Friday, August 27, 2021

भारत सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर होणार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा विश्वास



Friday, 27 Aug, 4.19 pm

पुणे : आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उच्च विद्याविभुषित शास्त्रज्ञ आहेत. भारत केवळ सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर बनू शकतो.




तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. संरक्षण संस्था व आधुनिक तंत्रज्ञान (डीआयएटी) संस्थेतील शास्त्रज्ञांकडे पाहून ते नक्की पूर्ण होईल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पुण्यात व्यक्त केला.

पुण्यातील खडकवासला येथील डीआयएटी संस्थेतील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, डीआयएटीचे कुलपती डॉ. सी. पी. रामनारायण आदी उपस्थित होते.


राजनाथसिंह म्हणाले, की भारताने तयार केलेल्या लसीचा आज अनेक जगातील अनेक देशांना फायदा होत आहे. देशात शोध आणि संशोधनाचे वातावरण तयार झाले आहे. संशोधनात भारत पुढे जात आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आपेक्षित आहे. माेठ्या प्रमाणात त्याला चालना मिळून त्यात आणखी गती यायला हवी. भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल पुण्यात दरवर्षी आंतररा‌ष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित व्हायला हव्यात. त्यासाठी डीआयएटी संस्थेने पुढाकार घ्यायला हवा.


आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन एनर्जी आणि बायो सायन्स या विषयात खूप काही करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. विशेष करून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप संशोधनाची गरज आहे. डीआयएटीतील डॉ. पवनकुमार खन्ना, डॉ. भास्कर मुजुमदार व आणखी एक अशा तीन शास्त्रज्ञांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला. २ टक्के ब्रकेटमध्ये त्यांचा समावेश हा आपल्यासाठी गौरवाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार राजनाथसिंह यांनी यावेळी काढले.


'आय-डेक्स'फौजीसाठी १ हजार कोटींची तरतुद

केंद्र सरकारने संरक्षणाच्या दृष्टीने इनोव्हेशन व डिफेन्स एक्सलन्ससाठी (आय-डेक्स फॉर फौजी) बाहेरून खरेदीसाठी तब्बल एक हजार कोटी रूपयांची तरतुद केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी तरतुद करण्यात आली. त्याचबरोबर डिफेन्स आणि एअरोपेस क्षेत्रात इनोव्हेशनसाठी ३०० स्टार्टअपला सहाय्य करण्यासाठी मदत करण्यात येत आहे. त्यासाठी ५०० कोटी रूपयांचा निधी वेगळा देण्यात आला. 

----

'डीआयएटी'ला कोविडचे ९ पेटंट

पुण्यातील डीआयएटी संस्थेने कोविड-१९ संदर्भात सखोल संशोधन केले आहे. त्यासाठी ९ पेटंट मिळाले आहेत. ही गौरवाची बाब असून भारतातील अनेक उद्योग त्याचा वापर करू लागले आहेत, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले.

एकनाथ खडसेंना सर्वात मोठा धक्का, एवढ्या कोटी रुपयांची संपत्ती जप्त

मुंबई | भोसरी MIDC मधील जमीन खरेदी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे.



या मालमत्तांची एकूण किंमत 5 कोटी 73 लाख रुपये असल्याची माहिती समजत आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. एका प्रकरणात तर खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने एकनाथ खडसे यांच्या मालमत्तांच्या जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांच्या लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ताचा समावेश असून मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे.


ईडीच्या आरोपानुसार 2016 मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथे एक भूखंड खरेदी केला होता. हा भूखंड MIDC च्या मालकीचा होता. त्यावेळी या भूखंडाचा बाजारभाव 31 कोटी रुपये होता, मात्र अवघ्या 3 कोटी रुपयांमध्ये हा भूखंड विकत घेण्यात आला होता. खडसे यांनी स्वतःच्या अधिकारपदाचा गैरवापर केल्याचा आरोप यामुळेच केला जात आहे.


भोसरीतील भूखंड इतक्या कमी किंमतीत घेण्यासाठी व्यवहार कसा काय झाला? गिरीश चौधरी यांनी हा भूखंड विकत घेण्यासाठी गोळा केलेले 3 कोटी रुपये नेमके कुठून आले?, यासह इतर काही मुद्द्यांचा ईडीकडून तपास केला जात आहे. आगामी काळात या प्रकरणात ईडी काय कारवाई करणार हे पहावं लागेल.

Thursday, August 26, 2021

ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखावर शाखेतच हल्ला; पोलिसांना 'हा' संशय

ठाणे: शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर शिवसेना शाखेतच हल्ला करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी रात्री ८.३० वाजता ठाणे येथील श्रीरंग सोसायटी भागात घडला. हल्लेखोराने चॉपरने तीन ते चार वार केल्याने जयस्वाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ( Thane Shiv Sena Vibhag Pramukh Attacked )



श्रीरंग सोसायटीजवळ असलेल्या शिवसेनेच्या शाखेत हा प्रकार घडला असून हल्ला नेमका कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. जयस्वाल यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्लेखोरही जखमी असल्याचे समजते. आपआपसातील भांडणातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



हल्लेखोराला स्थानिकांनी पकडले

ठाणे पोलिसांनी या हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या हल्ल्यात अमित जयस्वाल यांच्या कानाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराला तिथे उपस्थित असणाऱ्यांनी पकडले असून त्याला मारहाणही करण्यात आली आहे. त्यात जखमी असलेल्या हल्लेखोराला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची ओळख पटली आहे. मात्र तूर्त ओळख उघड करण्यात येत नसल्याचे पोलीस सूत्रांकडून नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जयस्वाल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

ठाणे महापालिका निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक आयोगाचे महापालिकांना पत्र ; अनेक ज्येष्ठ उमेदवारांना होणार फायदा

मुंबई : राज्यातील २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या महापालिकेच्या निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली असून यंदा ठाणे, मुंबईसह १७ महापालिकांच्या निवडणुका एक सदस्य प्रभाग पद्धतीने होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. ठाणे महापालिकाची निवडणूक चार सदस्यांच्या पैनल पद्धतीने होणार असल्याची चर्चा पहिले रंगली होती मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महापालिकेची निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाण्यातील अनेक ज्येष्ठ माजी नगरसेवकांना मोठा दिलासा यावेळी मिळाला आहे. 

गेल्यावेळी ठाणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यांचे एक पैनल अशा पद्धतीने झाली होती. त्यामुळे उमेदवारांना चार प्रभागांमध्ये मोर्चेबांधणी करावी लागली होती मात्र ही मोर्चेबांधणी करण्यास अनेक ज्येष्ठ माजी नगरसेवकांना जमले नसल्यामुळे त्यांचा पराभव झाले होते. नगरसेवक केवळ आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवित असून इतर प्रभागातील नागरिकांशी त्यांचा फारसा संबंध येत नाही त्यामुळे उमेदवारांना मागील महापालिका निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला होता.



यंदा राज्य निवडणूक आयोगाने ठाणे, मुंबई, उल्हासनगर,भिवंडी, पनवेल, मिरा - भाईंदर महापालिकांसह १७ महापालिकांचा निवडणुका एक सदस्य प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतले आहे. यसंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. महापालिकांची व्यापकता लक्षात घेत प्रभाग रचना वेळेत अंतिम करणे सुकुर व्हावे यासाठी प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०१९ साली प्रसिद्ध अधिनियम नुसार सर्व महापालिका निवडणुका बहुसदस्य पद्धतीने घेण्याचे ठरविण्यात आले होते मात्र यंदा एक सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग एक सदस्याचा असणार आहे. प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली लोकसंख्या विचारात घ्यावी आणि त्यानुसार प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही २७ ऑगस्ट २०२१ पासून सुरु करुन आयोगाला ईमेल द्वारे कळविण्याची सुचना निवडणूक आयोगाकडून १७ महापालिकांना देण्यात आल्या आहेत.

Wednesday, August 25, 2021

नारायण राणेंची जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरु होणार


मुंबई  । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई येथून सुरु केलेलया जन आशिर्वाद यात्रेत महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

त्यांनंतर त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. मंत्री राणेंना अटक करण्यात आल्याने जन आशीर्वाद यात्रा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती. ती पुन्हा मंत्री राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारपासून सुरु करण्यात येणार आहे. याबाबत आज सायंकाळी निर्णय घेतला जाणार आहे.




भाजपकडून मोठ्या उत्साहात जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आलेली होती. या जन आशिर्वाद यात्रेतून महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून टीकास्त्र डागले गेले. महाराष्ट्रातील मुंबईतून नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेतून सर्वाधिक टीका हि शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झाली झाली. दरम्यान, राणेंनी टीका केल्यानंतर त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यामुळे भाजपची जन आशीर्वाद यात्रा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती.


दरम्यान, नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आल्याने भाजपकडून स्थगित करण्यात आलेली जन आशीर्वाद यात्रा आता पुन्हा शुक्रवारपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या जन आशिर्वाद यात्रेतून राणे पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधणार का? हे पाहावे लागणार आहे.

Monday, August 23, 2021

शिवस्मारकाच्या बांधकामाला मुदतवाढ देण्यासाठी प्रस्ताव; स्मारक समितीचे बांधकाम विभागाला पत्र

मुंबई : कोरोना काळ तसेच कॅगचा ठपका अशा विविध कामांमुळे मागील दोन-अडीच वर्षांपासून ठप्प पडलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारक प्रकल्प उभारणीच्या कामाला मुदतवाढ मिळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव पाठवला आहे.



तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सप्टेंबर 2018 मध्ये शिवस्मारकाच्या कामाची वर्क ऑर्डर कंत्राटदार एल अँड टी कंपनीला देण्यात आली. 36 महिन्यांत सदर प्रकल्प पूर्णत्वास न्यायचा होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2019 मध्ये दिलेली स्थगिती आणि कोविडचे संकट यामुळे प्रकल्प काही पुढे जाऊ शकला नाही. गेल्या अडीच वर्षांत नियोजित स्मारकाच्या जागेवर भूस्तर सर्वेक्षणासाठी 60 पैकी 26 बोअर्स घेण्यापर्यंतचे काम कंपनीने केले आहे.


कामाला एक वर्षाची मुदतवाढ


सध्याच्या निविदेच्या रकमेत भाववाढ न वाढ करता ठेकेदार कंपनीस एका वर्षाची मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवला आहे.


बांधकाम विभागासमोर पेच


मात्र फडणवीस सरकारच्या काळातील निविदा प्रक्रियेवर महालेखापरीक्षक यांनी घेतलेल्या आक्षेपांचे काय, प्रकल्प तसाच पुढे नेला तर अनियमितता होईल असा पेच सार्वजनिक बांधकाम विभागासमोर निर्माण झाल्याचे समजते.


कॅगचा ठपका काय …


कॅगने एप्रिल ते मे 2019 या काळात शिवस्मारकाच्या कामाचे ऑडिट केले. त्याचा अहवाल ऑक्टोबरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवला होता. शिवस्मारकाच्या प्रकल्प सल्लागाराला अनावश्यक 9 कोटी 61 लाख रुपयांचा फायदा करून दिल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे यामधील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली होती.


प्रकल्पाविषयी …


212 मीटर उंच व 3 हजार 643 कोटी रुपये खर्चाचा अरबी समुद्रातील हा शिवस्मारक प्रकल्प आहे. मात्र पावसाळय़ातील 5 महिने शिवस्मारक पर्यटकांसाठी बंद ठेवावे लागेल. त्यात पर्यटकांच्या प्रवासाच्या नियोजनाचा अभ्यास अजून झालेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प आहे त्या स्थितीत होऊ शकत नसल्याचे बांधकाम विभागातील अधिकाऱयांचे मत आहे.

नारायण राणे यांच्या अटकेसाठी पुणे पोलीस रवाना; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवणार


पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात चतु:शुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुणे पोलिसांचे पथक त्यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले आहे. त्यामध्ये दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. याप्रकरणी शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम रा. पाषाण यांनी तक्रार दिली आहे.



सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. याप्रकरणी शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस रोहित कदम यांनी त्यासंदर्भात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


घटनेचे गांभीर्य ओळखून सोमवारी रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत विस्ताराने चर्चा केली होती. यानंतर पुणे पोलिसांचे एक पथक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना करण्यात आल.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...