सोलापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे, गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल 1 वर्ष फरार होता मात्र अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याचा ताब्यात असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 348.661 ग्रॅम सोने व सुमारे 71698.274 ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच 71 प्राचीन नाणे यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . तत्कालीन जिल्हाधिकारी मुधोळ यांची बदली झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिल्यावर रविवार, 13 सप्टेंबर 2020 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिल्याने तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी विरोधात फसवणूक गुन्हा दाखल केला होता.