Monday, August 2, 2021

पंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ


कोलंबो - करोनाची बाधा झालेल्या व सध्या श्रीलंकेत विलगीकरणात असलेल्या तीन भारतीय क्रिकेटपटूंना श्रीलंका सरकारने तातडीने मायदेशी परतण्यास मनाई केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान कृणाल पंड्या, यजुवेंद्र चहल व कृष्णाप्पा गौतम यांना करोनाची बाधा झाल्यामुळे सध्या विलगीकरणात ठेवले गेले आहे.



त्यांची सातत्याने चाचणी करण्यात येणार आहे. जर या चाचणीत ते निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले तरच त्यांना भारतात परतता येणार आहे. मात्र, त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असेल तर त्यांना विलगीकरणाचा पूर्ण कालावधी पूर्ण केल्यावर तसेच पुन्हा चाचणी करत अहवाल पाहिल्यावरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही श्रीलंका सरकारने स्पष्ट केले आहे.


भारताने श्रीलंकेत एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. मात्र, टी-20 सामन्यांची मालिका गमवावी लागली. दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी पंड्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या भारताच्या आठ खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.


त्यामुळे भारताचे आठ खेळाडू श्रीलंकेच्या दौऱ्यातून बाहेर पडले व त्यांच्या जागी राखीव खेळाडूंना खेळवले गेले होते. कृणालच्या संपर्कात आलेल्या चहल व गौतम यांनाही करोना झाल्याचे समजल्यावर त्यांनाही विलगीकरणात पाठवले गेले. दरम्यान, ही मालिका पार पडल्यावर उर्वरित खेळाडू भारतात परतले. मात्र, या तिघांनी भारतात परतण्याची परवानगी श्रीलंका सरकारने नाकारली.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...