Monday, July 26, 2021

अकरावी प्रवेशाची 'सीईटी' परीक्षा विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी 'सीईटी' चे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सोमवारी (दि.26) दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने https://cet. 11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही सुविधा दि.2 ऑगस्ट अखेर पर्यंत उपलब्ध असणार आहे.



येत्या 21 ऑगस्ट रोजी 'सीईटी' परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 20 जुलै रोजी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.मात्र हे संकेतस्थळ तांत्रिक अडचणी मुळे बंद पडले होते.

आता पुन्हा सुविधा सुरू होत आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती नोंदवावी लागणार आहे. ई-मेल आयडी , मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य आहे.

परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास एक माध्यम निश्चित करावे लागेल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग निश्चित करावा लागेल.


ज्या विद्यार्थ्यांनी दहावीचे अर्ज भरताना एस एस एसईबीसी प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा ईडब्लू हा प्रवर्ग निवडावा लागेल. प्रथम आवश्यक माहिती निश्चित करून ठेवावी व तद्नंतर अकरावी प्रवेशासाठी आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी लागणार आहे.


20 व 21 जुलै या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशिल पूर्वीचा अर्ज क्रमांक व आवेदनपत्र भरतांना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून संकेतस्थळावर पाहता येईल. प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकतानाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.


सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, व अन्य संबंधीत घटकांच्या शंकांचे निरसन पालक करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा तपशिल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


राज्य मंडळाची दहावीची परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण / प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया बुधवार 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तरी याबाबत संबंधीत विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...