सरकारच्या षडयंत्राचा सभागृहात भांडाफोड केल्यानंच मला नोटीस, पण चौकशीला जाणार : देवेंद्र फडणवीस
मुंबई : "मार्च २०२१ मध्ये भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत मी महाविकास आघाडीच्या गृहमंत्रालयातील बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला होता.
त्याची सर्व माहिती माझ्याकडे असल्याचंही सांगितलं होतं. ते गृह सचिवांना देतोय हेदेखील सांगितलं होतं. त्याच दिवशी मी ही माहिती देशाच्या गृहसचिवांना दिली. त्याचं गांभीर्य ओळखून न्यायालयानं यासंदर्भातील तपास सीबीआयला दिलाय. या प्रकरणाचा तपास सीबीआय करतंय. अनिल देशमुखांचीही चौकशी त्यात आहे," अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, आता सायबर सेलकडून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना रविवारी चौकशीसाठीही बोलावण्यात आलं आहे.
"जेव्हा ही माहिती सीबीआयकडे गेली तेव्हा राज्य सरकारनं हा घोटाळा दाबण्यासाठी एक एफआयआर दाखल केला. ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टमधील माहिती लीक कशी झाली असा एफआयआर आहे. यासंदर्भात मला पोलिसांकडून प्रश्न विचारले. यासंदर्भातील माहिती मी त्यांना देईन असं सांगितलं. मी विरोधीपक्ष नेता असल्यानं माझी माहिती कुठून आली हा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. त्यानंतर पुन्हा ते पाठवलं आणि न्यायालयातही ते सांगण्यात आलं. मला काल पोलिसांनी नोटीस पाठवली आणि मला उद्या ११ वाजता सायबर पोलीस स्थानकात बोलावलंय. मी त्या ठिकाणी जाणार आणि पोलिसांच्या चौकशीला योग्य उत्तरही देणारे. मी राज्याच्या गृहमंत्री राहिलो आहे. पोलिसांना मी सहकार्य करणार," असंही फडणवीस म्हणाले.
माझ्याकडे ही माहिती कशी आली यापेक्षा हा अहवाल राज्याकडे सहा महिने पडलाय. त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला यावर पाचारण करावं याच्यावर पाचारण केलं पाहिजे असा सवाल फडणवीस यांनी केला.
उद्या उपस्थित राहणार
"न्यायालयानं ही माहिती सीबीआयला दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे अधिकृत माहिती, पेनड्राईव्ह, ट्रान्सस्क्रिप्ट राज्याला सीबीआयला सोपवाव्या लागल्यात, त्यामुळे या केसमध्ये अर्थ उरत नाही. सध्या राज्याची जी परिस्थिती आहे आणि परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड केलाय त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसांतील काही अधिकाऱ्यांना त्याचं उत्तर सूचत नसल्यानं मला ही नोटीस देण्यात आली आहे. मी उद्या पोलीस स्टेशनला नक्की उपस्थित राहणार," असंही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी आपल्याला पुणे पोलिसांनी कोणतीही नोटीस दिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.