Tuesday, March 15, 2022

ठाणे रेल्वे स्थानकातील कोपरी पूर्व सॅटिस २ च्या कामासाठी लागणाऱ्या परवानग्या वेळेत मिळवून द्या ! खासदार राजन विचारे यांचा लोकसभेत शून्य प्रहर

ठाणे रेल्वे स्थानकातील कोपरी पूर्व सॅटिस २ च्या कामासाठी लागणाऱ्या परवानग्या वेळेत मिळवून द्या ! खासदार राजन विचारे यांचा लोकसभेत शून्य प्रहर

प्रतिनिधी -ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे रेल्वे स्थानकात कोपरी पूर्व येथे ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत मल्टी मॉडल ट्रान्झिट हब या रेल्वेच्या वाणिज्य उपयोगाकरिता ८ मजली इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे. या कामास लागणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी विलंब लागू नये व काम वेळेत पूर्ण व्हावे या दृष्टिकोनातून खासदार राजन विचारे यांनी सुरू असणाऱ्या लोकसभेच्या आर्थिक अधिवेशनात शून्य प्रहर मार्गे मुद्दा उपस्थित केला यामध्ये त्यांनी या प्रकल्पासाठी २६० कोटी रुपये खर्च होणार असून त्यामध्ये ५०%  ठाणे स्मार्ट सिटी तर २५% टक्के राज्य सरकार व ठाणे महापालिका २५% असा खर्च करणार आहे

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला, २.४ किलोमीटर लांबीचा उन्नत बस मार्ग आणि ८००० चौरस मीटर उन्नत बस डेक ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड बांधत आहे. आणि भविष्यात १६,००० चौरस मीटरची व्यावसायिक इमारत बांधली जाणार आहे. सुधारित बस डेकच्या वर मध्य रेल्वे. बांधणार, ज्याचा रेल्वेला फायदा होईल.

या प्रकल्पात ११० कार आणि १३० दुचाकींसाठी पार्किंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे. उन्नत केलेल्या बस डेकचा वापर सार्वजनिक वाहतूक आणि इतर सुविधांच्या देवाणघेवाणीसाठी केला जाईल. सॅटिस बांधल्याने वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच पादचाऱ्यांना बस पकडणे सोपे होणार आहे.

 या प्रकल्पाचे ४२% काम पूर्ण झाले असून ३९% रक्कमही प्राप्त झाली असून, हा प्रकल्प २ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने प्रकल्पाचे उर्वरित काम वेळेत पूर्ण करावे आणि प्रकल्पासाठी ५०% निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी माननीय रेल्वेमंत्र्यांना सभागृहात केली. तसेच या प्रकल्पाशी संबंधित अडथळे लवकरात लवकर दूर करण्यासाठी संबंधित मध्य रेल्वे विभागाला आवश्यक लागणाऱ्या परवानग्या वेळेत देण्याचे निर्देश. द्यावे अशी विनंती यामध्ये करण्यात आली आहे.

Monday, March 14, 2022

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय महत्वाचं? जाणून घ्या माहिती

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय महत्वाचं? जाणून घ्या माहिती

मुंबई : सध्या लोकांना त्यांच्या लाईफ स्टाईलमुळे आरोग्याशी संबंधीत अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. त्यात वजन वाढणे किंवा जाड होण्याच्या समस्या लोकांना भेडसावू लागले आहेत. अशात अनेक लोक आपलं वजन कमी करण्यासाठी हेल्दी जेवण किंवा जेवण कमी करण्याचा पर्याय निवडतात. परंतु यामध्ये लोकांना एक प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी भात कमी खावं की, चपाती? बरेच लोक वजन कमी करताना प्रथम चपाती खेणं सोडून देतात आणि नंतर काही तासांतच त्यांना चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या सुरू होतात. आता भारतीय अन्नाचा विचार केला, तर भात आणि रोटी हे दोन्ही मुख्य पदार्थ आहेत, जे कार्बोहायड्रेट देतात.
आता अशा परिस्थितीत दोन्हीपैकी एक सोडणे कठीण होऊ शकते. भातामुळे लठ्ठपणा वाढतो, असे काहीजण म्हणतात, तर काहीजण भात हे रोटीपेक्षा हलके अन्न असल्याचे सांगतात. त्याच वेळी, मधुमेह असलेल्या लोकांनी काय करावं असा देखील लोकांना प्रश्न पडतो.
तांदूळ आणि गहू ही दोन्ही तृणधान्ये आहेत. या दोन्ही गोष्टींमध्ये प्रथिने, चरबी आणि कर्बोदकांचे प्रमाण असते. ते किती असते ते जाणून घेऊया.

अहवालानुसार, 100 ग्रॅम गव्हाच्या पिठात
76 ग्रॅम कर्बोदक
10 ग्रॅम प्रथिने
1 ग्रॅम चरबी

अहवालानुसार, 100 ग्रॅम तांदळात
28 ग्रॅम कर्बोदक
2.7 ग्रॅम प्रथिने
0.3  ग्रॅम चरबी

मुख्यमंत्री योगी यांची जागा मंदिर आणि मठात, राजकारणात नाही"; प्रणिती शिंदे

मुख्यमंत्री योगी यांची जागा मंदिर आणि मठात, राजकारणात नाही"; प्रणिती शिंदे 

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर थेट योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात शेतकऱ्यांसमोर भाषण देताना प्रणिती शिंदेंनी योगी आणि महाराज राजकारणात आल्यावर देशाचे वाटोळे होते, असे म्हणत आदित्यनाथांवर सडकून टीका केली आहे.

'उत्तर प्रदेशची निवडणूक जवळ आल्यानंतर शेतकरी कायदे रद्द केले. एक वर्ष तुम्ही वाट पाहिली. ७०० शेतकऱ्यांचे तुम्ही बळी घेतले आणि मग कायदे मागे घेतले.' असा टोला प्रणिती शिंदेंनी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकावर टीका करताना लगावला आहे. त्याचप्रमाणे पुढे बोलताना प्रणिती यांनी योगी आणि महाराजांची जागा मठांमध्ये आणि मदिरांमध्ये आहे असे म्हणत टोला लगावला आहे.

'योगी, महाराज यांच्याबद्दल आहे आम्हाला मान पण त्यांचं स्थान आहे मंदिरामध्ये आणि मठात राजकारणात नाही. ज्या दिवशी देशाच्या राजकारणात योगी आणि महाराज येतात त्या दिवशी देशाचं वाटोळं सुरु होतं,' असे त्या भाषणात म्हणाल्या. त्यांचे हे शब्द ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला.

काम पाहून मतदान केलं पाहिजे असंही प्रणिती यांनी म्हटलंय. 'जे काम करतात त्यांना मतदान करणं महत्वाचं आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर कामाला महत्व द्या,' असे आवाहन त्यांनी उपस्थितांना भाषणादरम्यान केले.

लोकांच्या प्रश्नांसाठी सत्ताधारी-विरोधकांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे : संजय राऊत

लोकांच्या प्रश्नांसाठी सत्ताधारी-विरोधकांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे : संजय राऊत 

नवी दिल्ली - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर संजय राऊत यांनी टीकास्त्र डागले आहे.

विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांना टार्गेट दिले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच जरी गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांना म्हटले गेले असले, तरी गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही, तिथे व्यक्तीच जिंकते आणि त्या व्यक्ती सरकार बनवतात, असेही राऊत म्हणाले आहेत. त्यासोबतच राऊतांनी शरद पवारांबाबत निलेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार घेतला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, गोव्यात भाजपच नव्हे, तर कोणीही असले तरी वाद निर्माण होतो. कोणीही गोव्यात निवडणुका जिंकल्याचा टेंभा मिरवू नये. गोव्यातील राजकारण हे कोणाच्या हातात राहत नाही. गोव्याच्या विजयाचे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस शिल्पकार असल्यामुळे भाजप कार्यालयात त्यांचे मोठे स्वागत झाले, ढोल वाजवले, लेझीम खेळले. त्यांचे विधानभवनातही मोठे स्वागत झाले. महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला याचा आनंद झाला, पण गोवा कोणाला जिंकता येत नाही. गोव्याचे राजकारण फार विचित्र आहे. तिथे कधीही पक्ष जिंकत नाही, तर व्यक्ती जिंकते. त्यातील काही व्यक्ती एकत्र येऊन सरकार बनवतात.

संजय राऊत पुढे म्हणाले की, सरकारबरोबर हातात हात घालून राज्याचे आणि देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही बाजुंनी सकारात्मक भूमिका घेऊन काम करणे हे लोकशाहीमध्ये महत्त्वाचे असते. पण गेल्या सात-आठ वर्षांपासून दुर्दैवाने हे पाहायला मिळत नाही. म्हणजे, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे एकमेकांचे शत्रू आहेत. त्यांचे एकमेकांशी पराकोटीचे वैर आहे, कौरव-पांडवांचे महाभारत आहे, अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतात. हे चित्र देशाच्या लोकशाहीसाठी चांगले नाही. पण आमचा राष्ट्राच्या, सुरक्षेच्या, आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर जास्तीत जास्त एकमत करुन सभागृहाचे कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न राहिल.

निवडणुकांपूर्वी अनेक मुद्दे जिवंत केले जातात. जसा हिजाबचा मुद्दा होता. या मुद्द्यांनी निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत. अलिकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवरच आपण भर देतो. निवडणुका त्यावरच लढवल्या जातात. निवडणुका झाल्यानंतर विकासावर बोलायला सुरुवात होते. पाच वर्षांनी पुन्हा जुन्या मुद्द्यावर येतात. आता देशाला सवय झाली आहे आणि लोकही गंगेत जशी प्रेते वाहून गेली, त्याप्रमाणे वाहून जाताना दिसत आहेत. देशासाठी हे चित्र चांगले नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप चार राज्यात जिंकला आहे, एका राज्यात आप जिंकली आहे. हा विजयाचा उन्माद अजीर्ण होऊ नये. हा विजय सत्कारणी लागावा, एवढेच आम्ही म्हणून शकतो. या देशात विरोधी पक्ष राहणे ही या देशाची आणि लोकशाहीची गरज आहे.

Sunday, March 13, 2022

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या राणे बंधुंवर ठाण्यात गुन्हा दाखल होणार

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या राणे बंधुंवर ठाण्यात गुन्हा दाखल होणार 

राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पेन ड्राईव्हमधील पुराव्यांसह फिर्याद
  
आपण बोलतो किती याचे भान ठेवावे - आनंद परांजपे
ठाणे प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना दाऊदचा हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधन वापरणार्‍या आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हा दाखल करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी फिर्याद दिली आहे. नौपाडा पोलिसांनी या प्रकरणात योग्य तो गुन्हे दाखल करण्यासंदर्भात  शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना आश्वासित केले आहे. दरम्यान, नितेश राणे थेट यांनी आपली उंची तपासावी आणि नंतरच सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करावा. निलेश राणे हे पूर्वी रात्रीचे 'औषध' घेत होते. आता त्यांनी दिवसाही औषध घ्यायला सुरूवात केली असावी. त्यामुळेच ते काहीबाही बरळत आहेत,  असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करून शरद पवार हे दाउदचे हस्तक असल्याचे म्हटले होते तर निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन निलेेश राणे यांच्या ट्वीटची री  ओढत शरद पवार यांना दाऊदचा हस्तक तसेच पाकिस्तानी एजंट असे संबोधन केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशन गाठले. हरी निवास सर्कल ते पोलीस ठाणे असे चालत जावून हा गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी फिर्याद देऊन भादंवि 120 ब, 153, 153(अ) , 499, 500,505 (1) ,505 (1) क ,  अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लेखी फिर्यादीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. 
यावेळी मा. डॉ. खा. आनंद परांजपे यांनी सांगितले की, राणे बंधू हे वारंवार आमचे श्रद्धेय शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका करीत असतात. ही टीका आणि आरोप करण्यापूर्वी निलेश आणि नितेश या राणे बंधुंनी आपली उंची तपासावी, त्यानंतरच सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करावा. आदरणीय पवार साहेब हे निलेश आणि नितेश राणे यांच्या वयापेक्षा अधिक सामाजिक जीवनात सक्रीय आहेत. याची जाणही या राणे बंधूंना नाही. राणे बंधूंची आजवरची कारकिर्द पाहता त्यांनी आपली वैचारिक कुवत ओळखून भाष्य करावे;  अन्यथा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. असा इशारा परांजपे यांनी दिला.
यावेळी विद्यमान विरोधीपक्ष नेते शानू पठाण, परिवहन सदस्य प्रकाश पाटील,  ठाणे महिलाध्यक्षा सुजाताताई घाग,  महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, ठाणे युवाध्यक्ष विक्रम खामकर,विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे, कार्याध्यक्ष रमेश दोडके, ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी, लीगल सेलचे अध्यक्ष अॅड विनोद उतेकर ,  ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष दिलीप नाईक, असंघटीत सेलचे अध्यक्ष राजू चापले, हाॅकर्स सेलचे अध्यक्ष   सचिन पंधारे  यांच्यासह राष्ट्रवादीच्या  जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य,  महिला कार्यकारिणीच्या सर्व  सदस्या, युवक कार्यकारिणीचे  सर्व  पदाधिकारी व   कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, March 12, 2022

सरकारच्या षडयंत्राचा सभागृहात भांडाफोड केल्यानंच मला नोटीस, पण चौकशीला जाणार : देवेंद्र फडणवीस

सरकारच्या षडयंत्राचा सभागृहात  भांडाफोड केल्यानंच मला नोटीस, पण चौकशीला जाणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : "मार्च २०२१ मध्ये भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत मी महाविकास आघाडीच्या गृहमंत्रालयातील बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला होता.



त्याची सर्व माहिती माझ्याकडे असल्याचंही सांगितलं होतं. ते गृह सचिवांना देतोय हेदेखील सांगितलं होतं. त्याच दिवशी मी ही माहिती देशाच्या गृहसचिवांना दिली. त्याचं गांभीर्य ओळखून न्यायालयानं यासंदर्भातील तपास सीबीआयला दिलाय. या प्रकरणाचा तपास सीबीआय करतंय. अनिल देशमुखांचीही चौकशी त्यात आहे," अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, आता सायबर सेलकडून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना रविवारी चौकशीसाठीही बोलावण्यात आलं आहे.

"जेव्हा ही माहिती सीबीआयकडे गेली तेव्हा राज्य सरकारनं हा घोटाळा दाबण्यासाठी एक एफआयआर दाखल केला. ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टमधील माहिती लीक कशी झाली असा एफआयआर आहे. यासंदर्भात मला पोलिसांकडून प्रश्न विचारले. यासंदर्भातील माहिती मी त्यांना देईन असं सांगितलं. मी विरोधीपक्ष नेता असल्यानं माझी माहिती कुठून आली हा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. त्यानंतर पुन्हा ते पाठवलं आणि न्यायालयातही ते सांगण्यात आलं. मला काल पोलिसांनी नोटीस पाठवली आणि मला उद्या ११ वाजता सायबर पोलीस स्थानकात बोलावलंय. मी त्या ठिकाणी जाणार आणि पोलिसांच्या चौकशीला योग्य उत्तरही देणारे. मी राज्याच्या गृहमंत्री राहिलो आहे. पोलिसांना मी सहकार्य करणार," असंही फडणवीस म्हणाले.

माझ्याकडे ही माहिती कशी आली यापेक्षा हा अहवाल राज्याकडे सहा महिने पडलाय. त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला यावर पाचारण करावं याच्यावर पाचारण केलं पाहिजे असा सवाल फडणवीस यांनी केला.

उद्या उपस्थित राहणार
"न्यायालयानं ही माहिती सीबीआयला दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे अधिकृत माहिती, पेनड्राईव्ह, ट्रान्सस्क्रिप्ट राज्याला सीबीआयला सोपवाव्या लागल्यात, त्यामुळे या केसमध्ये अर्थ उरत नाही. सध्या राज्याची जी परिस्थिती आहे आणि परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड केलाय त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसांतील काही अधिकाऱ्यांना त्याचं उत्तर सूचत नसल्यानं मला ही नोटीस देण्यात आली आहे. मी उद्या पोलीस स्टेशनला नक्की उपस्थित राहणार," असंही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी आपल्याला पुणे पोलिसांनी कोणतीही नोटीस दिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यातील शाळेत फीबाबत विचारणेसाठी आलेल्या पालकांना महिला बाऊन्सरकडून मारहाण

पुण्यातील शाळेत फीबाबत विचारणेसाठी आलेल्या पालकांना महिला बाऊन्सरकडून मारहाण

मुंबई : पुण्यातील एका शाळेत महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. फीबाबत विचारणा केली असता पालकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी शाळेविरोधात तक्रार दाखल केली असून अदखलपात्र गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.

या धक्कादायक प्रकरणाबाबत अजूनही शाळेकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल शाळेत ही घटना घडली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.


नक्की काय घडले?

पालक मंगेश गायकवाड यांचा मुलगा क्लाईन मेमोरियल शाळेत शिकतो. कोरोनाच्या कारणास्तव गेल्या २ वर्षांमध्ये शाळा भरत नसतानाही शाळेकडून फी वाढ केली आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी मंगेश गायकवाड यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचे पालक शाळेत गेले होते. फीवरून शाळेतल्या प्रशासनासोबत वाद सुरू असताना हा वाद टोकाला पोहोचला आणि याचे रुपांतर भांडणात झाले. यावेळी शाळेतल्या महिला बाऊन्सरकडून मारहाण झाल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश गायकवाड यांनी बिबवेवाडी पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या घटनेबाबत शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. दोन्ही बाजूंचा तपास पोलीस करत आहेत.

माहितीनुसार, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मंगेश गायकवाड यांना मुलाची फी भरण्यासाठी पत्र दिले होते. त्याबाबत खुलासा देण्याकरता तक्रारदार आणि इतर विद्यार्थ्यांचे पालक शाळेत निवेदन घेऊन गेले होते. त्यावेळीस मुख्याध्यापकांकडे पालकांनी लेखी म्हणणे दिल्यानंतर त्याची पोच पावती मागितली. पण मुख्याध्यापकांनी महिला बाऊन्सरला बोलावून मारहाण करायला लावले, असा आरोप मंगेश गायकवाड यांनी केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...