मुंबई : मुंबईत जुलै महिन्यात होणाऱया सरासरी 965 मिमी पावसापैकी 16 ते 18 जुलै या तीन दिवसांत 371.8 मिमी म्हणजेच तब्बल 35 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये शनिवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. म्हणजेच 35 टक्के पाऊस दोन दिवसांत झाला आहे. दरम्यान, अतिवृष्टीच्या कालावधीतच समुद्राला असणाऱया भरतीने फ्लड गेटने समुद्रात पाणी जाण्यापासून रोखले गेले. परिणामी मुंबईच्या विविध भागांत पाणी तुंबल्याचे प्रकार घडले. मात्र पालिकेचे सहा पंपिंग स्टेशनवरील 43 आणि पाणी साठणाऱया विविध ठिकाणी बसवलेल्या 528 पंपांमुळे 16 तासांत तुंबणाऱया पाण्याचा निचरा अवघ्या 2 तासांत झाला.
सात बेटांचे शहर असणाऱया मुंबईत झपाटय़ाने होणारे औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे काँक्रीटचे जंगलच निर्माण झाले आहे.
ब्रिटिश काळात पडणाऱया एकूण पावसापैकी 25 टक्के पाणी वाहून जाण्याची तर 75 टक्के पाणी जमिनीत झिरपण्याची यंत्रणा कार्यरत होती. मात्र वाढणाऱया काँक्रीटीकरणामुळे पाणी झिरपण्याचे प्रमाण अत्यल्प झाल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळेच 26 जुलै 2005 च्या महाभयंकर अतिवृष्टीनंतर नेमलेल्या 'चितळे समिती'च्या शिफारशीनुसार 'ब्रिमस्टोवॅड' म्हणजेच 'पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढण्याच्या' प्रकल्पांतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली. यामध्ये एका तासात 25 मि. मी. पाऊस झाला तरी पाण्याच्या निचऱयाची क्षमता प्रतितास 50 मि. मी. पावसाइतकी करण्यात आली आहे. मात्र शहरात या पर्जन्य जलवाहिन्या भूमिगत असल्याने येणाऱया मर्यादा आणि उपनगरात परिणामकारक नाल्यांच्या तुलनेत कमी प्रभावी ठरत असल्याने काही ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
जर्मनीपेक्षा दुप्पट पाऊस होऊनही मुंबई पूर्वपदावर
जर्मनीमध्येही सध्या अतिवृष्टी होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी 24 तासांत 158 मि.मी. पाऊस झाल्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र मुंबईत केवळ तीन तासांत 250 मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचले. मात्र पाण्याचा निचरा वेगाने झाल्याने काही तासांतच जनजीवन पूर्वपदावर आले, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
भूमिगत टाक्यांचा प्रयोग यशस्वी होतोय
सात बेटांचे शहर असलेले मुंबई शहर समुद्रसपाटीपासून सखल आहे. त्यामुळे समुद्राला भरती असताना पावसाचे पाणी समुद्रात जात नाही. त्यामुळे हिंदमाता आणि सब वेच्या ठिकाणी भूमिगत टाक्यांचा प्रयोग पालिका करीत आहे. हिंदमाता या ठिकाणी या वर्षी काही प्रमाणात पाणी साचले तरी भूमिगत टाक्या आणि रस्त्यांची वाढवलेली उंची यामुळे अतिवृष्टी सुरू असतानाही वाहतूक सुरळीत सुरू होती.

No comments:
Post a Comment