Wednesday, September 22, 2021

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचं विधान

 सातारा: आपल्या बिनधास्त आणि बेधडक विधानांमुळे प्रसिद्ध असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी आता अजब विधान केलं आहे. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते, असं अजब विधान उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.



त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (mp udayanraje bhosale statement on coronavirus)

खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरोना विषयी पुन्हा एकदा एक अजब वक्तव्य केल आहे. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज साताऱ्यात माध्यमांना दिली. आपल्याला कोराना होता का नाही हे माहीत नाही पण ताप असताना सुद्धा मी गार पाणी प्यायचो. त्यामुळे माझा खोकला वाढला आणि कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोणी काळजी करू नका. मला कोरोना झाला तेव्हा किती लोकांनी देव पाण्यात ठेवले मला माहीत नाही. पण, आज मी तुमच्यासमोर उभा आहे, असा मिश्किल टोला उदयनराजे यांनी लगावला.


ऑगस्टमध्ये कोरोनाची लागण


दरम्यान, ऑगस्टमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे संसदेचं अधिवेशन सोडून उदयनराजे साताऱ्यात परतले होते. दरम्यानच्या काळात उदयनराजे यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील 3 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर उदयनराजे भोसले पुन्हा एकदा सक्रिय झाले असून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

नितीन गडकरी 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

नवी दिल्ली | अलिकडे काही दिवसांमध्ये रस्त्यावरील अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवर्षी कित्येक लोकांना अपघातामुळे आपल्या प्राणाला मुकावं लागतं.

रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत.



व्यावसायिक वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताबद्दल गडकरींनी चिंता व्यक्त केली आहे. व्यावसायिक वाहनांच्या वेळा निश्चित असायला हव्यात. तसेच व्यावसायिक वाहनाच्या चालकाला झोप येत असल्यास त्याची माहिती देणारं एक सेन्सर गाड्यांमध्ये बसवण्यात यावं, अशी भूमिका गडकरी यांनी मांडली आहे. गडकरींनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.


व्यावसायिक वाहनांमध्ये सेन्सर लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गाड्यांमध्ये बसवले जाणार हे सेन्सर रात्रीच्या वेळी अतिशय महत्वाचे ठरणार आहेत. वाहन चालकाला झोप येत असल्यास या सेन्सरमुळे माहिती मिळेल, असं गडकरींनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


तसेच पायलटसाठी विमान चालवण्याचे तास ठरलेले असतात. पायलटप्रमाणेच ट्रक चालकांसाठी देखील वाहन चालवण्याचे तास निश्चित करायला हवेत. असं केल्यास चालक दमल्यामुळे जे अपघात होतात त्याची संख्या कमी होईल, असं मत गडकरींनी मांडलं आहे.

Tuesday, September 21, 2021

नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चाैधरी हाेणार नवे वायुसेना प्रमुख

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी (V. R. Chaidhary) हे भारतीय वायुदलाचे नवीन प्रमुख (एअर चीफ मार्शल) असतील.

भारतीय वायुदलाचे विद्यमान प्रमुख आर. के. एस. भदौरिया हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी विवेक चौधरी यांची एअर चीफ मार्शल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.



देशाचे नवे एअरचीफ मार्शल विवेक चौधरी हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा या छोट्याशा गावाचे रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्याच्या मिल्ट्री स्कुलला गेले. 


विवेक चौधरी यांचे आजोबा हदगाव तालुक्यातील कोळी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. विवेक यांचे काका दिनकर आणि रत्नाकर हे सध्या नांदेडला वास्तव्याला आहेत.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा 'लेटर वॉर'; भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला उद्धव ठाकरेंचं खरमरीत उत्तर

मुंबई, 21 सप्टेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यात पुन्हा एकदा लेटर वॉर (Letter war) सुरू झाल्याचं दिसत आहे.

मुंबईतील साकीनाका येथे झालेला सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तसेच महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन विशेष अधिवेशन बोलवण्याच्या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून रोखठोक उत्तर दिलं आहे. (CM Uddhav Thackeray replies Governor via letter) मुख्यमंत्र्यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं? महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या काळजीपोटी आपण पाठविलेले पत्र मिळाले. राज्यातील महिला असुरक्षित आहेत, असा आपला एकंदरीत सूर दिसतो.



विशेषतः साकीनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय महिला मंडळांची शिष्टमंडळे राजभवनावर आपल्या भेटीस आली. त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना असल्याने याबाबत विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून चर्चा करावी, अशा आपल्या भावना आहेत. मी आपल्या भावना समजू शकतो. आपण आज महाराष्ट्र राज्याच्या घटनात्मक प्रमुख पदावर आहात.


आपला पिंड राजकीय कार्यकर्त्याचा आहे. कायदा सुव्यवस्था, महिलांचे हक्क, रक्षण ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीच असते. या संसदीय प्रथा-परंपरांच्याच जाहीर चौकटीतून आपणही गेलेले आहात. त्यामुळे आम्हाला आपल्या अनुभवांचा नेहमीच फायदा झाला आहे.


साकीनाका परिसरात एका अबलेवर अत्याचार करून एका नराधमाने तिची हत्या केली. पोलीस घटनास्थळी फक्त दहा मिनिटांत पोहोचले व त्वरीत आरोपीस बेड्या ठोकल्या. मुख्यमंत्री म्हणून मी तत्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीडित महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळण्याबाबत भूमिका घेतली. सदर खटला जलदगतीने चालवून नराधमास कायद्याने कठोर शासन केले जाईल.


महिलांची सुरक्षा सर्वतोपरी असावी यासाठी कायदेशीर सर्व उपाययोजना करा अशा सक्त सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनला निर्भया पथके स्थापन करण्याच्या योजनेस गती मिळत आहे. सरकार सरकारचे काम करीत आहे. त्यामुळे आता विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावून चर्चा घडविण्याची आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते, सरकारविरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना मा.


राज्यपाल महोदयांनी त्याच सुरांत सूर मिसळून तीच मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे. महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारख्या घटना राज्य देश व समाजालाच कलंकित करतात, याची जाणीव मला आहे. साकीनाक्यातील घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार कठोर पावले टाकत आहे. पण महिलांवरील वाढते अत्याचार व हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर त्या पातळीवरच चर्चा व्हायला हवी. गेल्या काही वर्षांत दिल्लीतील महिला अत्याचारांत कमालीची वाढ झाली.


जगात दिल्लीची बदनामी झालीच व बलात्काराची राजधानी अशी नाचक्की झाली. दिल्लीची कायदा सुव्यवस्था हा केंद्राचा विषय आहे. हे खास नमूद करण्याची गरज नाही. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मागच्याच महिन्यात घडलेली अत्याचाराची घटना तर मन सुन्न करणारी आहे.


९ वर्षांच्या एका दलित मुलीवर स्मशानभूमीत सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणात आरोपी असलेला एक पुजारी व त्याच्या तीन साथीदारांचे क्रौर्य इथेच थांबले नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी मारेकऱ्यांनी पीडित मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कारही केले. देशाचे अख्खे मंत्रिमंडळ ज्या शहरात बसते, तेथील ही घटना आहे. भाजपची सत्ता असलेल्या बिहारातील अशाच एका घटनेकडे देखील मी आपले लक्ष वेधू इच्छितो.


तेथील एका खासदाराने आपल्या पक्षाच्या महिला कार्यकर्तीवर बलात्कार केला. खासदाराच्या अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी पीडित महिला पोलिसांकडे गेली, पण तिला न्याय मिळाला नाही. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव होता. अखेर तब्बल तीन महिन्यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित खासदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.


महाराष्ट्रातील दुदैवी घटनेत पोलिसांनी केलेली तत्पर कारवाई आणि भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील उपरोक्त घटना याची तुलना आपणच करावी. उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहात आहे. आपण सगळेच प्रभू श्रीरामांचे भक्त आहोत. श्रीरामांनी महिलांचे रक्षण, सुरक्षा यासाठी धनुष्यबाण नेहमीच सज्ज ठेवला.


पण त्या 'रामराज्या'त महिला खरोखरच सुरक्षित आहेत काय? उत्तर प्रदेशात एका महिला खो खो खेळाडूवर बलात्कार व हत्येच्या प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. बिजनोरमध्ये रेल्वे स्थानकावर या पीडित मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. १० सप्टेंबरला दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नोकरीसाठी मुलाखत देऊन येताना रेल्वे स्थानकावरच ही घटना घडली.


आरोपीने या मुलीवर बलात्कार केला व तिला ठार केले. उत्तर प्रदेशातील हाथरस, उनावमधील बलात्कार व अत्याचारांच्या घटनांनी अनेकदा देशाला धक्का बसला आहे. बदायू जिल्ह्यातील दोन चुलत बहिणींवर बलात्कार करून त्यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद तर संयुक्त राष्ट्रात उमटले होते. उत्तर प्रदेशात महिलांवरील अशा प्रकारच्या अत्याचारांत वाढ होत असल्याचे NCRB चे म्हणणे आहे.


पण यावर तेथे विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून चर्चा करावी अशी मागणी तेथील भाजपने केल्याचे दिसत नाही. जम्मू-कश्मीरमधील कश्मिरी पंडितांच्या माय-भगिनींना नराधमांच्या अत्याचाराचे नेहमीच शिकार व्हावे लागले. त्यांच्यावरील अत्याचार तालिबान्यांच्या नराधमी कृत्यांना लाजविणारे आहेत, पण जम्मू-कश्मीरात भाजपचे सरकार असताना या प्रश्नी ना विशेष अधिवेशन बोलावले ना कधी गांभीर्याने चर्चा केली. उत्तराखंड ही तर देवभूमीच म्हणावी लागेल.


आपण स्वतः या देवभूमीचे सुपूत्र आहात. मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे नेतृत्व आपण केले आहे. उत्तराखंडच्या देवभूमीचा महिलांवरील अत्याचारांचा आलेखदेखील चढता आहे. देवभूमीत महिलांवरील अत्याचारांत दीडशे टक्क्यांनी वाढ झाल्याचे सरकारी आकडेच सांगत आहेत.


हरिद्वार, डेहराडूनसारख्या शहरांत महिलांवरील बलात्कार, हत्येचे गुन्हे सतत वाढत आहेत. हुंडाबळी, महिलांच्या अपहरणाचे गुन्हेही वाढत आहेत. यावर काय उपाय योजना करावी बरे? तेथेही विधिमंडळाचे खास सत्र बोलवू शकतो काय ? महाराष्ट्राचे जुळे भावंड असलेल्या गुजरातशी आमचे एक भावनिक नाते आहे, पण गुजरात मॉडेलमध्ये महिला खरेच सुरक्षित आहेत काय?


गुजरात पोलिसांच्या रिपोर्टनुसारच रोज १४ महिलांवर बलात्कार, यौन शोषणसारख्या अत्याचारांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही काळात अहमदाबादमधून २९०८ महिला बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत गुजरातमधून १४ हजार २२९ महिला बेपत्ता झाल्या. २०१५ सालापासून गुजरातमध्ये महिलांवरील निर्घृण अत्याचारांनी टोक गाठले आहे.


१७ एप्रिल २०२१ रोजी अहमदाबादमधून एका २५ वर्षांच्या महिलेस पळवून बलात्कार व हत्या करण्यात आली. या महिलेवर सामुदायिक बलात्कार केल्याचे पोस्टमार्टेम अहवालात सिद्ध झाले. मेहसाणा, राजकोट, वडोदरा, अहमदाबाद ग्रामीण, छोटा उदयपूर, सूरत ग्रामीण, जामनगर, पाटण भागातील महिलांवरील बलात्कार व अत्याचाराचे गुन्हे तसेच आकडे धक्कादायक आहेत. आकडे सांगतात, गुजरातमध्ये रोज ३ बलात्काराच्या घटना घडतात.


यावर चर्चा करायची म्हटले तर गुजरात विधानसभेत एक महिन्याचे विशेष अधिवेशनच बोलावावे लागेल. साकीनाक्यातील घटनेने मा. राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. हीच चिंता आम्हालाही आहेच.


हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी मा. राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी. त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल.


महाराष्ट्र हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. छत्रपतींनी त्यांच्या हिंदवी स्वराज्यात महिलांच्या सुरक्षेस नेहमीच प्राधान्य दिले. हे नव्याने सांगायला नको, स्वराज्यातील तसेच शत्रूंच्या स्त्रियांचाही छत्रपती शिवरायांनी योग्य तो आदर ठेवला आणि त्यांना सन्मानाने वागवले. त्याचबरोबर स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांची त्यांनी कधीच गय केली नाही. महाराष्ट्राचे सध्याचे सरकार शिवरायांच्या त्याच परंपरेची पताका घेऊन पुढे निघाले आहे. राज्यपाल तसेच वडिलधारे म्हणून आपले आशीर्वाद आम्हाला मिळावेत, ही अपेक्षा.

कर्नाटकात सर्वाधिक बालविवाहांची नोंद

बेंगळुरू - देशात कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे 185 बालविवाहांची नोंद 2020 या वर्षात झालेली आहे. 2019 च्या तुलनेत या राज्यात बालविवाहांमध् तब्बल 66 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

कर्नाटकनंतर आसाम (138), पश्चिम बंगाल (98), तमिळनाडू (77), तेलगंणा (62) या राज्यांमध्ये 2020 या वर्षात बालविवाहांची लक्षणीय नोंद झालेली आहे.



कर्नाटकातील महिला व बालकल्याण खात्याच्या माहितीनुसार फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत म्हणजेच करोनाची लाट तीव्र असतानाच्या काळात राज्यात 2,074 बालविवाह रोखण्यात आले आहेत.


सर्वाधिक म्हणजे बळ्ळारी जिल्ह्यात 218 बालविवाह रोखण्यात आले तर म्हैसूर (177), बेळगाव (131) बालविवाह रोखण्यात आले. याच कालावधीत बेंगळुरू शहरामध्ये 20 बालविवाह रोखण्यात आले.


वय लपवण्यासाठी मुलींची दोन आधारकार्डे 


फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2020 या काळात राज्यभरात बालविवाह प्रकरणी 108 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती चाईल्डलाईनच्या समन्वयक सी. एन. नागमणी यांनी दिली आहे. अनेकदा लग्न उरकल्यानंतर बालविवाह असल्याचा आणि कायदेशीर हस्तक्षेप करण्याची मागणी करणारे फोन येतात, असे त्या म्हणाल्या. त्यासाठी त्यांनी एका 16 वर्षाच्या मुलीचे उदाहरण दिले.


तिच्या कुटुंबियांनी सक्तीने तिचे लग्न लावून दिल्यानंतर रविवारी तिने हेल्पलाईनवर फोन करून माहिती दिली. मग हेल्पलाईनचे कर्मचारी ती मुलगी तिच्या मैत्रिणीकडे रहात होती तिथे गेले आणि तिला पुनर्वसन केंद्रात पाठवले. बेंगळुरूमधील या मुलीचे लग्न दोन महिन्यांपूर्वी म्हैसूरमधील पुरूषाशी करून देण्यात आले होते. त्या मुलीला पुढे शिकायचे होते. त्यामुळे ती म्हैसूरहून बेंगळुरूला पळून आली आणि मैत्रिणीच्या घरी रहात होती.

Monday, September 20, 2021

तुळजाभवानीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणारे धार्मिक व्यवस्थपक अखेर अटकेत

 सोलापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे, गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल 1 वर्ष फरार होता मात्र अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.



तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याचा ताब्यात असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 348.661 ग्रॅम सोने व सुमारे 71698.274 ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच 71 प्राचीन नाणे यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . तत्कालीन जिल्हाधिकारी मुधोळ यांची बदली झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिल्यावर रविवार, 13 सप्टेंबर 2020 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिल्याने तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी विरोधात फसवणूक गुन्हा दाखल केला होता.

रशियन पर्म युनिवर्सिटीच्या अंधाधुंद गोळीबारात ८ ठार तर १४ जखमी

रशियाच्या पर्म युनिवर्सिटीमध्ये एका अज्ञात माथेफिरूने अंधाधुंद गोळाबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात तब्बल ८ जणांचा मृत्यू झाला तर जवळपास १४ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

या गोळीबारानंतर अनेकांनी आपला जीव वाचण्यासाठी पळापळ सुरु केली. अनेक विद्यार्थ्यांनी युनिवर्सिटीच्या इमारतीच्या मजल्यांवरून उड्या मारत आपली सुटका करुन घेतली. मात्र बहुतांश विद्यार्थी जखमी झाले आहेत. रशिया टुडेच्या माहितीनुसार, सोमवारी रशियन शहर पर्ममधील युनिवर्सिटी परिसरात एका बंदूकधारी व्यक्तीने अंधाधुद गोळीबार केला होता. ज्य़ात ८ जणांचा मृत्यू झाला तर सहा जखमी झालेत. मात्र हल्ल्य़ानंतर १४ पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.



सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये गोळीबारानंतर बिथरलेल्या अवस्थेतील विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उड्या मारताना दिसत आहे. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या घेत याठिकाणाहून पळ काढला.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...