Monday, September 27, 2021

आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा

Mumbai : | महाराष्ट्र आरोग्य विभागानं स्थगित केलेली पदभरतीची परीक्षा कधी घेतली जाणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षेची नवी तारीख जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.


राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाची ही परीक्षा 15-16 ऑक्टोबर किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल तसेच याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊन विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली जाणार आहे.



जर रेल्वेची परीक्षा पुढे ढकलता आली, तर 15-16 तारखेला आरोग्य विभागाची परीक्षा होईल. जर रेल्वेची परीक्षा पुढं ढकलणं शक्य झालं नाही, तर मात्र 22-23 तारखेला परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.


दरम्यान, महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत घेतली जाणारी गट क आणि गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा आदल्या दिवशी करण्यात आली.

आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी द्या, व्यापाऱ्यांना आवाहन करत काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर

 मुंबई : केंद्र सरकारने गेल्या वर्षी पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात आज काँग्रेससह सर्वच समविचारी पक्षांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातत या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला.


सकाळ सत्रात बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवत नव्हता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.



भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परंतु, केंद्र सरकारने या आंदोलनाची अद्यापही दखल घेतलेली नाही. या बाबीचा निषेध नोंदवण्यासह दिल्लीतील आंदोलनाला पाठबळ म्हणून आज काँग्रेससह देशभरातील समविचारी पक्षांनी एकत्र येत देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. याच अनुषंगाने आज जळगावातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर समविचारी पक्षांनी भारत बंद पाळला जात आहे.


बाजारपेठ सुरु, नेते उतरले रस्त्यावर


आज देशव्यापी भारत बंद आंदोलन असताना जळगावात मात्र सकाळपासूनच बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. त्यामुळे बंद यशस्वी होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. शहरातील बाजारपेठेचा मुख्य भाग असलेल्या महात्मा फुले मार्केट, टॉवर चौक, गोलाणी मार्केट, नवी पेठ भागात फिरून दोन्ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.


एक दिवस शेतकऱ्यांसाठी द्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. दरम्यान, काही व्यापारी दुकाने बंद करत नसल्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. व्यापारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.


केरळपासून दिल्लीपर्यंत, रस्ते बंद, रेल्वे ट्रॅक जाम!


दुसरीकडे राजधानी नवी दिल्लीसह पंजाब, हरियाणामध्ये भारत बंदला मोठा उस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. अनेक राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग देखील बंद आहेत. अनेक ठिकाणी चक्काजाम करण्यात आलं. गाजीपूर, सिंघु बॉर्डवर देखील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.


राज्यातील शेतकरी संघटना आणि काही पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे बाजार समित्या, शहरातील मुख्य मार्केट यावर परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेस पक्षानेही आंदोलनाला पाठिंबा दिला असून स्थानिक पातळीवरही पोलीस बंदोबस्त राहणार आहे.


दिल्ली ते केरळ शेतकरी रस्त्यावर, रस्ते बंद, रेल्वे ट्रॅक जाम, गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी जमले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, बुलेट ट्रेनसंदर्भात पत्र लिहून दिलं 'हे' आश्वासन

मुंबई, 27 सप्टेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र (Letter) लिहिलं आहे. मुंबई-नाशिक- नागपूर हायस्पीड (HighSpeed Railway) रेल्वेबाबत हे पत्र लिहल्याचं समजतंय.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमांदरम्यान विकासाची ब्लू प्रिंट (Blue Print) मांडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून विनंती केली. नागपूर, नाशिक, मुंबई आणि मुंबई, नागपूर, हैद्राबाद बुलेट ट्रेन संदर्भात हे पत्र आहे. महाराष्ट्रातील प्रस्तावित हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि समृद्धी महामार्ग यांच्या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी थेट मोदींना पत्र पाठवून पंतप्रधानांचं लक्ष वेधून घेतलं आहे.




या पत्रात मुख्यमंत्र्यांनी राज्य आणि केंद्र सरकार मिळून राज्यातला प्रकल्प पूर्ण करु, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेनेला आणखी एक धक्का, माजी खासदाराला ED चे समन्स रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकारकडून 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडोर मंजूर करण्यात आलेत. त्यात राज्यातील दोन हायस्पीड रेल्वे कॉरिडोरचा समावेश केला आहे. यात नागपूर- नाशिक- मुंबई आणि मुंबई- पुणे- हैदराबाग या दोन रेल्वे कॉरिडोरचा समावेश आहे.


या कॉरिडोरसाठी राज्य सरकारकडून सर्व मदत मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. उद्धव ठाकरेंची अमित शहांकडे केली मागणी केंद्रीय गृहमंत्री (Home Minister) अमित शहा (Amit Shah) यांनी वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या (Important meeting in wake of rising Naxal action) संदर्भात दिल्लीत (Delhi)काल बैठक (Meeting)आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी गृहमंत्र्यांकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या. नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्यातील परिस्थिती, नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती आणि नक्षलग्रस्त भागात कराव्या लागणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यासाठी लागणारा खर्च याबाबत गृहमंत्र्यांना आकडेवारी सांगितली

Thursday, September 23, 2021

अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो, गडकरींचा शब्द

पुणे : पुण्यात (Pune) आज सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं (Singhgad ) भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते झालं.

यावेळी नितीन गडकरी यांनी देशभरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची यादीच वाचून दाखवली. मी दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.



उड्डाणपुलाचं उद्घाटन करताना नितीन गडकरी म्हणाले, मुंबईतील वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात या पुलाची जबाबदारी मला मिळाली. मला खूप शिकायला मिळालं. सी लिंक वसई -विरारपर्यंत न्यायचा माझी इच्छा होती. पण महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे झालं नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.


आता मी मुंबई-दिल्ली हायवे बांधतोय, 170 किमी स्पीडने गाडी चालवली, पोटातलं पाणी हललं नाही. 70 टक्के काम पूर्ण झालंय, महाराष्ट्रातील काम राहिलं आहे, जेएनपीटीपर्यंत हा रस्ता नेणार आहे. अजितदादा आपण मागणी केली वसई -विरारपासून वरळीपर्यंत हा रस्ता जोडला तर मी नरीमन पॉईंटवरुन दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल. माझं वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं, माझ्या खात्याकडे खूप पैसे आहेत, दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडून देण्याचं काम मी नक्की करेन, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रस्ताव तयार करा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.


वाहनांचे हॉर्न बदलणार, अॅम्ब्युलन्सचा सायरनही बदलणार


पुण्यात येताना दुख होतं, पुण्यातील हवा शुद्ध होती, माझी बहीण पुण्याची, स्वारगेटजवळ बहिण राहत होती, पर्वतीवर जाऊन खायचं, आताचे पुणे प्रदूषित झालं, जल,वायू आणि ध्वनी प्रदूषण याबाबत इंटरनॅशनल बेंचमार्क आहेत, त्याचं पालन करु. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले, लाल दिवे काढले, मला ध्वनी प्रदूषणाचा त्रास लक्षात आला. मी ऑर्डर काढणार आहे, जर्मन व्हायलिनवादक होता, त्याने आकाशवाणीची ट्यून तयार केली होती, मी ती ट्यून शोधली, आता अॅम्ब्युलन्सवर ती लावणार, कानाला चांगलं वाटतं.


माझी इच्छा, पेट्रोल-डिझेल बंद करणे – नितीन गडकरी


माझी आयुष्यात एकच इच्छा, पेट्रोल-डिझेल बंद करणं, शेतकरी ही माझी इच्छा पूर्ण करु शकतात. मी राहुल बजाज यांचे चिरंजीव आणि टीव्हीएसचे श्रीनिवासन यांना म्हटलं, जेव्हापर्यंत तुम्ही इथेनॉल स्कूटर बनवत नाही, तोपर्यंत माझ्यापर्यंत येऊ नका, मी तुमचं काम करणार नाही. त्या दोघांनी इथेनॉल इंजिन बनवलं., ब्राझीलमध्ये १०० टक्के इथेनॉल आहे. आता रशियातून टेक्नॉलॉजी आणली आहे, १ लि. पेट्रोल बरोबर १ लि इथेनॉल.


मी राजीव बजाजला बोलावतो, पुण्यातील ऑटो, बाईक, मी तीन चार महिन्यात ऑर्डर काढतोय, बीएमडब्यू पासून मर्सिडीज, टाटा महिंद्रा सर्वांना फ्लेक्स इंजिन पेट्रोलचं बनवावं लागेल, ज्यात शंभर टक्के इथेनॉल, शंभर टक्के पेट्रोल हा पर्याय ठेवावा लागेल.


साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केली तर गाड्या चालतील, प्रदूषण बंद होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल. इथेनॉलसाठी मी पंतप्रधानांना विनंती केली,त्यांनी तीन पंप पुण्यात दिले. माझा ट्रॅक्टर सीएनजीवर आहे, १ लाख रुपये वर्षाला वाचतोय, असं नितीन गडकरी म्हणाले.

नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, म्हणाले, 'अनिवासी भारतीय हे देशाची ताकद'


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आज पहाटेच्या सुमारास नरेंद्र मोदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे दाखल झाले.



वॉशिंग्टनला पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलं.

ते म्हणाले, "माझं अत्यंत उत्साहाने स्वागत केल्याबद्दल मी वॉशिंग्टन डीसीमधील सर्व भारतीय समाजाचा आभारी आहे. अनिवासी भारतीय नागरीक हे आपली ताकद आहेत. भारतीय नागरिकांनी जगभरात कसं स्वतःला प्रस्थापित केलं, ते कौतुकास्पद आहे."

आपल्या तीनदिवसीय दौऱ्यात नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांच्यासह क्वॉड समूहातील नेत्यांची भेट घेणार आहेत.



पंतप्रधान या दौऱ्यात अमेरिकेतील सुप्रसिद्ध आणि दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखांचीही भेट घेतील.


अमेरिकेला रवाना होण्यापूर्वीही नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं होतं. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेला जात आहे, असं ते म्हणाले.


त्यांनी लिहिलं, "भारत आणि अमेरिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवरील रणनीतिक भागिदारी तसंच एकमेकांच्या हितांशी संबंधित क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करेन. आपल्या या दौऱ्यात उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांची भेट घेण्यासही मी उत्सुक आहे. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा केली जाईल."


पुढच्या एका ट्विटमध्ये त्यांनी लिहीलं, "मी राष्ट्राध्यक्ष बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांची वैयक्तिकरित्या पहिल्या क्वॉड बैठकीत सहभागी होईन. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात व्हर्चुअल शिखर संमेलन झालं होतं. त्याच्या परिणामांविषयी विचार-विमर्श करण्यात येईल. भारत-प्रशांत क्षेत्रातील आपला एकत्रित दृष्टिकोन भविष्यातील गतिविधींसाठी एक संधी प्राप्त करून देतो."


आज 5 दिग्गज कंपन्यांच्या CEO ना भेटणार


याठिकाणी नरेंद्र मोदी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या क्वॉड समूहातील देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेणार आहेत.


त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी या दौऱ्यात अमेरिकेतील दिग्गज कंपन्यांच्या प्रमुख व्यक्तींनाही भेटणार आहेत. यावेळी त्या उद्योजकांसाठी भारतातील संधी या विषयावर नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत.


गुरुवारी पंतप्रधान मोदी 5 अमेरिकन CEO सोबत बैठकीत सहभागी होतील.


यामध्ये दोन कंपन्यांचे CEO भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत.


एडोब कंपनीचे CEO शंतनू नारायण आणि जनरल अॅटोमिक्स कंपनीचे विवेक लाल हे भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक आहेत.


कोरोना काळात यावर्षी झालेल्या बांगलादेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेले आहेत.


अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले मोदी 26 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये परत येतील. नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यामध्ये 24 सप्टेंबर रोजी होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असेल.


अमेरिका दौरा कशासाठी?


राष्ट्रपती जो बायडन यांच्याबरोबर द्वीपक्षीय बैठक

जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांबरोबर क्वाड शिखर परिषदेत सहभाग

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण

विविध सरकारच्या नेत्यांनी सहभागी होण्याची क्वाडची ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या बैठकीकडे भारताचं लक्ष आहे.

 


जो बायडन यांनी जानेवारी महिन्यात पदग्रहण केल्यानंतर भारत आणि अमेरिकेतील ही पहिली द्वीपक्षीय शिखर परिषद आहे.


द्विपक्षीय बैठकीचा मुख्य अजेंडा काय आहे?


दोन्ही नेत्यांमध्ये द्वीपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दोन्ही नेते बहुआयामी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील असं परराष्ट्र सचिन हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितलं.


दोन्ही पक्ष द्वीपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणं, संरक्षण आणि संरक्षण सहकार्य बळकट करणं, नव्या आणि विकसनशील तंत्रज्ञानाचा विकास व अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी 24 सप्टेंबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये भेट होईल असं श्रृंगला यांनी स्पष्ट केलं.


या 50 मिनिटांच्या बैठकीत अफगाणिस्तानचा मुद्दा प्रामुख्याने येईल अशी शक्यता आहे. हर्ष श्रृंगला भारतीय शिष्टमंडळात सहभागी झाले आहेत. अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेते बोलतील असं ते म्हणाले.


क्वाडवर चीनचे आरोप


याआधी चीनने ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत आणि जपानच्या 'क्वाड' संघटनेला आशियाई देशांची 'नाटो संघटना' म्हणत टीका केली होती.


चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी 13 मे 2021 रोजी एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, "आपण सगळेच जाणतो की, 'क्वाड' कशा पद्धतीचा गट आहे. एक वेगळा गट बनवण्याच्या, चीनला आव्हान देण्याच्या, शेजारी देशांसोबत चीनचं भांडण लावण्याच्या प्रयत्नांचा चीन विरोध करत आहे."


आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात हुआ चुनयिंग यांनी म्हटलं की, "जिथवर क्वाडचा प्रश्न आहे, मला वाटतं की, भारत या प्रकारच्या तंत्राचा हेतू अधिक चांगलं जाणतो. चीनविरोधात छोटे छोटे गट तयार करण्याचा याचा हेतू नाहीय?"


याचप्रकारे चीन वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी क्वाड संघटनेवर टीका करत आलंय.


एस. जयशंकर काय म्हणाले?


पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, या पत्रकार परिषदेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी चीनने 'क्वाड' संघटनेबाबत केलेलं वक्तव्य फेटाळलं.


भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला उत्तर देताना म्हटलं की, वास्तवाला चुकीच्या पद्धतीने सादर केलं जाऊ नये, हे महत्त्वाचं आहे आणि क्वाड संघटना देशासह जगाच्या कल्याणासाठी काम करणारं व्यासपीठ आहे.


ते पुढे म्हणाले, "मला वाटतं नाटो हा शीतयुद्धाशी जोडलेला शब्द आहे आणि त्यातून इतिहासात डोकावता येतं. क्वाड हा भविष्याकडे झेपावते आणि जागतिकिकरणाशी प्रतिबिंबित करतं. विविध देशांनी एकत्र येत काम करण्याची आवश्यकता क्वाड प्रकट करतं."


त्याचसोबत, एस. जयशंकर यांनी म्हटलं की, क्वाड लस, लशींचा पुरवठा आणि शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर आधारित होती.


क्वाडची नाटोशी तुलना केल्याबाबत एस. जयशंकर म्हणाले, "क्वाडसारखी संघटना आणि नाटो किंवा तत्सम संघटनांमध्ये मला कुठलाच संबंध दिसत नाही. त्यामुळे मला वाटतं की, वास्तवाला चुकीच्या पद्धतीने सादर केलं जाऊ नये."

Wednesday, September 22, 2021

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचं विधान

 सातारा: आपल्या बिनधास्त आणि बेधडक विधानांमुळे प्रसिद्ध असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी आता अजब विधान केलं आहे. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते, असं अजब विधान उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.



त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (mp udayanraje bhosale statement on coronavirus)

खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरोना विषयी पुन्हा एकदा एक अजब वक्तव्य केल आहे. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज साताऱ्यात माध्यमांना दिली. आपल्याला कोराना होता का नाही हे माहीत नाही पण ताप असताना सुद्धा मी गार पाणी प्यायचो. त्यामुळे माझा खोकला वाढला आणि कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोणी काळजी करू नका. मला कोरोना झाला तेव्हा किती लोकांनी देव पाण्यात ठेवले मला माहीत नाही. पण, आज मी तुमच्यासमोर उभा आहे, असा मिश्किल टोला उदयनराजे यांनी लगावला.


ऑगस्टमध्ये कोरोनाची लागण


दरम्यान, ऑगस्टमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे संसदेचं अधिवेशन सोडून उदयनराजे साताऱ्यात परतले होते. दरम्यानच्या काळात उदयनराजे यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील 3 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर उदयनराजे भोसले पुन्हा एकदा सक्रिय झाले असून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

नितीन गडकरी 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

नवी दिल्ली | अलिकडे काही दिवसांमध्ये रस्त्यावरील अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवर्षी कित्येक लोकांना अपघातामुळे आपल्या प्राणाला मुकावं लागतं.

रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत.



व्यावसायिक वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताबद्दल गडकरींनी चिंता व्यक्त केली आहे. व्यावसायिक वाहनांच्या वेळा निश्चित असायला हव्यात. तसेच व्यावसायिक वाहनाच्या चालकाला झोप येत असल्यास त्याची माहिती देणारं एक सेन्सर गाड्यांमध्ये बसवण्यात यावं, अशी भूमिका गडकरी यांनी मांडली आहे. गडकरींनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.


व्यावसायिक वाहनांमध्ये सेन्सर लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गाड्यांमध्ये बसवले जाणार हे सेन्सर रात्रीच्या वेळी अतिशय महत्वाचे ठरणार आहेत. वाहन चालकाला झोप येत असल्यास या सेन्सरमुळे माहिती मिळेल, असं गडकरींनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


तसेच पायलटसाठी विमान चालवण्याचे तास ठरलेले असतात. पायलटप्रमाणेच ट्रक चालकांसाठी देखील वाहन चालवण्याचे तास निश्चित करायला हवेत. असं केल्यास चालक दमल्यामुळे जे अपघात होतात त्याची संख्या कमी होईल, असं मत गडकरींनी मांडलं आहे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...