आम्ही 'ठाकरे' चित्रपट टॅक्स फ्री केला नाही, 'द कश्मीर फईल्स'वरुन संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
मुंबईः 1990च्या काश्मीर नरसंहारावर आधारित 'द कश्मीर फाईल्स'(The Kashmir Files) चित्रपटावरुन बराच रोजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे.
महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी विधानसभेत केली होती. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''द कश्मीर फईल्स' काय घेऊन बसलात? आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरही 'ठाकरे' हा सिनेमादेखील महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नाही. अशाप्रकारची मागणीही कधी केली नाही,'' असं संजय राऊत म्हणाले.
'द काश्मीर फईल्स' चित्रपटावरुन सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात लावून धरली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी विधानसभेत बोलताना 'मिशन मंगल', 'तानाजी', 'पानिपत' हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करुन दिली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हा चित्रपट करमुक्त करावा, असे म्हटले.
संजय राऊत काय म्हणाले?
विधानसभेत अजित पवारांनी भाजपची कोंडी केली, तर आज संजय राऊतांनीही भाजपला घेरले. ''आता त्यांना काश्मीर आठवले आहे. नरेंद्र मोदी म्हणाल्यानुसार आम्ही पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात येतोय, त्याची वाट पहात आहोत. काश्मीरी पंडितांना शस्त्र द्या, असे बाळासाहेब परखडपणे म्हणाले होते. मात्र, आम्ही कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे. विरोधकांनी त्या चित्रपटावरुन राजकारण करू नये,'' असे राऊत म्हणाले.
'बाळासाहेबांनी काश्मीरसाठी खूप काही केलं'
राऊत पुढे म्हणतात की, ''काश्मीर प्रकरणावर आम्ही कधीच राजकारण केले नाही. दहशतवादी अमरनाथ यात्रेत धमकी देत होते, तेव्हा केंद्र सरकार कुठे होते. कोणाच्या केसालाही धक्का लागला, तर तुमचे विमान हजपर्यंत उडणार नाही, अशी धमकी देणारे बाळासाहेब पहिले नेते होते. महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के राखीव जागा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरसाठी जे केले ते कोणीच केले नाही. पण आम्ही चित्रपट काढून प्रचार केला नाही, राजकारण केले नाही. त्यामुळे कोणत्या विषयाचे राजकारण करायचे त्याचे भान विरोधी पक्षाला नसेल तर लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे,'' अशी टीका यावेळी त्यांनी केली.
No comments:
Post a Comment