मुंबई : सध्याच्या काळात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कोरोना काळात तर यात अधिकच वाढ झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. परंतु सोशल मीडिया, इंटरनेटच्या वाढत्या वापरादरम्यान पालकांना आपल्या मुलांच्या विकासावर या सोशल मीडियाचा काय परिणाम होतो, हे माहित करुन घेणं आवश्यक आहे. याबाबतच राष्ट्रीय बाल सुरक्षा आयोग अर्थात NCPCR ने केलेल्या अध्ययनात मोठा खुलासा झाला आहे.
पालकांकडून लहान मुलांना दिला जाणारा मोबाईल त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. केवळ दहा वर्षांची मुलंदेखील इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडियावर अकाउंट तयार करत आहेत.
याबाबत राष्ट्रीय बाल सुरक्षा आयोगाने धक्कादायक आकडे जारी केले आहेत. देशातील 6 राज्यात केल्या गेलेल्या सर्व्हेनुसार, 10 वर्ष वयोगटातील 38 टक्के मुलांचं फेसबुकवर आणि 24 टक्के मुलांचं इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. लाखो मुलं स्मार्टफोनच्या अधीन झाली असून त्यांना सोशल मीडियावर वेळ घालवण्याची सवयच लागली आहे. सर्व्हेमध्ये दिल्ली, हैदराबाद, मुंबई, भुवनेश्वर, रांची आणि गुवाहाटी सारखी शहरं सामिल होती. या सर्व्हेमध्ये 8 ते 18 वर्षातील 30.2 टक्के मुलांकडे आधीपासूनच स्मार्टफोन असल्याचं समोर आलं. 52 टक्के मुलं स्मार्टफोन किंवा इंटरनेटचा वापर चॅटिंगसाठी करत असून ते व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटसारख्या मेसिजिंग अॅपचा वापर करतात.
अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या फोनवरुन सोशल मीडिया अकाउंट बनवलं. लहान मुलांचं सोशल मीडियावर अकाउंट असल्यास त्यांना याच्या वापरापासून सतत कंट्रोल करता येऊ शकत नाही. अशात या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचा कंटेंट असतो, त्यामुळे अश्लील किंवा इतर गोष्टींपर्यंत मुलं पोहचू शकतात आणि याचा त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तसंच सायबर बुलिंग, Internet Abuse चे प्रकारही घडू शकतात. अशा गोष्टी झाल्यास मुलं आपल्या पालकांना सांगण्यास धजावत नाहीत. अनेक मुलं इंटरनेटचं हे जगच खरं मानू लागतात आणि त्याचा परिणाम त्यांचा पाया भक्कम होण्याऐवजी कमकुवत होतो, आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
NCPCR ने स्मार्टफोन आणि इंटरनेटचा मुलांवर काय परिणाम होतोय, हे पाहण्यासाठी 3491 मुलांवर अध्ययन करण्यात आलं. ज्यात 42.9 टक्के मुलांनी सोशल मीडिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अकाउंट असल्याचं सांगितलं. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अकाउंट ओपन करण्यासाठी कमीत-कमी 13 वर्ष वयाची मर्यादा आहे. परंतु अनेकांचं वयाच्या दहाव्या वर्षीच सोशल मीडिया अकाउंट आहे.
No comments:
Post a Comment