गावदेवी वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार
ठाणे : ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत गावदेवी मैदानात उभारण्यात येणाऱ्या भूमिगत वाहनतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सांगितलं. ठाणे रेल्वे स्थानक, गावदेवी परिसरात नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी वा चारचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीला अडथळा होऊन सातत्याने कोंडी होत असते. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत हे काम प्रगतीपथावर असून आज महापालिका आयुक्तांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. गावदेवी वाहनतळ हे ४ हजार ३३० चौरस मीटरचे असून त्यामध्ये १३० चारचाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे. या वाहनतळामध्ये कार लिफ्ट, विद्युत तसेच इतर किरकोळ कामे अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होऊन वाहनतळ नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.
No comments:
Post a Comment