भाजी, चिकन घ्यायला गेलात तरी ईडीला कळवतील, संजय राऊत यांचा भाजपला टोला
मुंबई : महाविकास आघाडीच्या सगळ्या मंत्र्यांनी मविआतील प्रत्येक घटकाचं जाणीवपूर्वक ऐकलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे अशी भूमिका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.
मंगळवारी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यामध्ये त्यांना सोमवारी शिवसेनेच्या खासदारांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. सरकार 3 पक्षाचे आहे एका पक्षाचे नाही. आपण एका पक्षाचे पालकमंत्री असलो तरी खाली अन्य दोन पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्षे राजकीय काम करत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे राऊत यांनी म्हटले आहे. तुमच्या बोलण्याचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे का ? असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी म्हटले की, हा इशारा सगळ्या पालकमंत्र्यांसाठी आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे खासदार विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंवाद दौऱ्यासाठी गेले होते. जिल्हा परिषदेच्या 'गटा'पर्यंत ते पोहोचले होते. या दौऱ्यात शिवसेना खासदारांनी संघटनात्मक बांधणीबाबतची माहिती गोळा केली असून त्यांनी त्याबाबतचे अहवाल तयार केले आहेत. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे सगळ्या खासदारांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या संघटनात्मक त्रुटींबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. काही ठिकाणी अधिक मजबुतीने काम करावं लागेल आणि सरकार म्हणून सामान्य शिवसैनिकापर्यंत पोचावं लागेल असं राऊत यांनी म्हटलं आहे. हे सरकार माझं आहे, आपलं आहे असं शिवसैनिकाला वाटलं पाहिजे, असे ते पुढे म्हणाले. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की , 'आज परिस्थिती अशी दिसते की दुसऱ्या पक्षाचा पालकमंत्री हा अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतो. या तक्रारी कॉमन आहेत. त्यावर एकत्र बसून सूचना द्याव्या लागतील. सरकार 3 पक्षाचे आहे एका पक्षाचे नाही. आपण एका पक्षाचे पालकमंत्री असलो तरी खाली अन्य दोन पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्षे राजकीय काम करत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा सगळ्या पालकमंत्र्यांसाठी इशारा आहे.'
भाजी,चिकनवरही भाजपचं लक्ष
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील जनतेलाही ईडीची धमकी दिली होती. एका शिक्षण संस्थेतील विद्यार्थी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेत असून पेटीएमद्वारे मतदारांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करून मत विकत घेतले जाणार असल्याचा आरोप पाटील यांनी महाविकास आघाडीवर केला होता. पाटील एवढय़ावरच थांबले नाहीत तर तुमच्या खात्यात प्रतिव्यक्ती एक हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचे आढळल्यास तुमचीही ईडीकडून चौकशी करायला लावू. तेव्हा महाविकास आघाडीला मत दिलेत तर याद राखा, अशी धमकी पाटील यांनी मतदारांना दिली होती. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात पैसे जपून खर्च करा. तुम्ही भाजी जरी विकत घ्यायला गेला तरी भाजपचं तुमच्यावर लक्ष आहे. चिकनच्या दुकानाच्या रांगेत गेला तर काल किती चिकन घेतलं, आज किती घेतलंत यावरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे. ते ताबडतोब ईडीला कळवतील. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं सावध राहायला हवं.'
भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांच्या सूचना
भाजपने मशिदीवरील भोंग्यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्यामध्येही भोंगे उतरलेले नाही. गोवा, उत्तर प्रदेशातही मशिदीवरील भोंगे आहे तसे आहेत. महाराष्ट्रात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांसदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून त्यांचं पालन होणं गरजेचं आहे असे राऊत यांनी सांगितले.