Wednesday, July 28, 2021

इंजिनीअरिंगच्या १.४६ लाख जागा झाल्या कमी; दशकभरातील सर्वाधिक कपात, ६३ शिक्षणसंस्था बंद

 मुंबई : गेल्या दहा वर्षांतील इंजिनीअरिंगच्या जागांमधील सर्वांत मोठी कपात यंदा झाली आहे. इंजिनीअरिंगच्या १.४६ लाख जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे जागांचा एकूण आकडा २३.२८ लाख झाला.


यंदा विद्यार्थ्यांअभावी तसेच अन्य कारणांनी ६३ इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद होणार आहेत. अशी स्थिती २०१५-१६ सालानंतर उद‌्भवली आहे. त्या वर्षी इंजिनीअरिंगच्या जागांमध्ये मोठी कपात झाली होती. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) या संस्थेने म्हटले की, जागांमध्ये यंदा मोठी कपात झाली असली तरी तंत्रशिक्षण घेणाऱ्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांत आजही ८० टक्के विद्यार्थी इंजिनीअरिंग शाखेचे आहेत.



२०१५-१६ सालापासून दरवर्षी किमान ५० इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद पडत आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे शिक्षणसंस्था बंद करण्याचा आदेश देण्यात आला नाही. यंदा ६३ इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आतापर्यंत ४०० शिक्षणसंस्था पडल्या बंद

२०१४-१५ साली देशभरात इंजिनीअरिंगचे ३२ लाख विद्यार्थी होते. मात्र या शाखेची मागणी कमी झाल्याने त्या वेळेपासून आतापर्यंत सुमारे ४०० इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद पडल्या आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ५२ नव्या इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था सुरू करण्यास एआयसीटीईने परवानगी दिली आहे. या संस्थेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, देशाच्या मागास भागात नवीन शिक्षणसंस्था उघडण्यासाठी केंद्राने संमती दिली आहे. २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांमध्ये अनुक्रमे १४३, १५८, १५३ नव्या इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था उघडण्यास परवानगी देण्यात आली.


विद्यार्थ्यांची झाली फसवणूक

बंद झालेल्या शिक्षणसंस्थांपैकी काही ठिकाणी योग्य शैक्षणिक सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा नव्हत्या. अध्यापकही अपुरे होते. अशाही स्थितीत या शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची फसवणूक करीत होत्या. अशा संस्था बंद होणे ही इष्टापत्तीच आहे, असे शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...