नाशिक - गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चेत असणाऱ्या आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू नाशिक येथे पोहचले होते. हा लव्ह जिहाद नसून या दोघांचा विवाह सोहळा पार पडणारच असं बच्चू कडूंनी ठणकावून सांगितलं होतं. तसेच, लग्नाला विरोध करणाऱ्यांनाही सज्जड दम भरला होता.
त्यामुळे या लग्नसोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, अखेर त्या लग्नाचा पेच कायमचा मिटला असून तो लग्नसोहळा आता रद्द झाला आहे.
सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा मुलगा आसिफ यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला. या विवाहाला काही लोकांनी विरोध केला. त्यानंतर बच्चू कडू यांनी दोन्ही कुटुंबीयांना पाठिंबा दिला. धर्म न बदलता विवाह करत असतील तर इतरांनी लुडबूड का करायची? ही काळाची गरज आहे. कोणत्याही गोष्टीला जातीधर्माचे वळण लावले जाते असं बच्चू कडू यांनी म्हटले होते. तसेच रसिकाच्या लग्नात मी उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता हा लग्नसोहळा रद्द झाल्याने बच्चू कडूंचं ते स्वप्न अपूर्णच राहिलं, असं म्हणावं लागेल.
नाशिकच्या चांडक सर्कलवरील एका हॉटेलात ठरलेला हा विवाह सोहळा अखेर रद्द झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे. यासंदर्भात मुलीच्या पालकांनी सांगितले की, समाजाला दिलेले पत्र व शब्द आम्ही पाळला. त्यामुळेच हा विवाह सोहळा रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. तर, पालकांनी दाखवलेल्या सामंजस्याबद्दल समाजातील काही नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी लग्नास दर्शवलेल्या पाठिंब्यामुळे अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार ठरलेल्या तारखेला विवाह होतो का?, झाला तर विवाहस्थळी राडा तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

No comments:
Post a Comment