपूर्ण कुटुंब तणावाखाली

कोटा: कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेल्या रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कोटा विभागातील कार्यालय अधीक्षक देशबंधू पांडे यांच्यावर रेल्वे प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. त्यांना चार्जशीट पाठवण्यात आली आहे. याशिवाय ३ वर्षांसाठी त्यांची पगारवाढ थांबवण्यात आली. रेल्वे प्रशासनानं केलेल्या कारवाईला कर्मचारी संघटनेनं विरोध केला आहे. पांडे यांच्याविरुद्ध झालेली कारवाई अयोग्य असल्याचं पश्चिम मध्य रेल्वे मजूर संघाचे सचिव अब्दुल खालिद यांनी म्हटलं आहे. मजूर संघ पांडेवर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देईल, असंही खालिद म्हणाले.




केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी कोटा विभागात कार्यरत असलेले देशबंधू पांडे यांनी ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान मुंबईत होते. यासाठी सुट्टी गरजेची होती. त्यासाठीचा अर्ज पांडे यांनी अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र त्यांच्या अर्जावर कोणताही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सुट्टी मंजूरच झाली नाही. सुट्टी नसताना पांडे केबीसीच्या चित्रीकरणासाठी मुंबईला गेले. पांडेंनी केबीसीमध्ये ३ लाख २० हजार रुपये जिंकले. मात्र ही रक्कम पांडे यांना महागात पडली. रेल्वेनं त्यांचा चार्जशीट पाठवली आहे. पांडे अतिशय घाबरले असून ते या विषयावर भाष्य करायला तयार नाहीत.


केबीसीमध्ये सहभागी होऊन घरी परतलेल्या पांडे यांना १८ ऑगस्टला चार्जशीट पाठवण्यात आली. त्यांची पगारवाढ तीन वर्षांसाठी थांबवण्याचे आदेशही प्रशासनानं दिले. यामुळे केबीसीत ३ लाख २० हजार जिंकणाऱ्या पांडेंच्या आनंदावर विरजण पडलं. रेल्वेनं केलेल्या कारवाईमुळे पांडे आणि त्यांचं कुटुंब तणावाखाली आहे. केबीसीमध्ये सहभागी झाल्यानं त्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पगारवाढ रोखण्यात आल्यानं पांडे यांना जवळपास दीड लाख रुपयांवर पाणी सोडावं लागणार आहे. केबीसीत त्यांनी ३ लाख २० हजार जिंकले. ही रक्कम बक्षिसाची असल्यानं त्यातून कर कापला जाईल.

ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

ठाणे - मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली. पण दुसरीकडे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्याची भूमिका घेत ठाण्यामधील भगवती मैदानामध्ये आज सकाळपासून आंदोलन सुरु केले.




मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जात असतानाच ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव आणि ठाणे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले, तेव्हा उद्धव ठाकरे हाय हाय अशी घोषणाबाजी करण्यात आली.

आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचे पालन करुन साजरा करु द्यावा, अशी मनसेचे मागणी आहे. भगवती मैदानावर यासाठी आज सकाळपासूनच मनसेने तयारी सुरु केली. या मैदानामध्ये स्टेज उभारण्यात येत होता. मात्र सकाळपासूनच पोलिसांनी या ठिकाणी पोलीसबंदोबस्त तैनात केला होता. सव्वा अकराच्या सुमारास येथे पोलिसांच्या मोबाईल व्हॅन्स दाखल झाल्या आणि त्यानंतर जाधव यांच्यासहीत पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी राज ठाकरेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या तसेच उद्धव ठाकरेंविरोधातही घोषणाबाजी झाली.

Friday, August 27, 2021

भारत सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर होणार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा विश्वास



Friday, 27 Aug, 4.19 pm

पुणे : आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उच्च विद्याविभुषित शास्त्रज्ञ आहेत. भारत केवळ सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर बनू शकतो.




तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. संरक्षण संस्था व आधुनिक तंत्रज्ञान (डीआयएटी) संस्थेतील शास्त्रज्ञांकडे पाहून ते नक्की पूर्ण होईल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पुण्यात व्यक्त केला.

पुण्यातील खडकवासला येथील डीआयएटी संस्थेतील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, डीआयएटीचे कुलपती डॉ. सी. पी. रामनारायण आदी उपस्थित होते.


राजनाथसिंह म्हणाले, की भारताने तयार केलेल्या लसीचा आज अनेक जगातील अनेक देशांना फायदा होत आहे. देशात शोध आणि संशोधनाचे वातावरण तयार झाले आहे. संशोधनात भारत पुढे जात आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आपेक्षित आहे. माेठ्या प्रमाणात त्याला चालना मिळून त्यात आणखी गती यायला हवी. भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल पुण्यात दरवर्षी आंतररा‌ष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित व्हायला हव्यात. त्यासाठी डीआयएटी संस्थेने पुढाकार घ्यायला हवा.


आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन एनर्जी आणि बायो सायन्स या विषयात खूप काही करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. विशेष करून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप संशोधनाची गरज आहे. डीआयएटीतील डॉ. पवनकुमार खन्ना, डॉ. भास्कर मुजुमदार व आणखी एक अशा तीन शास्त्रज्ञांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला. २ टक्के ब्रकेटमध्ये त्यांचा समावेश हा आपल्यासाठी गौरवाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार राजनाथसिंह यांनी यावेळी काढले.


'आय-डेक्स'फौजीसाठी १ हजार कोटींची तरतुद

केंद्र सरकारने संरक्षणाच्या दृष्टीने इनोव्हेशन व डिफेन्स एक्सलन्ससाठी (आय-डेक्स फॉर फौजी) बाहेरून खरेदीसाठी तब्बल एक हजार कोटी रूपयांची तरतुद केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी तरतुद करण्यात आली. त्याचबरोबर डिफेन्स आणि एअरोपेस क्षेत्रात इनोव्हेशनसाठी ३०० स्टार्टअपला सहाय्य करण्यासाठी मदत करण्यात येत आहे. त्यासाठी ५०० कोटी रूपयांचा निधी वेगळा देण्यात आला. 

----

'डीआयएटी'ला कोविडचे ९ पेटंट

पुण्यातील डीआयएटी संस्थेने कोविड-१९ संदर्भात सखोल संशोधन केले आहे. त्यासाठी ९ पेटंट मिळाले आहेत. ही गौरवाची बाब असून भारतातील अनेक उद्योग त्याचा वापर करू लागले आहेत, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले.

एकनाथ खडसेंना सर्वात मोठा धक्का, एवढ्या कोटी रुपयांची संपत्ती जप्त

मुंबई | भोसरी MIDC मधील जमीन खरेदी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे.



या मालमत्तांची एकूण किंमत 5 कोटी 73 लाख रुपये असल्याची माहिती समजत आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. एका प्रकरणात तर खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने एकनाथ खडसे यांच्या मालमत्तांच्या जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांच्या लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ताचा समावेश असून मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे.


ईडीच्या आरोपानुसार 2016 मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथे एक भूखंड खरेदी केला होता. हा भूखंड MIDC च्या मालकीचा होता. त्यावेळी या भूखंडाचा बाजारभाव 31 कोटी रुपये होता, मात्र अवघ्या 3 कोटी रुपयांमध्ये हा भूखंड विकत घेण्यात आला होता. खडसे यांनी स्वतःच्या अधिकारपदाचा गैरवापर केल्याचा आरोप यामुळेच केला जात आहे.


भोसरीतील भूखंड इतक्या कमी किंमतीत घेण्यासाठी व्यवहार कसा काय झाला? गिरीश चौधरी यांनी हा भूखंड विकत घेण्यासाठी गोळा केलेले 3 कोटी रुपये नेमके कुठून आले?, यासह इतर काही मुद्द्यांचा ईडीकडून तपास केला जात आहे. आगामी काळात या प्रकरणात ईडी काय कारवाई करणार हे पहावं लागेल.

Thursday, August 26, 2021

ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखावर शाखेतच हल्ला; पोलिसांना 'हा' संशय

ठाणे: शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर शिवसेना शाखेतच हल्ला करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी रात्री ८.३० वाजता ठाणे येथील श्रीरंग सोसायटी भागात घडला. हल्लेखोराने चॉपरने तीन ते चार वार केल्याने जयस्वाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ( Thane Shiv Sena Vibhag Pramukh Attacked )



श्रीरंग सोसायटीजवळ असलेल्या शिवसेनेच्या शाखेत हा प्रकार घडला असून हल्ला नेमका कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. जयस्वाल यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्लेखोरही जखमी असल्याचे समजते. आपआपसातील भांडणातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



हल्लेखोराला स्थानिकांनी पकडले

ठाणे पोलिसांनी या हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या हल्ल्यात अमित जयस्वाल यांच्या कानाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराला तिथे उपस्थित असणाऱ्यांनी पकडले असून त्याला मारहाणही करण्यात आली आहे. त्यात जखमी असलेल्या हल्लेखोराला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची ओळख पटली आहे. मात्र तूर्त ओळख उघड करण्यात येत नसल्याचे पोलीस सूत्रांकडून नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जयस्वाल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...