ठाणे : आयसीआयसीआय बँकेत घुसून दोन महिला कर्मचाऱ्यांवर माजी मॅनेजरने चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी विरार येथील मनवेलपाडा सबवेजवळ घडली. या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुसऱ्या महिला कर्मचाऱ्यास जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल केले आहे.
बेफाम झालेल्या या माजी मॅनेजरला पोलिसांनी अटक केली असून त्याने बँकेतील रोख रक्कम तसेच दागिनेही लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली आहे.
आयसीआयसीआय बँकेत गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बॅकेचा माजी मॅनेजर शिरला. त्यानंतर त्याने तेथील लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला.
बँकेतील दोन महिला कर्मचाऱ्यांनी त्याला चोरी करण्यापासून अटकाव केला. मात्र त्याने आपल्याकडील धारदार शस्त्राने दोघींवर प्राणघातक हल्ला केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या जखमी महिला कर्मचाऱ्यास संजीवनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हा थरारक प्रकार समजताच विरार पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment