लोकांच्या प्रश्नांसाठी सत्ताधारी-विरोधकांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे : संजय राऊत
नवी दिल्ली - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर संजय राऊत यांनी टीकास्त्र डागले आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांना टार्गेट दिले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच जरी गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांना म्हटले गेले असले, तरी गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही, तिथे व्यक्तीच जिंकते आणि त्या व्यक्ती सरकार बनवतात, असेही राऊत म्हणाले आहेत. त्यासोबतच राऊतांनी शरद पवारांबाबत निलेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार घेतला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, गोव्यात भाजपच नव्हे, तर कोणीही असले तरी वाद निर्माण होतो. कोणीही गोव्यात निवडणुका जिंकल्याचा टेंभा मिरवू नये. गोव्यातील राजकारण हे कोणाच्या हातात राहत नाही. गोव्याच्या विजयाचे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस शिल्पकार असल्यामुळे भाजप कार्यालयात त्यांचे मोठे स्वागत झाले, ढोल वाजवले, लेझीम खेळले. त्यांचे विधानभवनातही मोठे स्वागत झाले. महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला याचा आनंद झाला, पण गोवा कोणाला जिंकता येत नाही. गोव्याचे राजकारण फार विचित्र आहे. तिथे कधीही पक्ष जिंकत नाही, तर व्यक्ती जिंकते. त्यातील काही व्यक्ती एकत्र येऊन सरकार बनवतात.
संजय राऊत पुढे म्हणाले की, सरकारबरोबर हातात हात घालून राज्याचे आणि देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही बाजुंनी सकारात्मक भूमिका घेऊन काम करणे हे लोकशाहीमध्ये महत्त्वाचे असते. पण गेल्या सात-आठ वर्षांपासून दुर्दैवाने हे पाहायला मिळत नाही. म्हणजे, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे एकमेकांचे शत्रू आहेत. त्यांचे एकमेकांशी पराकोटीचे वैर आहे, कौरव-पांडवांचे महाभारत आहे, अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतात. हे चित्र देशाच्या लोकशाहीसाठी चांगले नाही. पण आमचा राष्ट्राच्या, सुरक्षेच्या, आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर जास्तीत जास्त एकमत करुन सभागृहाचे कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न राहिल.
निवडणुकांपूर्वी अनेक मुद्दे जिवंत केले जातात. जसा हिजाबचा मुद्दा होता. या मुद्द्यांनी निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत. अलिकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवरच आपण भर देतो. निवडणुका त्यावरच लढवल्या जातात. निवडणुका झाल्यानंतर विकासावर बोलायला सुरुवात होते. पाच वर्षांनी पुन्हा जुन्या मुद्द्यावर येतात. आता देशाला सवय झाली आहे आणि लोकही गंगेत जशी प्रेते वाहून गेली, त्याप्रमाणे वाहून जाताना दिसत आहेत. देशासाठी हे चित्र चांगले नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप चार राज्यात जिंकला आहे, एका राज्यात आप जिंकली आहे. हा विजयाचा उन्माद अजीर्ण होऊ नये. हा विजय सत्कारणी लागावा, एवढेच आम्ही म्हणून शकतो. या देशात विरोधी पक्ष राहणे ही या देशाची आणि लोकशाहीची गरज आहे.