ठाणे : नाशिक आणि पुणे पाठोपात मनसे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे. या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मुख्य अजेंडा ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत मोठे फेरबदल होण्याचे संकेतही दिले जात आहेत. दरम्यान, ठाण्यात मनसेचा सध्या एकही नगरसेवक नाही. अशावेळी ठाणे महापालिकेसाठी होणारी मनसेची ही बैठक महत्वाची ठरणार आहे.
(Raj Thackeray's meeting with MNS party workers in Thane)
ठाण्यातील CKP हॉलमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत. या संवादात ते पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हेच पाहणं गरजेचं आहे. ठाण्यात गेली अनेक वर्षे मनसेचा लोकप्रतिनिधी म्हणून पालिका स्थरावर कुणीही दिसून आलेला नाही. त्यामुळे पक्षाला लागलेली गळती कशी भरून निघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच भाजप बरोबर जवळीकीचा विचार याकडेदेखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाणे शहरात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी बॅनरबाजी आणि मनसेचे झेंडे लावण्यात आले आहेत.
पुण्यात राज ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठका
दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा 'राजसंवाद' हा दौरा सुरु आहे. दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून राज ठाकरे मॅरेथॉन बैठका घेत आहे. मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली जात आहे.
मनसे शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफर
दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.
45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा
दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.
No comments:
Post a Comment