Tuesday, April 5, 2022

महाराष्ट्र पेटवू नका, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे राज ठाकरेंना कळकळीचे आवाहन

महाराष्ट्र पेटवू नका, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे राज ठाकरेंना कळकळीचे आवाहन

मुंबई : मशीदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र पेटवू नका असे आवाहन केले आहे. लोकांना श्रीराम म्हणायला लावा परंतु राम नाम सत्य है बोलायला लावू नका असेही आव्हाड म्हणाले आहेत. 

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना आता काम मिळण्यास सुरूवात झाली आहे..सामान्य माणसांच्या खिशात पैसे नाहीत, गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच भाज्या, केरोसिन महाग झाले आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झाले याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत. श्रीराम जरूर म्हणा परंतु राम नाम सत्य है बोलायला लावू नका असेही आव्हाड म्हणाले.

भाजी, चिकन घ्यायला गेलात तरी ईडीला कळवतील, संजय राऊत यांचा भाजपला टोला

भाजी, चिकन घ्यायला गेलात तरी ईडीला कळवतील, संजय राऊत यांचा भाजपला टोला

मुंबई : महाविकास आघाडीच्या सगळ्या मंत्र्यांनी मविआतील प्रत्येक घटकाचं जाणीवपूर्वक ऐकलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे अशी भूमिका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.



मंगळवारी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यामध्ये त्यांना सोमवारी शिवसेनेच्या खासदारांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. सरकार 3 पक्षाचे आहे एका पक्षाचे नाही. आपण एका पक्षाचे पालकमंत्री असलो तरी खाली अन्य दोन पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्षे राजकीय काम करत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे राऊत यांनी म्हटले आहे. तुमच्या बोलण्याचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे का ? असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी म्हटले की, हा इशारा सगळ्या पालकमंत्र्यांसाठी आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे खासदार विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंवाद दौऱ्यासाठी गेले होते. जिल्हा परिषदेच्या 'गटा'पर्यंत ते पोहोचले होते. या दौऱ्यात शिवसेना खासदारांनी संघटनात्मक बांधणीबाबतची माहिती गोळा केली असून त्यांनी त्याबाबतचे अहवाल तयार केले आहेत. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे सगळ्या खासदारांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या संघटनात्मक त्रुटींबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. काही ठिकाणी अधिक मजबुतीने काम करावं लागेल आणि सरकार म्हणून सामान्य शिवसैनिकापर्यंत पोचावं लागेल असं राऊत यांनी म्हटलं आहे. हे सरकार माझं आहे, आपलं आहे असं शिवसैनिकाला वाटलं पाहिजे, असे ते पुढे म्हणाले. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की , 'आज परिस्थिती अशी दिसते की दुसऱ्या पक्षाचा पालकमंत्री हा अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतो. या तक्रारी कॉमन आहेत. त्यावर एकत्र बसून सूचना द्याव्या लागतील. सरकार 3 पक्षाचे आहे एका पक्षाचे नाही. आपण एका पक्षाचे पालकमंत्री असलो तरी खाली अन्य दोन पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्षे राजकीय काम करत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा सगळ्या पालकमंत्र्यांसाठी इशारा आहे.'

भाजी,चिकनवरही भाजपचं लक्ष

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील जनतेलाही ईडीची धमकी दिली होती. एका शिक्षण संस्थेतील विद्यार्थी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेत असून पेटीएमद्वारे मतदारांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करून मत विकत घेतले जाणार असल्याचा आरोप पाटील यांनी महाविकास आघाडीवर केला होता. पाटील एवढय़ावरच थांबले नाहीत तर तुमच्या खात्यात प्रतिव्यक्ती एक हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचे आढळल्यास तुमचीही ईडीकडून चौकशी करायला लावू. तेव्हा महाविकास आघाडीला मत दिलेत तर याद राखा, अशी धमकी पाटील यांनी मतदारांना दिली होती. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात पैसे जपून खर्च करा. तुम्ही भाजी जरी विकत घ्यायला गेला तरी भाजपचं तुमच्यावर लक्ष आहे. चिकनच्या दुकानाच्या रांगेत गेला तर काल किती चिकन घेतलं, आज किती घेतलंत यावरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे. ते ताबडतोब ईडीला कळवतील. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं सावध राहायला हवं.'

भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांच्या सूचना

भाजपने मशिदीवरील भोंग्यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्यामध्येही भोंगे उतरलेले नाही. गोवा, उत्तर प्रदेशातही मशिदीवरील भोंगे आहे तसे आहेत. महाराष्ट्रात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांसदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून त्यांचं पालन होणं गरजेचं आहे असे राऊत यांनी सांगितले.

Friday, April 1, 2022

ठाण्यात नववर्ष स्वागत यात्रेची कोरोनाने रोखलेली परंपरा पुन्हा सुरू होणार; ज्येष्ठ नागरिकही सहभागी होणार

ठाण्यात नववर्ष स्वागत यात्रेची कोरोनाने रोखलेली परंपरा पुन्हा सुरू होणार; ज्येष्ठ नागरिकही सहभागी होणार

ठाणे: गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची उत्तम परंपरा ठाण्यात आहे. कोरोनामुळे त्यात खंड पडला.

परंतु, यावर्षी ही परंपरा पुन्हा सुरू होत आहे. स्वागत यात्रेच्या तयारीकरिता वेळ कमी असला, तरी ठाणेकरांचा उत्साह प्रचंड आहे, अशा भावना यंदाच्या स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केल्या. एका बाजूला नववर्षाचे स्वागत करूया आणि दुसऱ्या बाजूला कोरोना कायमचा गायब होईल अशी प्रार्थना करूया, असेही ते म्हणाले. स्वागत यात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेच्या तयारीकरिता श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित शेवटची सभा सोमवारी रात्री ज्ञानकेंद्र सभागृहात पार पडली. यावेळी डॉ. काकोडकर उपस्थित होते. ते म्हणाले की, शोभायात्रेपेक्षा स्वागत यात्रा हे जास्त सयुक्तिक वाटते. यावर्षी स्वागत यात्रेचे अप्रूप आहे. विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यक्रम सुरू असतात त्याचे एकरुप या स्वागत यात्रेत ठाणेकरांना पाहायला मिळेल. यात थोडासा भाग विज्ञानाचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एखादा समाज किती प्रगल्भ आहे याचे मोजमाप त्या समाजाची सांस्कृतिक परंपरा, खाद्यसंस्कृती, पूजाअर्चा आणि सण साजरा करण्याची पद्धती यावरून करता येते. स्वागतयात्रेत ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे इस्रोला वैज्ञानिक प्रगतीसाठी कोटी कोटी प्रणाम अशा आशयाचा बँनर लावून स्वत: ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार आहेत.

स्मित संस्थेतर्फे वृद्ध, अपंग आणि बेघर यांचे प्रश्न मांडले जाणार आहेत. तेली समाजाच्या वतीने पायी वारी असणार आहे. भारतीय मराठा महासंघ गजानन महाराज चौक येथे पालखीचे स्वागत करणार आहे. तसेच, स्वागत यात्रेदरम्यान कुठेही कचरा दिसला तर तो कचरा उचलणारा ट्रक यात्रेत सहभागी होणार आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ग्रंथयान, राज्याभिषेक समारोह समितीतर्फे संभाजीमहाराजांना श्रद्धांजली वाहणारा चित्ररथ, सरस्वती शाळेचे दोन प्रकल्प यात्रेत सहभागी होऊन डॉ. काकोडकर यांना मानवंदना दिली जाणार आहे. पर्यावरण दक्षता मंडळाचा 'फुलपाखरू' विषयावर चित्ररथ असेल. विविध चित्ररथ, संस्था यात्रेत सहभागी होणार आहेत.

Wednesday, March 30, 2022

Loan to Prisoners : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कैद्यांना वैयक्तिक कर्ज देणार!

Loan to Prisoners : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कैद्यांना वैयक्तिक कर्ज देणार!

मुंबई : महाराष्ट्र सरकारने तुरुंगातील कैद्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. कारागृहात केलेल्या कामाच्या मोबदल्यात कैद्यांना हे कर्ज दिलं जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्जासाठी 7 टक्के व्याज आकारणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी (29 मार्च) दिली. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु होणार आहे.

या प्रकारच्या कर्जाला खावटी कर्ज असे म्हणतात आणि या योजनेबाबतचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. यासाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. वैयक्तिक बाँडवर त्याचे वितरण केले जाईल. कमाई, कौशल्य, रोजंदारी या आधारावर बँक रक्कम ठरवेल. सुमारे 1,055 तुरुंगातील कैद्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. ते त्याचा वापर वकिलाची फी भरण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी करु शकतात.

देशातील हा पहिलाच प्रकार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, "या कर्जामुळे कौटुंबिक बंध मजबूत होण्यास मदत होईल, कारण यामुळे कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळेल."

अनेक कैदी दीर्घ कारावास भोगत आहेत. यातील बहुतांश कैदी हे कुटुंबातील कमावते सदस्य आहेत. त्यांनाच दीर्घकाळ तुरुंगात राहावे लागते, परिणामी त्यांचे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ होऊन कुटुंबात नैराश्य आणि अपराधीपणाची भावना निर्माण होते. शिवाय तुरुंगात गेलेली व्यक्ती आपल्या कौटुंबिक कर्तव्यात कमी पडली, अशी भावनाही कुटुंबात निर्माण होते. अशा परिस्थितीत, एखाद्या कैद्याला त्याच्या कुटुंबाच्या गरजांसाठी कर्ज दिल्याने कुटुंबाची सहानुभूती आणि कैद्याबद्दलचं प्रेम वाढण्यास मदत होईल.

दरम्यान कैद्याची कर्ज मर्यादा, शिक्षेचा कालावधी, अपेक्षित सवलत, वय, अंदाजे वार्षिक कामकाजाचा दिवस, किमान दैनंदिन उत्पन्न या आधारे कर्जाची सुविधा निश्चित केली जाईल. या प्रकारच्या कर्जासाठी जामीनदाराची आवश्यकता नाही. संबंधित कैद्याला कोणतेही पैसे न देता आणि केवळ वैयक्तिक हमीवर कर्ज दिले जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कर्जाची रक्कम संबंधित कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्या वकिलांची फी भरण्यासाठी किंवा इतर कायदेशीर बाबींसाठी वापरली जाईल याची खात्री करण्यासाठी कर्ज देणारी बँक पूर्णपणे जबाबदार असेल. तसेच कर्जाच्या परतफेडीतून बँकेने वसूल केलेल्या रकमेपैकी 1 टक्के रक्कम दरवर्षी कैदी कल्याण निधीला दिली जाईल

लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरते; सत्ता काय असते हे बघितलंय- प्रणिती शिंदे

लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरते; सत्ता काय असते हे बघितलंय- प्रणिती शिंदे

सोलापूर- माझे वडील हे देशाचे गृहमंत्री, ऊर्जामंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते.

लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरते आणि सत्ता काय असते हे मी बघितलं आहे. त्यामुळे सत्तेसाठी मी राजकारणात आलेली नाही, असं विधान काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात केलं.

सोलापुरातील यंत्रमाग धारक संघाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलतं होत्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळेल असे अंदाज लावले जातं होते, मात्र, त्यांच्या पदरी अद्याप मंत्रिपद पडलेलं नाहीये, त्याअनुषंगाने त्यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झालं आहे.

राजकारणात येण्याअगोदर माझं काम हे सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात होत. मात्र,मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ निवडला, आणि हे माझ्या वडिलांना सुद्धा माहिती नव्हतं. त्यांनी राजकारणात येण्यास आणि निवडणूक लढवण्यास विरोध केला. पण मला माझ्या समाजकारणातील क्षेत्र वाढवायचं होत, असं प्रणिती शिंदे यांनी सांगितलं.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पवात्यांचं राजकारण चालू होतं, आणि हे बदलण्यासाठी मी राजकारणात आले, मला टक्केवारी, कमिशनचं राजकारण अजून ही जमत नाही, असंही प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

Monday, March 28, 2022

मन जोडण्या ऐवजी मन तोडण्याचे काम सुरु आहेकाश्मीर फाईलवरून शरद पवार यांचा भाजपला टोला

मन जोडण्या ऐवजी मन तोडण्याचे काम सुरु आहे
काश्मीर फाईलवरून शरद पवार यांचा भाजपला टोला 

मुंबई : विरोधकांनी टीका जरूर करावी. तो त्यांचा अधिकार आहे. टीका करताना त्यात द्वेष नसावा. मात्र अलीकडे जे पाहायला मिळत आहे त्यावरून राजकारण चुकीच्या दिशेला जातंय की काय, असं वाटायला लागलंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला.

माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हडपसर येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, कश्मीरमधील एक घटक निघून गेला. त्यावरील सिनेमावर पंतप्रधानांकडून भाष्य केले जाते. या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा गांधींवर टीका टिप्पणी केली जाते. मतभेद जरूर असावेत. मात्र परस्परांबाबत सन्मान असणे गरजचे आहे. भविष्यासाठी हे द्वेषाचे चित्र घातक आहे. महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी देशाला फक्त स्वातंत्र्य दिले नाही तर देशाला दिशा दिली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी देशाला महत्त्व प्राप्त करून देण्याचं काम केलं. आज आपल्याला देशाला एकसंघ ठेवायचं आहे. येथे द्वेष कामाचा नाही. असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

भाजपच्या सत्ता काळात पंडित कश्मीर बाहेर पडले

कश्मीरमधून हिंदू पंडित बाहेर पडले त्यावेळी सत्तेत काँग्रेस पक्ष नव्हता. त्यावेळी व्ही.पी. सिंग यांची सत्ता होती. भाजपचा तत्कालीन सरकारला पाठिंबा होता. म्हणजे भाजपच्या सत्ता काळात कश्मिरी पंडित कश्मीरमधून बाहेर पडले. त्यावर एक सिनेमा आलाय, काँग्रेसवर टीका झाली आहे. मन जोडण्याऐवजी मन तोडण्याच काम चाललय. समाजात द्वेष पसरवला जातेय. हे चित्र घातक आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केली.

कोरोनापेक्षा राजकारण भयंकर, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांची सध्याच्या राजकारणावर नाराजी

कोरोनापेक्षा राजकारण भयंकर, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांची सध्याच्या राजकारणावर नाराजी

ठाणे (प्रतिनिधी ) : ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी सध्या सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. त्यांनी सध्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनापेक्षा राजकारण भयंकर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. राजकारण भयंकर आहे, कोरोनावर मात केली आपण, पण राजकारणावर मात करणे शक्य नसल्याचे  मधू मंगेश कर्णिक म्हणालेत.

सध्याच्या राजकारणाची पातळी खालावली आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मधू मंगेश कर्णिक यांच्या प्राप्तकाल या कादंबरीचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्णिक यांनी चिंता व्यक्त केली. सध्या जी माणसं त्या पद्धतीनं राजकारण करत आहेत, असं मी माझ्या 90 वर्षाच्या आयुष्यात कधी पाहिलं नाही. असं पाहिल्यावर दु:ख होतं. असचं चाललं तर पुढचं आयुष्य कसं जाईल असेही कर्णिक यावेळी म्हणाले. सध्या राजकारणी एकमेकांची उणीदूणी काढत आहेत. तुम्ही राज्यकारभार केव्हा करणार? हा माझा प्रश्न असल्याचे मधू मंगेश कर्णिक म्हणाले.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...