Tuesday, September 7, 2021

उपवास करणं आरोग्यासाठी लाभदायक की हानिकारक? पाहा काय सांगतात तज्ज्ञ

नवी दिल्ली 07 सप्टेंबर : कोणत्याही सजीवाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची (Food) गरज असते, तसंच आरोग्य चांगलं राहण्यासाठी पोषक तत्त्वांची (Nutrients) गरज असते.

आठवड्यातून एक दिवस उपवास (Fasting) करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांत रूढ झाली आहे. भारतीय संस्कृतीत व्रताच्या निमित्ताने उपवास करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे; मात्र आता अनेक विशेषज्ञही उपवास करण्याला प्रोत्साहन देऊ लागले आहेत.



इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तातल्या उल्लेखानुसार, होलिस्टिक लाइफस्टाइल कोच (Holistic Lifestyle Coach) ल्यूक कुटिन्हो म्हणतात, 'सगळ्या धर्मांमध्ये उपवासाला महत्त्व आहे. आरोग्य (Health) आणि अध्यात्म या दोन्हींसाठी उपवास लाभदायक आहे. उपवास म्हणजे उपाशी राहणं नव्हे किंवा आपल्याकडे काही खाद्यपदार्थ नाहीयेत म्हणून काही न खाणं असं नव्हे, तर उपवास म्हणजे एक शिस्तशीर पद्धत आहे. त्या माध्यमातून आपण शरीर आणि पचनसंस्था (Digestive System) या दोन्हींनाही थोडी विश्रांती देतो; उपवासामुळे शरीरातली ऊर्जा पुनरुज्जीवित होते. उपवासामुळे शरीरातले विषारी घटक (Toxic Elements) बाहेर पडण्यास मदत होते.


'अनाहत ऑरगॅनिक'च्या संस्थापिका राधिका अय्यर तलाती यांनी इन्स्टाग्रामवर उपवासाबद्दल माहिती दिली आहे आणि एका व्हिडिओद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे. 'उपवासाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी तर त्याचा उपयोग होतोच; पण मेंदू अधिक उत्तम पद्धतीने काम करू लागतो. मी गेल्या 11 वर्षांपासून उपवास करते. त्यामुळे माझं वजन अनेक किलोग्रॅम्सनी घटवण्यात यश आलं आहे. मी आता पहिल्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे. माझी बुद्धी आता पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने काम करते. माझ्या शरीराची पाणी धारण करण्याची क्षमता वाढली आहे. पचनशक्ती सुधारली आहे. पूर्वी माझ्या त्वचेला अॅलर्जी यायची. आता ती अॅलर्जी (Allergy) गायब झाली आहे. चेहऱ्यावर तेज आलं असून, केसही चांगले वाढू लागले आहेत,' असं राधिका यांनी सांगितलं.


राष्ट्रीय पोषण सप्ताह: कोणत्या वयात कसा असावा आहार? वेगवेगळा असतो Diet Plan


'अनेक जण केवळ बोअर होतं म्हणून खातात, हे मी अनुभवलं आहे. अशा अनेक व्यक्तींना मी काही काळ उपवास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. त्यांच्या जीवनात त्यामुळे बदल घडून आला आहे,' असंही राधिका यांनी सांगितलं.


कोटिन्हो यांनी सांगितलं, 'उपवास सगळ्यांना लाभदायक ठरतो असं नाही, जमतो असं नाही किंवा आवडतो असं नाही; पण उपवासाची अनेक रूपं, अनेक प्रकार आहेत. आपल्याला जमेल त्या प्रकारचा उपवास करू शकता. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये (Intermittent Fasting) खाण्याबद्दलचा कोणताही नियम न पाळता काही कालावधीनंतर उपवास केला जातो. ड्राय फास्टिंगमध्ये (Dry Fasting) पाणीही न पिता उपवास केला जातो.'

एकंदरीत पाहता डाएटिशियनच्या सल्ल्याने उपवास केला तर शरीराला लाभदायकच ठरतं.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...