Ganeshotsav 2021 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
अशातच सर्व चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई, गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशातच यंदाचा गणेशोत्सवही कोरोनाच्या सावात पार पडणार आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "यंदाही गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई, गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावाकडे जाणाऱ्यांना टोलमाफीचे स्टिकर पुरवले जाणार आहेत. त्यासाठी चाकरमान्यांना आपल्या वाहनांची नोंद करावी लागणार आहे. गणेश आगमनाच्या दोन दिवसआधीपासून या टोलमाफीला सुरुवात होईल आणि गणेश विसर्जनानंतर दोन दिवसापर्यंत ही टोलमाफी असेल."
टोलमध्ये सवलत मिळवण्यासाठी नागरिकांनी स्थानिक पोलीस स्टेशन, आरटीओ कार्यालयात आपला वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव व प्रवास तारीख नमूद केल्यास तात्काळ टोल माफी स्टिकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment