Monday, September 6, 2021

संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज - 'माझा डॉक्टर' वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत

मुंबई : कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून त्याच्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची गरज 'माझा डॉक्टर' वैद्यकीय परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी अधोरेखित केली.




कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोरोना राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या 'माझा डॉक्टर' या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाने उद्घाटन झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या परिषदेत राज्य कोरोना कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले आणि जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.


. तर कोरोना पसरण्याची शक्यता - डॉ. मेहुल मेहता 

अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातील डॉ. मेहुल मेहता यांनी संभाव्य तिसरी लाट आणि त्यामागची कारणे शोधली पाहिजे असे सांगून आज कोरोना संपला असे आपल्याला वाटायला लागले म्हणून अनेक लोक मास्क वापरत नाहीत, सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळे मोठ्या संख्येने करायला लागले त्यातून कोरोना पसरण्याची शक्यता आहे. अजूनही लस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. त्यातच विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा फैलाव वेगाने होतो आहे, डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आल्याचे सांगून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉ. मेहता यांनी केले.


प्रत्येकाने 'जाणता मी, जबाबदार मी' भूमिका घेण्याची गरज- डॉ. संजय ओक 

संभाव्य लाटेची शक्यता गृहित धरून राज्य शासन, डॉक्टर्स, रुग्णालये यांनी तयारी सुरु केली आहे, मात्र या संपूर्ण प्रक्रियेत कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज कोरोना राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली. कोरोनाची विविध लक्षणे आढळली, काही रुग्णांना चव आणि वास येत नाही, पोटरीचे स्नायू आणि पाटदुखी वाढली, डायरिया, उलटी होण्याचे लक्षणे दिसले. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर 'कोरोना नाही ना?' हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकाने आपल्या मनाला विचारणे आवश्यक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी', 'मी जबाबदार' नंतर 'जाणता मी, जबाबदार मी' ही भूमिका घेण्याची गरजही डॉ. ओक यांनी व्यक्त केली.


दुखणं अंगावर काढण्याची सवय महागात पडू शकते, यात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची असून आपल्या रुग्णांची केवळ स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लॅप्टो आदी आजारांची लक्षणे एकसारखीच असून एनएसवनएनएसटू बरोबरच मलेरिया, लॅप्टोच्या चाचण्यांसह कोरोनासाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचेही डॉ. ओक यांनी सांगितले. कोरोना हे तीन आठवड्याचे दुखणे आहे, त्यातील दुसऱ्या आठवड्यातील शेवटचे दिवस हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तीन आठवडे काळजीपूर्वक विलगीकरणात अथवा रुग्णालयात राहून काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना झाल्यानंतर उपचार, विलगीकरण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आवश्यक असून हा रोग लपविण्याची कोणतीही आवश्यकता नाही, शासन दरबारी याची नोंद होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसचा फटका बसला त्याच्या निदानासाठी सिटी स्कॅनपेक्षा एमआरआय करणे आवश्यक असल्याचे सांगतानाच सध्या तरी कोरोनापासून संरक्षणासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून मास्क घालणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे सांगण्याची वेळ आली आहे, असेही डॉ. ओक यांनी सांगितले.


प्रत्येक स्ट्रेनवर मास्क प्रभावी- डॉ. शशांक जोशी 

मास्क घालून कोरोनाला घराच्या उंबरठ्याच्याबाहेरच ठेवणे हे आपले सर्वाचे आद्यकर्तव्य असल्याचे डॉ. शशांक जोशी यावेळी म्हणाले. कोरोनाच्या या पहिल्या, दुसऱ्या लाटेत आपल्याला हर्ड आणि हायब्रीड इम्युनिटी पहायला मिळाली. राज्य शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष पुरवल्यामुळे धारावीत परिस्थिती यशस्वीपणे हाताळता आली, दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये रोजची रुग्णसंख्या २० पेक्षा अधिक आढळले नाहीत हे केवळ हर्ड इम्युनिटीमुळे झाल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. कोरोनाची लक्षणे आढळली तरी विलगीकरणात राहून संपर्क तोडा, चाचणी करा, ऑक्सिजन दर, नाडीचे ठोके, ताप, आदींच्या नोंदी करा, ज्यांच्या संपर्कात आलात त्यांनाही चाचणी करायला सांगा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांशी डॉक्टरांनी बोलण्याचे आवाहन करतानाच मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून दुहेरी मास्क संरक्षणासाठी मजबूत ढाल असल्याचेही यावेळी डॉ. जोशी यांनी सांगितले.


लक्षणे दिसताच चाचणी करा- डॉ. राहुल पंडित 

फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित म्हणाले की, कोरोनाने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, शिस्त लावली. एखाद्या गुरुसारखे कोरोनाने आपल्याला शिकवले आहे. नव्या लक्षणांकडे लक्ष ठेवतानाच हाय रिस्क फॅक्टरमधील रुग्णांना जपण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करतानाच रोज मास्क बदला आणि ओला झालेला मास्क कधीही लावू नका तो तात्काळ बदलण्याच्या सूचना देतानाच कोरोनाचे लक्षणे दिसली की वेळेत चाचण्या करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑक्सिजन प्रमाण ९३ पेक्षा कमी झाले असेल तर पोटावर झोपण्याचा सल्ला आम्ही देतो, त्याचे निश्चितच चांगले परिणाम बघायला मिळतात.


कोरोनापश्चात जीवनशैली चांगली ठेवा- डॉ. अजित देसाई 

डॉ. अजित देसाई कोरोना पश्चात लक्षणे ही मुख्यतः ४ ते १२ आठवडे असतात, ही केवळ गंभीर रुग्णांमध्येच नाहीत तर साधारण आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा ही लक्षणे दिसतात. सहा महिन्यापर्यंत ही लक्षणे असली तरी ती दीर्घ काळची लक्षणे मानले जातात, थकवा, सांधेदुखी, श्वसनास त्रास, ताणतणाव, निद्रानाश, भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून तणावात जाणे, डोकेदुखी, छातीत वेदना आदी त्रास होतात. कोरोना लक्षणांच्या काळात ईसीजीमध्ये अथवा टूडी इको मध्ये काही आढळल्यास त्यावर उपचार करणे खूप आवश्यक असते. ताण तणाव, चिंता असेल तेव्हा कुटुंबातील सदस्य, मित्रांबरोबर बोला त्यापेक्षाही अधिक गंभीर स्वरुपाचा तणाव असेल तर मानसोपचार तज्ज्ञांशी बोलण्याचा सल्ला देऊन कोरोना पश्चात आपली जीवनशैली अधिकाधिक चांगली ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. देसाई यांनी केले.


पहिल्या दोन लाटांमध्ये मुलांमध्ये कमी संक्रमण- डॉ. सुहास प्रभू 

बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणती काळजी घेतली पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि काही पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पहिल्या दोन लाटेमध्ये मुलांमध्ये कोरोनाचे कमी संक्रमण झाले. मुलांनी देखील संभाव्य धोका लक्षात घेता मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.


ज्या मुलांमध्ये संक्रमण झाले तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते, त्यांच्यावर घरीही उपचार करू शकतो, रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत, गंभीर लक्षणे आढळल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहेत, मुलाबरोबर पालकापैकी एकाला या मुलांसाठीच्या कोरोनासेंटरमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे असे सांगून या आजारामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ नये याकरिता त्यांच्याशी फोनवरुन अथवा इतर माध्यमांद्वारे संवाद साधणे अधिक गरजेचे आहे. शाळा सुरू होण्याअगोदर पुरेशी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रभू यांनी सांगितले. नवजात शिशु आणि आई यांची काळजी घेत असतानाच आईला जर कोरोना असेल तर बाळाची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Thursday, September 2, 2021

Twitter वरूनही कमावता येणार पैसे, फीचरचं नाव Supper Follows

मुंबई  : Twitter ने Super Follows फीचर लाँच केलं आहे. या फीचरमुळे यूझर्स सबस्क्राइबर ओनली कंटेंटसाठी पैसे कमवता येतील. हे फीचर बुधवारी कंपनीने जारी केले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच ट्विटरवरून पैसे कमावता येईल.

Supper Follows फीचरचं अॅक्सेस लिमिटेड आहे. Supper Follows चा सेटअप सर्वांसाठी नाही. या यूझर्ससाठी दहा हजार फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. सबस्क्रीप्शन चार्ज 2.99 डॉलर, 4.99 डॉलर, आणि 9.99 डॉलरवर सेट करू शकतो.



हे फीचर यूज करण्यासाठी 30 दिवसात कमीत कमी 25 ट्विट करणे आवश्यक आहे. सध्या ही सेवा ios यूझर्ससाठी मर्यादित ठेवण्यात आली आहे. अमेरिका आणि कॅनाडामध्ये ही सेवा सुरू झाली. याद्वारे सबस्क्राइब करणाऱ्या यूझर्सना एक्सक्लूसिव कंटेट देता येणार आहे.


हे अप्लाय करण्यासाठी Twitter ios अॅपवर आपल्याला मेनू ओपन करावा लागेल. यात सर्वात शेवटी मॉनेटायझेशनचा पर्याय उपलब्ध आहे. तो टॅप करायचा आहे.


इथे आपल्याला एलिजिबिलिटी चेक करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पात्र ठरलात तर अप्लाय बटणावर क्लिक करावे लागेल. तुमचे किंवा कंपनीचे वय 18 वर्षाहून जास्त असावे लागणार आहे. टू-फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ऑन करावे लागणार आहे.


यानंतर कंटेट कॅटेगरी जसे की आर्ट, कॉमेडी निवडावे लागेल. फॉर्म भरल्यानंतर सबमिट करावा लागेल. लवकरच हे फीचर देशातही लागू होण्याची शक्यता आहे.

बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराने निधन


मुंबई : बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Siddharth Shukla) वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराने (Heart Attack) निधन झालं.चाहत्यांसाठी सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीनं टीव्हीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत सगळ्यांना हादरवून सोडलं आहे.


झोपण्यापूर्वी घेतली काही औषधं



मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लानं झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती, त्यानंतर तो सकाळी उठलाच नाही. डॉक्टरांच्या मते सिद्धार्थ शुक्लाला हृदयविकाराचा झटका आला आहे. काल रात्रीपर्यंत सिद्धार्थ पूर्णपणे तंदुरुस्त होता. अशा परिस्थितीत, कोणताही आजार नसताना सिद्धार्थ शुक्लानं या जगाचा निरोप घेणं हे खूप धक्कादायक आहे.


सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर शहनाजने शूटिंग थांबवली


सिद्धार्थ शुक्लाची जवळची मैत्रीण शहनाज गिलनं त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर तिचं शूटिंग सोडलं आहे. शहनाज गिल सिद्धार्थच्या सर्वात जवळची होती. काही दिवसांपूर्वी दोघंही डान्स दिवानेमध्ये एकत्र रोमान्स करताना दिसले होते.


मनोरंजन विश्वात पदार्पण


सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.


सिद्धार्थने आईच्या सांगण्यावरून अनिच्छेने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण, त्याला माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली. यानंतर सिद्धार्थला 2008 मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. तिथेही सिद्धार्थने जिंकून देशाचे नाव उंचावले.


तिथून परत आल्यानंतरही सिद्धार्थने मॉडेलिंग सुरू ठेवले. नंतर त्याने फेअरनेस क्रीमच्या व्यावसायिक जाहिरातीतही काम केले. या जाहिरातीनंतर त्यांना 'बाबुल का आंगन छुटे ना' या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारली. मात्र, त्याला या मालिकेतून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर त्याला कलर्स टेलिव्हिजनचा शो 'बालिका वधू' मध्ये 'शिव'ची भूमिका मिळाली. सिद्धार्थने या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली.


सिद्धार्थची कारकीर्द


अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो 'ब्रोकन बट ब्यूटीफुल 3', 'बालिका वधू' आणि 'दिल से दिल तक'मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या 'बाबुल का आंगन छुटे ना' या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Wednesday, September 1, 2021

नांदेडात खळबळ ! मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक

नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात साईसदन हे अशोक चव्हाण यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाला सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. असे असतानाही ही दगडफेकीची घटना घडली आहे. एका अज्ञात महिलेने ही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीतच या घटनेमुळे नांदेडात खळबळ उडाली आहे.



दगडफेकीच्या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दगडफेक करणारी महिला नेमकी कोण होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ती मनोरुग्ण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दगडफेकीची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे एक पथक अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळेही घटनास्थळी दाखल झाले, परंतु तोपर्यंत ही महिला पसार झाली होती.


या घटनेनंतर शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. या महिलेने अशोक चव्हाण यांच्या घराच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरूवात केली, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने फेकलेला दगड घराच्या दर्शनी भागात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या केबिनवरील काचावर लागला. त्यामुळे केबिनची काच फुटली. पोलिस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष राहा - विजय वडेट्टीवार


सोलापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील कोरोना स्थिती, आश्रमशाळा, कायदा व सुव्यवस्था, चारा छावणी याबाबत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपलेला नसल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली असून लहान मुले बाधित होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा.


लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. कोरोनासाठी काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हिताचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सेटलमेंटमध्ये म्हाडाच्या घराचा प्रस्ताव, सांस्कृतिक सभागृहाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.




जिल्हाधिकारी शंभरकर यांनी चारा छावण्यांच्या निधीबाबत सांगितले. यावर वडेट्टीवार यांनी प्रस्तावाला मंत्रालय स्तरावरून मान्यता देण्यात येईल, असे सांगितले. जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा. टॅबचे संनियंत्रण करा, तांडा वस्तीचा प्रस्ताव आणि घरकुलांच्या 30 कोटींच्या प्रस्तावाला मंत्रालय स्तरावरून मंजुरी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही त्यांनी आढावा घेतला. कोरोना महामारीतील गुन्ह्यांचे प्रमाण, महिलांवरील अत्याचाराबाबत त्यांनी श्रीमती सातपुते यांच्याकडून माहिती घेतली. सोलापूर शहराच्या पाण्याबाबत योग्य नियोजन करून पुनर्वापर प्रक्रिया राबवा. ग्रीन बिल्डींगसाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही वडेट्टीवार यांनी केल्या.

Tuesday, August 31, 2021

बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना नाव न घेता टोला

ठाणे: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

केवळ बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत. त्यासाठी कामं करावी लागतात, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणेंना नाव न घेता लगावला. (cm uddhav thackeray slams narayan rane over jan ashirwad yatra)



शिवसेना आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला. प्रतापने ऑक्सिजन प्लांटचं जे काम केलं ते खरं काम. हे खरे आशीर्वाद. या कामातून जनतेचे आशीर्वाद मिळतात. नुसतं बोंबलून काही आशीर्वाद मिळत नाही. आशीर्वाद द्या हो… आशीर्वाद द्या हो… कशासाठी देऊ? काय नाही… असेच द्या… असे नाही आशीर्वाद मिळत. या कामातून आशीर्वाद मिळतात, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.


हे खूप दुर्देवी


दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे, असंही ते म्हणाले.


हे काही स्वातंत्र्य युद्ध नाही


मनसे आणि भाजपने कोरोनाचे नियम मोडून दहीहंडी उत्सव साजरी केली. त्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. कोरोनाचे नियम मोडून आम्ही करून दाखवलं असं सांगायला हे काही स्वातंत्र्य युद्ध नाहीये. हे काही स्वातंत्र्य मिळून दाखवलं नाही. त्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. कोरोनाचे नियम सरकारने का घालून दिले आहेत? याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे ना. निर्बंधांना विरोध करायला फुकट कोरोना वाटप करण्याचा हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये, अशी टीका त्यांनी मनसे आणि भाजपचे नाव न घेता केली.


खुमखुमी असेल तर कोरोनाविरोधात आंदोलन करा


तिसरी लाट येऊ शकते. त्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे. केंद्राने पत्रं दिलं आहे. त्यात त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सवात निर्बंध पाळा असं म्हटलं आहे. त्यामुळे कोणतंही सरकार कोणत्याही सणांविरोधात नाहीये. आपण कोरोना विरोधात आहोत. त्यामुळे आंदोलन करण्याची ज्यांना खुमखुमी आहे. त्यांनी कोरोनाविरोधात आंदोलन करावं. प्रतापने जे आंदोलन केलं ते कोरोनाविरोधातील आंदोलन आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाविरोधात आंदोलन करण्याची यांची हिंमत नाही, कुवत नाही. विचार नाही आणि तेवढी प्रगल्भताही नाही. त्यांना रस्त्यावर उतरून गोंधळ घालायचा आहे. आणि शिस्त पाळणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालायचा आहे. हे लोक बेजबाबदारपणे वागत आहे. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. मला मात्र माझ्या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे, असंही ते म्हणाले. (cm uddhav thackeray slams narayan rane over jan ashirwad yatra)

Monday, August 30, 2021

मुंबईसह ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचेच; ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी

मुंबई: गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मात्र, पावसामुळे कुठेही पाणी साचल्याच्या किंवा वाहतूक कोंडी झाल्याच्या घटना घडल्या नसल्याचं वृत्त आहे. तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. (Mumbai, Thane, and Palghar continue to receive heavy rains)



मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, आतापर्यंत या भागात कुठेही पाणी साचलेले दिसत नाही. मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईच्या इस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर दृष्यमानता कमी झाली आहे. येत्या तीन ते चार तासात मुंबई, ठाणे, पालघर परिसरात तुफान पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे.


ठाण्यात जोरदार पाऊस


दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा ठाण्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र या भागात कोणतीही वाहतूक कोंडी झाली नाही. सद्या तरी सखोल भागात पाणी साचले नसले तरी पावसाचा जोर जर वाढला तर सखल भागात पाणी साचू शकते. तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.


अंबरनाथ, बदलापूरला झोडपले


अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि ग्रामीण परिसरातही रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू झाली आहे. सकाळपासून या भागात पावसाचा जोर वाढला आहे. मात्र अजून कुठेही पाणी साचल्याची किंवा अन्य घटना नाही घडलेली नाही. कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या भागात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...