कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे केईएममधील सशुल्क सेवा विभाग सुरू
मुंबई: कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे केईएमधील रुग्णांसाठी पुन्हा एकदा सशुल्क सेवा सुरू करण्यात येणार असल्यामुळे मध्यमवर्गातील रुग्णांना या सेवेचा फायदा घेता येणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) केईएमध्ये दिलेल्या देणगीच्या माध्यमातून एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. या विभागात प्रतिखाट २०० रुपये शुल्क आकारून रुग्णांना सेवा दिली जाते. ही सेवा जवळपास तीन दशकांहूनही अधिक काळ सुरू आहे. रुग्णालयातील अन्य रुग्णांप्रमाणेच सर्व उपचार या रुग्णांना मिळतात. तेथे रुग्णांना राहण्याची आणि नातेवाईकांना थांबण्यासाठी सोय असते.
हा विभाग कोरोना काळात कार्यरत नव्हता. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यावर एसबीआय विभागात मज्जारज्जूंशी संबंधित आजारांचा विभाग (न्युरोलॉजी) हलविण्यात आला होता. जुलै २०२१ मध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यावर हा विभाग पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू झाला. केईएमध्ये काही विभाग रुग्णांसाठी सशुल्क उपलब्ध करण्याचा प्रस्तावही त्यावेळी मांडण्यात आला आल्याचे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
केईएमध्ये पैसे आकारून प्रत्येक वॉर्डमध्ये दोन खोल्यांमध्ये सेवा देण्याची सुविधा होती. यात एका खोलीत एक किंवा दोन खाटा होत्या. यामध्येही अनेक मध्यमर्गीय रुग्ण उपचार घेत होते. कोरोनाकाळात खाटांची संख्या कमी पडायला लागल्यामुळे हे विभाग बंद केले. त्यावेळी रुग्णांचा भार असल्यामुळे अशी स्वतंत्र सेवा देणे शक्य नव्हते. या खोल्यांचा वापर पीपीई कीट घालणे आणि काढणे यासाठी केला जाऊ लागला. कोरोना कमी झाल्यानंतर या खाटाही सुरू करण्याचे प्रस्तावित केले होते, असे देशमुख यांनी सांगितले. आता पुन्हा एसबीआय विभाग सुरू केला जाणार आहे. यामध्ये १७ खाटा असतील. हा विभाग पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि अन्य उपाययोजना केल्या जात असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
एकीकडे खासगी रुग्णालयातील दर परवडणारे नाहीत आणि दुसरीकडे मोफत सेवा देणाऱ्या पालिकेच्या रुग्णालयांमधील गर्दीमुळे मध्यम वर्गाची कुचंबणा होते. एसबीआय विभागामध्ये अनेक मध्यमवर्गीय रुग्ण दाखल होऊन सेवा घेतात. परंतु क्ष किरण, सोनोग्राफी, रक्ताच्या तपासण्या करण्यासाठी या रुग्णांना अन्य रुग्णासोबतच रांगेत राहावे लागत होते. हे गैरसोयीचे असल्यामुळे रुग्ण अनेकदा तक्रार करायचे. या सोयीदेखील पैसे आकारून उपलब्ध कराव्या. खरतर मध्यमवर्गीयांसाठी खासगी रुग्णालयाच्या तुलनेत कमी पैसे आकारून सेवा देणारी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. ही सध्या शहराची गरज असल्याचे मत पालिकेच्या प्रमुख रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment