मुंबई : अनाथांची आई (माई) म्हणून सुपरिचित पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचा आज महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांच्याकडून सत्कार करण्यात आला. विश्वविद्यालयात सिंधुताई सपकाळ यांच्या आगमनानिमित्त त्यांनी विश्वविद्यालयातील अध्यापक, शोधार्थी आणि विद्यार्थ्यांशी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने संवाद साधला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी विद्या भवनातील दत्तोपंत ठेंगड़ी सभागृहात आयोजित संवाद कार्यक्रमात त्यांनी आपल्या जीवनातील संघर्ष उलगडून सांगितला. त्यांनी अध्यापकांकडून विचारलेल्या प्रश्नांवर मनमोकळी चर्चा केली.
सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की विश्वविद्यालयात आल्याने मला माहेरी आल्यासारखे वाटत आहे. मी पुस्तकातून नव्हे तर जीवनात आलेल्या खडतर अनुभवातूनच शिकले आहे, असे त्या म्हणाल्या. जीवन संघर्षाच्या प्रवासावर बोलतांना माई म्हणाल्या की संघर्षच मनुष्याला समृद्ध बनवितो.
माई सिंधुताईंनी क्षमा व प्रेम यांचे महत्व अधोरेखित केले. कष्टातून मनुष्य घडतो यावर त्यांनी विशेष भर दिला. भूकेशी सामना होतो तेव्हा दूस-याच्या भूकेचा अंदाज येतो. सामाजिक संवेदना व निस्वार्थ भावनेतून सर्वांप्रती प्रति प्रेम व करूणा हाच जीवनाचा मूल मंत्र होय असे त्या म्हणाल्या. यावेळी सिंधुताईंनी बहिनाबाई चौधरी यांचे गीतही गायीले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी भारतीय परंपरेत मातृत्वाची महिमा आणि संत परंपरा यांची चर्चा केली. त्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची प्रशंसा केली. विश्वविद्यालय सामाजिक उत्तरदायित्वाच्या कामात नेहमी अग्रेसर आहे असे ते म्हणाले. प्रो. शुक्ल यांनी सिंधुताईंना विश्वास दिला की प्रतिवर्ष त्यांनी पाठवलेल्या 5 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च विश्वविद्यालय वहन करील. याप्रसंगी प्रो. शुक्ल यांनी स्त्री अध्ययन विभागाद्वारे सिंधुताईंवर केलेल्या लघु शोध प्रबंधाची एक प्रत सिंधुताईंना सादर केली. कार्यक्रमाचे संचालन स्त्री अध्ययन विभागाच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया पाठक यांनी केले तर आभार महात्मा गांधी फ्यूजी गुरुजी सामाजिक कार्य अध्ययन केंद्राचे सहायक प्रोफेसर डॉ. शिव सिंह बघेल यांनी मानले. यावेळी विश्वविद्यालयाचे प्रकुलगुरु द्वय, अधिष्ठातागण, विविध विभागाचे अध्यक्ष प्रत्यक्षपणे तर अध्यापक, शोधार्थी व विद्यार्थी मोठया संख्येने ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment