Thursday, July 29, 2021

अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचा तपास वेगात सुरू; 12 ठिकाणी छापेमारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या गावात चौकशी

 अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचा तपास वेगात सुरू; 12 ठिकाणी छापेमारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या गावात चौकशी


मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढताना दिसत असून सीबीआयने तपास चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सर्वांत मोठी छापेमारी मोहिम राबवली आहे. अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआय मार्फत करण्यात आली आहे.



सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी राज्यात 12 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले. त्यासोबतच यासह सीबीआयनंही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासह काही जागांवर छापे टाकले.


राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सांगली आणि अहमदनगर येथे सीबीआय अधिकाऱ्यांनी छापे टाकत सर्च ऑपरेशन राबवले.

आजतक/ इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयितांव्यतिरिक्त मुंबई आणि अहमदनगरमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या जागेंची झडती घेण्यात आली. राजू भुजबळ हे समाजसेवा शाखेचे प्रभारी होते आणि एसीपी संजय पाटील हे देखील त्याच शाखेशी संबंधित होते. भुजबळ आणि पाटील यांचीही ईडीने चौकशी केली होती. दरम्यान या प्रकरणातील संशयितांना सीबीआय अटकही करू शकते, अशी माहिती मिळाली आहे.




बुधवारी 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडी (ED) च्या अधिकाऱ्यांनी अहमदनगर मध्ये चौकशी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी राजू भुजबळ अधिकाऱ्याच्या गावात जाऊन त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. मुंबई पोलिसांत उपायुक्त पदावर कार्यरत असलेले राजू भुजबळ यांचे मुळ गाव अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात आहे. बुधवारी या ठिकाणी ईडीचे पथक दाखल झाले आणि त्यांचा जबाब नोंदवला. या बाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती नसून दोन वाहनांमधून हे अधिकारी आले होते.

Wednesday, July 28, 2021

इंजिनीअरिंगच्या १.४६ लाख जागा झाल्या कमी; दशकभरातील सर्वाधिक कपात, ६३ शिक्षणसंस्था बंद

 मुंबई : गेल्या दहा वर्षांतील इंजिनीअरिंगच्या जागांमधील सर्वांत मोठी कपात यंदा झाली आहे. इंजिनीअरिंगच्या १.४६ लाख जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे जागांचा एकूण आकडा २३.२८ लाख झाला.


यंदा विद्यार्थ्यांअभावी तसेच अन्य कारणांनी ६३ इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद होणार आहेत. अशी स्थिती २०१५-१६ सालानंतर उद‌्भवली आहे. त्या वर्षी इंजिनीअरिंगच्या जागांमध्ये मोठी कपात झाली होती. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) या संस्थेने म्हटले की, जागांमध्ये यंदा मोठी कपात झाली असली तरी तंत्रशिक्षण घेणाऱ्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांत आजही ८० टक्के विद्यार्थी इंजिनीअरिंग शाखेचे आहेत.



२०१५-१६ सालापासून दरवर्षी किमान ५० इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद पडत आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे शिक्षणसंस्था बंद करण्याचा आदेश देण्यात आला नाही. यंदा ६३ इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आतापर्यंत ४०० शिक्षणसंस्था पडल्या बंद

२०१४-१५ साली देशभरात इंजिनीअरिंगचे ३२ लाख विद्यार्थी होते. मात्र या शाखेची मागणी कमी झाल्याने त्या वेळेपासून आतापर्यंत सुमारे ४०० इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद पडल्या आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ५२ नव्या इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था सुरू करण्यास एआयसीटीईने परवानगी दिली आहे. या संस्थेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, देशाच्या मागास भागात नवीन शिक्षणसंस्था उघडण्यासाठी केंद्राने संमती दिली आहे. २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांमध्ये अनुक्रमे १४३, १५८, १५३ नव्या इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था उघडण्यास परवानगी देण्यात आली.


विद्यार्थ्यांची झाली फसवणूक

बंद झालेल्या शिक्षणसंस्थांपैकी काही ठिकाणी योग्य शैक्षणिक सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा नव्हत्या. अध्यापकही अपुरे होते. अशाही स्थितीत या शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची फसवणूक करीत होत्या. अशा संस्था बंद होणे ही इष्टापत्तीच आहे, असे शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले आहे.

शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात!


ठाकरे सरकारकडून पालकांना दिलासा ; राज्य मंत्रीमंडळात निर्णय 

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाची आज(२८ जुलै) बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. १५ टक्के फी कपातीचा राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे.मागील वर्षभरापासून कोरोना महामारीत शाळा बंद असताना सुद्धा शाळांनी फी वाढवल्याचा तर काही शाळांनी फी वसुली करण्याबाबतच्या तक्रारी पालकांकडून सातत्याने पुढे येत होत्या या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



कोरोना परिस्थितीमुळे शालेय शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चालू आहे. या परिस्थितीत पालकांकडे फीसाठी तगादा लावण्यापेक्षा शाळेनी फी भरण्याचं स्ट्रक्चरच असं केलं पाहिजे, जेणेकरुन एकही विद्यार्थी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. शाळा ऑनलाईन असल्याने किमान १५ टक्क्याने फीमध्ये कपात केली गेली पाहिजे, असं सुप्रिम कोर्टाने सुचवलं होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी शाळांचीफी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. मात्र कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद आहेत, त्यामुळे या कालावधी पुरता फी कपातीचा अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचे या अध्यादेशाद्वारे प्रस्तावित असल्याची माहिती आहे.


कोरोना पार्श्वभूमीवर आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिलेत. यावर ३ आठवड्यात आदेश देण्याचंही न्यायालयाने २२ जुलै रोजी सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण करणाऱ्या शाळा व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी व नेते वर्गाला दणका देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, असं मत याचिकाकर्ते पालक जयश्री देशपांडे आणि प्रसाद तुळसकर यांनी व्यक्त केलंय.

वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार,ऊर्जामंत्री यांची घोषणा


मुंबई : पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.या घोषणेद्वारे पूरग्रस्त भागातील नागरिकांना ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे.अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या रायगड जिल्ह्यासह कोकणातील वीज पुरवठा यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत.रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पेण महाड,नागोठणे येथील पूरग्रस्त भागांची आणि महावितरण व महापारेषण यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. 




महाड तालुक्यातील वीज यंत्रणेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महाड येथे सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे पडलेल्या उच्चदाब वाहिनीच्या टॉवरच्या ठिकाणी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज यंत्रणा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पूरपरिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेली कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याची पावती त्यांनी दिली. यानंतर ऊर्जामंत्री यांनी राजावाडी तसेच विरेश्वर गावातील बाधित झालेल्या विद्युत यंत्रणेची पाहणी केली.तसेच महापारेषण अतिउच्चदाब केंद्राची पाहणी केली.

महावितरण,महापारेषणच्या कर्तव्यदक्ष आणि धाडसी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरू केला.वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर विद्युत विभाग करत आहे. नदी पात्रात मगरींचे वास्तव्य असतानादेखील आमचे कर्मचारी पाण्यात पोहत वीज खांबावर चढून वीज यंत्रणा पुन्हा उभारणीचे काम करत आहेत.त्यांना मी सलाम करतो, त्यांच्या या कामगिरीमुळे आमची छाती अभिमानाने फुलून आली असे गौरवोद्गार डॉ.राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांप्रति काढले.


पूरग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक भाग प्रकाशमान केले आहेत.बाधित झालेल्या १३०८ वितरण रोहित्रांपैकी २६१,तर ४७१ पाणीपुरवठा योजनांपैकी २९ तर ८ कोविड हॉस्पिटल/ व्हॅक्सीनेशन सेंटरपैकी ३, तसेच ८३ मोबाईल टॉवरपैकी १९ असे एकूण ३५,५६० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.

भारतीय बॅडमिंटनचे महर्षी हरपले! नंदू नाटेकर यांचं निधन

पुणे : दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन झालं आहे. ते 88 वर्षांचे होते.अर्जुन पुरस्कार मिळवलेले ते पहिले खेळाडू होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्या दशकात क्रीडा क्षेत्र गाजवलेल्या खेळाडूंमध्ये नाटेकर यांचा समावेश होता. नाटेकर यांनी राष्ट्रीय ज्यूनिअर टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचे त्यांनी उपविजेतेपद देखील पटकावले होते. टेनिस आणि बॅडमिंटन या दोन्ही खेळावर समान प्रभुत्व असलेल्या नाटेकर यांनी नंतर करिअर म्हणून बॅडमिंटनची निवड केली.


सांगलीमध्ये जन्म झालेल्या नाटेकर यांनी वयाच्या 20 व्या वर्षी 1953 साली सर्वप्रथम देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1954 मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती.

विदेशात बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी 1956 साली मलेशियातील स्पर्धेत ही ऐतिहासिक कामगिरी केली.



नाटेकर यांनी थॉमस कप स्पर्धेतही ठसा उमटवला होता. या स्पर्धेतील एकेरीच्या 16 पैकी 12 तर दुहेरीच्या 16 पैकी 8 लढती त्यांनी जिंकल्या. या स्पर्धेत त्यांनी तीन वेळा भारताचे नेतृत्त्व देखील केले होते. बॅडमिंटन क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना 1961 साली अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले क्रीडापटू होते.

बारावीच्या मूल्यमापनाचे काम पूर्ण तीन दिवसात निकाल लागण्याची शक्यता

Mumbai : येत्या तीन दिवसांमध्ये बारावीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचे काम का जवळपास पूर्ण झालेले आहे. अशी माहिती विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.



कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा जून महिन्यात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु पुढच्या महिन्यातच मूल्यमापन कार्यपद्धती ठरवण्यात आली. आणि याच मूल्यमापनाच्या आधारावर बारावीचा निकाल लावण्याचा मंडळाने निर्णय घेतला. आता कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्राचार्यांकडून अंतर्गत मूल्यमापन करण्याचे कामकाज 99 टक्के पूर्ण झाले आहे.

यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून 13 लाख 23 हजार 698 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 13 लाख 22 हजार 249 विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पूर्ण झाले आहे. राज्यातील बारावीचा निकाल 31 जुलै पूर्वी जाहीर होईल असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असून अगोदरच शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर केला जाऊ शकतो असे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tuesday, July 27, 2021

नाशिक, पुणेनंतर आता ठाणे महापालिकेसाठी मनसेची तयारी सुरु, सीकेपी हॉलमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक

ठाणे : नाशिक आणि पुणे पाठोपात मनसे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे. या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मुख्य अजेंडा ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत मोठे फेरबदल होण्याचे संकेतही दिले जात आहेत. दरम्यान, ठाण्यात मनसेचा सध्या एकही नगरसेवक नाही. अशावेळी ठाणे महापालिकेसाठी होणारी मनसेची ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

(Raj Thackeray's meeting with MNS party workers in Thane)




ठाण्यातील CKP हॉलमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत. या संवादात ते पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हेच पाहणं गरजेचं आहे. ठाण्यात गेली अनेक वर्षे मनसेचा लोकप्रतिनिधी म्हणून पालिका स्थरावर कुणीही दिसून आलेला नाही. त्यामुळे पक्षाला लागलेली गळती कशी भरून निघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच भाजप बरोबर जवळीकीचा विचार याकडेदेखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाणे शहरात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी बॅनरबाजी आणि मनसेचे झेंडे लावण्यात आले आहेत.


पुण्यात राज ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठका


दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा 'राजसंवाद' हा दौरा सुरु आहे. दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून राज ठाकरे मॅरेथॉन बैठका घेत आहे. मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली जात आहे.


मनसे शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफर


दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.


45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा


दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.


भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...