भिवंडी : भिवंडी शहरातील नागरिकांना महानगर पालिकेच्यावतीने पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला गेल्या काही दिवसापासून गढूळ व माती मिश्रीत दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुषित पाण्यामुळे महिला व मुलांसह नागरिकांना जुलाब उलट्यासारखे आजार भेडसावू लागले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
मात्र मनपा प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
भिवंडी शहरातील अंजूरफाटा, कामतघर, पारनाका बाजारपेठ, कासार आळी, कुंभार आळी, दर्गारोड, आझमीनगर, गौरीपाडा, शांतीनगर, बंगालपूरा, निजामपूरा, गैबीनगर, शांतीनगर, खंडूपाडा, गायत्रीनगर, घुंघटनगर अशा विविध कामगार लोकवस्ती असलेल्या भागात गेल्या काही दिवसांपासून गढूळ व माती मिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
पालिकेच्या पाणी पुरवठा विभागास तक्रारी करून सुद्धा सराईतपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. दूषित पाण्यामुळे अनेक महिलांसह लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांना जुलाब व उलट्या सारखे प्रकार होत आहेत. त्यातच सर्दी खोकल्याची साथ देखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आरोग्याच्या समस्यांमुळे नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे.
शहरात पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन या मुख्य रस्त्यावरून तर काही गटारातून गेलेल्या आहेत. सध्या शहरातील रस्त्यांना खड्डे पडल्याने या रस्त्यांमधील नळाच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून दुषीत पाणी पालिकेच्या मुख्य प्रवाहातील जलवाहिनीत जात असल्याने नळाला दुषित पाणी येत आहे. याबाबत महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लक्ष द्यावे आणि नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी भिवंडी जन संघर्ष समीतीच्यावतीने करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment