मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना १५ ऑगस्टपासून लोकल सेवा सुरु करत असल्याचे जाहीर केले. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी असणार असून यासाठी काही अटी आणि शर्थी लावण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, यावेळी त्यांनी निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती, असे दानवे यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.
'करोनाची सुरुवात झाल्यानंतर २२ मार्च २०२० ला लोकल सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर काही ठराविक प्रवाशांसाठी १५ जूनपासून सेवा सुरु करण्यात आली होती.
रेल्वेची भूमिका कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही राज्याला करोना स्थिती नियंत्रणात आली असेल तर केंद्राला कळवा आम्ही त्वरित जनतेच्या सेवेत रेल्वे आणू असे सांगत होते. असेही सध्या ९० टक्के फेऱ्या सुरुच आहेत,' असे रावसाहेब दानवे यांनी यावेळी म्हटले.
प्रवाशांसाठी स्मार्टफोन, क्यूआर कोड या अटींसंबंधी बोलताना त्यांनी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती असे मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. 'जनतेची सुविधा लक्षात घेतली पाहिजे. दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करु द्यायचा होता तर मग हा निर्णय फार आधी घ्यायला हवा होता,' असेही ते म्हणाले.
हे क्यूआर कोड काढण्याची आणि तपासण्याची जबाबदारी कोणाची? अशी विचारणा करताना रावसाहेब दानवेंनी रेल्वेच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड आणि पास तपासले पाहिजेत असे सांगत राज्य सरकारवर जबाबदारी ढकलली आहे.
'राज्य सरकारलाच ही तपासणी करावी लागणार आहे. दोन डोस घेतलेल्यांचा रेकॉर्ड सरकारकडेच आहे. सत्यता पडताळण्यासाठी रेल्वेकडे अशी कोणती यंत्रणा नाही. प्रवास करणाऱ्यांसाठी राज्य सरकारनेच तपासण्याची योजना करावी. ही राज्य सरकारची यंत्रणा आहे त्यामुळे त्यांनीच ओळख पटवावी. रेल्वे त्यांना सुरळीत प्रवास करु देईल,' असे त्यांनी म्हटले आहे. ही घोषणा फार आधी व्हायला हवी होती. पण आमच्याकडून स्वागत आहे असेही ते म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment