Wednesday, March 30, 2022

Loan to Prisoners : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कैद्यांना वैयक्तिक कर्ज देणार!

Loan to Prisoners : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कैद्यांना वैयक्तिक कर्ज देणार!

मुंबई : महाराष्ट्र सरकारने तुरुंगातील कैद्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. कारागृहात केलेल्या कामाच्या मोबदल्यात कैद्यांना हे कर्ज दिलं जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्जासाठी 7 टक्के व्याज आकारणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी (29 मार्च) दिली. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु होणार आहे.

या प्रकारच्या कर्जाला खावटी कर्ज असे म्हणतात आणि या योजनेबाबतचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. यासाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. वैयक्तिक बाँडवर त्याचे वितरण केले जाईल. कमाई, कौशल्य, रोजंदारी या आधारावर बँक रक्कम ठरवेल. सुमारे 1,055 तुरुंगातील कैद्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. ते त्याचा वापर वकिलाची फी भरण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी करु शकतात.

देशातील हा पहिलाच प्रकार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, "या कर्जामुळे कौटुंबिक बंध मजबूत होण्यास मदत होईल, कारण यामुळे कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळेल."

अनेक कैदी दीर्घ कारावास भोगत आहेत. यातील बहुतांश कैदी हे कुटुंबातील कमावते सदस्य आहेत. त्यांनाच दीर्घकाळ तुरुंगात राहावे लागते, परिणामी त्यांचे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ होऊन कुटुंबात नैराश्य आणि अपराधीपणाची भावना निर्माण होते. शिवाय तुरुंगात गेलेली व्यक्ती आपल्या कौटुंबिक कर्तव्यात कमी पडली, अशी भावनाही कुटुंबात निर्माण होते. अशा परिस्थितीत, एखाद्या कैद्याला त्याच्या कुटुंबाच्या गरजांसाठी कर्ज दिल्याने कुटुंबाची सहानुभूती आणि कैद्याबद्दलचं प्रेम वाढण्यास मदत होईल.

दरम्यान कैद्याची कर्ज मर्यादा, शिक्षेचा कालावधी, अपेक्षित सवलत, वय, अंदाजे वार्षिक कामकाजाचा दिवस, किमान दैनंदिन उत्पन्न या आधारे कर्जाची सुविधा निश्चित केली जाईल. या प्रकारच्या कर्जासाठी जामीनदाराची आवश्यकता नाही. संबंधित कैद्याला कोणतेही पैसे न देता आणि केवळ वैयक्तिक हमीवर कर्ज दिले जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कर्जाची रक्कम संबंधित कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्या वकिलांची फी भरण्यासाठी किंवा इतर कायदेशीर बाबींसाठी वापरली जाईल याची खात्री करण्यासाठी कर्ज देणारी बँक पूर्णपणे जबाबदार असेल. तसेच कर्जाच्या परतफेडीतून बँकेने वसूल केलेल्या रकमेपैकी 1 टक्के रक्कम दरवर्षी कैदी कल्याण निधीला दिली जाईल

लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरते; सत्ता काय असते हे बघितलंय- प्रणिती शिंदे

लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरते; सत्ता काय असते हे बघितलंय- प्रणिती शिंदे

सोलापूर- माझे वडील हे देशाचे गृहमंत्री, ऊर्जामंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते.

लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरते आणि सत्ता काय असते हे मी बघितलं आहे. त्यामुळे सत्तेसाठी मी राजकारणात आलेली नाही, असं विधान काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात केलं.

सोलापुरातील यंत्रमाग धारक संघाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलतं होत्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळेल असे अंदाज लावले जातं होते, मात्र, त्यांच्या पदरी अद्याप मंत्रिपद पडलेलं नाहीये, त्याअनुषंगाने त्यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झालं आहे.

राजकारणात येण्याअगोदर माझं काम हे सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात होत. मात्र,मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ निवडला, आणि हे माझ्या वडिलांना सुद्धा माहिती नव्हतं. त्यांनी राजकारणात येण्यास आणि निवडणूक लढवण्यास विरोध केला. पण मला माझ्या समाजकारणातील क्षेत्र वाढवायचं होत, असं प्रणिती शिंदे यांनी सांगितलं.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पवात्यांचं राजकारण चालू होतं, आणि हे बदलण्यासाठी मी राजकारणात आले, मला टक्केवारी, कमिशनचं राजकारण अजून ही जमत नाही, असंही प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

Monday, March 28, 2022

मन जोडण्या ऐवजी मन तोडण्याचे काम सुरु आहेकाश्मीर फाईलवरून शरद पवार यांचा भाजपला टोला

मन जोडण्या ऐवजी मन तोडण्याचे काम सुरु आहे
काश्मीर फाईलवरून शरद पवार यांचा भाजपला टोला 

मुंबई : विरोधकांनी टीका जरूर करावी. तो त्यांचा अधिकार आहे. टीका करताना त्यात द्वेष नसावा. मात्र अलीकडे जे पाहायला मिळत आहे त्यावरून राजकारण चुकीच्या दिशेला जातंय की काय, असं वाटायला लागलंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला.

माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हडपसर येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, कश्मीरमधील एक घटक निघून गेला. त्यावरील सिनेमावर पंतप्रधानांकडून भाष्य केले जाते. या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा गांधींवर टीका टिप्पणी केली जाते. मतभेद जरूर असावेत. मात्र परस्परांबाबत सन्मान असणे गरजचे आहे. भविष्यासाठी हे द्वेषाचे चित्र घातक आहे. महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी देशाला फक्त स्वातंत्र्य दिले नाही तर देशाला दिशा दिली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी देशाला महत्त्व प्राप्त करून देण्याचं काम केलं. आज आपल्याला देशाला एकसंघ ठेवायचं आहे. येथे द्वेष कामाचा नाही. असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

भाजपच्या सत्ता काळात पंडित कश्मीर बाहेर पडले

कश्मीरमधून हिंदू पंडित बाहेर पडले त्यावेळी सत्तेत काँग्रेस पक्ष नव्हता. त्यावेळी व्ही.पी. सिंग यांची सत्ता होती. भाजपचा तत्कालीन सरकारला पाठिंबा होता. म्हणजे भाजपच्या सत्ता काळात कश्मिरी पंडित कश्मीरमधून बाहेर पडले. त्यावर एक सिनेमा आलाय, काँग्रेसवर टीका झाली आहे. मन जोडण्याऐवजी मन तोडण्याच काम चाललय. समाजात द्वेष पसरवला जातेय. हे चित्र घातक आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केली.

कोरोनापेक्षा राजकारण भयंकर, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांची सध्याच्या राजकारणावर नाराजी

कोरोनापेक्षा राजकारण भयंकर, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांची सध्याच्या राजकारणावर नाराजी

ठाणे (प्रतिनिधी ) : ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी सध्या सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. त्यांनी सध्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनापेक्षा राजकारण भयंकर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. राजकारण भयंकर आहे, कोरोनावर मात केली आपण, पण राजकारणावर मात करणे शक्य नसल्याचे  मधू मंगेश कर्णिक म्हणालेत.

सध्याच्या राजकारणाची पातळी खालावली आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मधू मंगेश कर्णिक यांच्या प्राप्तकाल या कादंबरीचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्णिक यांनी चिंता व्यक्त केली. सध्या जी माणसं त्या पद्धतीनं राजकारण करत आहेत, असं मी माझ्या 90 वर्षाच्या आयुष्यात कधी पाहिलं नाही. असं पाहिल्यावर दु:ख होतं. असचं चाललं तर पुढचं आयुष्य कसं जाईल असेही कर्णिक यावेळी म्हणाले. सध्या राजकारणी एकमेकांची उणीदूणी काढत आहेत. तुम्ही राज्यकारभार केव्हा करणार? हा माझा प्रश्न असल्याचे मधू मंगेश कर्णिक म्हणाले.

Saturday, March 26, 2022

31 मार्चपर्यंत कामावर न परतल्यास कठोर भूमिका घेणार, पवारांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

31 मार्चपर्यंत कामावर न परतल्यास कठोर भूमिका घेणार, पवारांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे. 31 मार्चपर्यंत हे कर्मचारी कामावर हजर झाले नाही तर मग त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली जाईल असा इशारा पवार यांनी दिला आहे.

राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात भूमिका स्पष्ट केली आहे.

कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेण्यात आलं आहे. 1 ते 31 मार्चचा पगार 10 एप्रिलपर्यंत झाला नाही झाला तर त्याचीही जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आता संपकरी कर्मचाऱ्यांनी कोणाचंही न ऐकता कामावर रूजू व्हावं अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून एसटी बसचा संप सुरू असल्याने या विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागतोय. दुर्गम भागातील लोकांना दळणवळणासाठी परवडणारी वाहने नसल्याने नागरिकांनाही त्रास सहन कारावा लागतोय. या सगळ्यांची अडचण ओळखून कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रूजू व्हावे अशी विनंती पवार यांनी केली आहे.

पगार, पगारवाढीची हमी, नोकरीची हमी, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्यानंतरही दिवाळीपासून अडेलतट्टू भूमिका घेतलेल्या एसटी कर्मचाऱयांचा संप मिटविण्यासाठी राज्य सरकारने आज आठव्यांदा पुढाकार घेतला. कामगारांनी लोकांना वेठीस धरू नये, 31 मार्चपर्यंत कामावर हजर व्हावे. मात्र संप मिटल्याशिवाय कोणतीही चर्चा सरकार करणार नाही, अशी ठाम भूमिका परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत निवेदनातून मांडली.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज एसटी संपाबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत निवेदन केले. संप सुरू होण्याआधी एसटी कर्मचाऱयांसोबत एक करार झाला होता. तेव्हा करारामध्ये अट आहे की, राज्य सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढ या तीन प्रमुख मागण्या होत्या. विलीनीकरणाचा यात कोणताही मुद्दा नव्हता. आम्ही कामगारांच्या मागणीनुसार पगारवाढ केली. कर्मचाऱयांच्या पगाराची जबाबदारी राज्य सरकारने घेतली. कोणालाही त्यावेळी नोकरीतून काढले नाही. आताही 31 मार्चपर्यंत कामावर येणाऱया कर्मचाऱयांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती परिवहनमंत्र्यांनी दिली.

कर्मचाऱयांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळ जाणारे वेतन

संप मागे घ्यावा यासाठी महत्त्वाच्या मागण्या मान्य करत सरकारने आतापर्यंत सात वेळा कर्मचाऱयांना आवाहन केले आहे.

Friday, March 25, 2022

सहाय्यक आयुक्त सात वाजताच पाहणीसाठी रस्त्यांवर

सहाय्यक आयुक्त सात वाजताच पाहणीसाठी रस्त्यांवर

ठाणे : महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व सहाय्यक आयुक्तांनी रस्त्यांवर उतरून त्यांच्या प्रभाग समितीतंर्गत साफसफाई आणि अनधिकृत बॅनर्स आणि जाहिरात फलक निष्कासनाच्या कारवाईला गती दिली. स्वतः महापालिका आयुक्त सकाळी ७ वाजल्यापासूनच विविध ठिकाणी फिरून या कारवाईवर लक्ष ठेवून होते. गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्तांनी साफसफाई, अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सविरूद्ध कारवाईविरोधातीललमोह्म अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज सकाळपासून महापालिकेची सर्व यंत्रणा रस्त्यांवर उतरूण प्रभागांमधील साफसफाई तसेच अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर्स आणि पोस्टर्स काढण्याचा कारवाई करीत होती. महापालिका आयुक्तही स्वतः या कारवाईवर लक्ष ठेवून होते. महापालिका आयुक्तांनी माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर आणि कळवा प्रभाग समितीतंर्गत कारवाईची पाहणी केली.

Thursday, March 24, 2022

गावदेवी वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार

गावदेवी वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार

ठाणे : ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत गावदेवी मैदानात उभारण्यात येणाऱ्या भूमिगत वाहनतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सांगितलं. ठाणे रेल्वे स्थानक, गावदेवी परिसरात नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी वा चारचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीला अडथळा होऊन सातत्याने कोंडी होत असते. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत हे काम प्रगतीपथावर असून आज महापालिका आयुक्तांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. गावदेवी वाहनतळ हे ४ हजार ३३० चौरस मीटरचे असून त्यामध्ये १३० चारचाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे. या वाहनतळामध्ये कार लिफ्ट, विद्युत तसेच इतर किरकोळ कामे अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होऊन वाहनतळ नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...