बेंगळुरू - देशात कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे 185 बालविवाहांची नोंद 2020 या वर्षात झालेली आहे. 2019 च्या तुलनेत या राज्यात बालविवाहांमध् तब्बल 66 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
कर्नाटकनंतर आसाम (138), पश्चिम बंगाल (98), तमिळनाडू (77), तेलगंणा (62) या राज्यांमध्ये 2020 या वर्षात बालविवाहांची लक्षणीय नोंद झालेली आहे.
कर्नाटकातील महिला व बालकल्याण खात्याच्या माहितीनुसार फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत म्हणजेच करोनाची लाट तीव्र असतानाच्या काळात राज्यात 2,074 बालविवाह रोखण्यात आले आहेत.
सर्वाधिक म्हणजे बळ्ळारी जिल्ह्यात 218 बालविवाह रोखण्यात आले तर म्हैसूर (177), बेळगाव (131) बालविवाह रोखण्यात आले. याच कालावधीत बेंगळुरू शहरामध्ये 20 बालविवाह रोखण्यात आले.
वय लपवण्यासाठी मुलींची दोन आधारकार्डे
फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2020 या काळात राज्यभरात बालविवाह प्रकरणी 108 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती चाईल्डलाईनच्या समन्वयक सी. एन. नागमणी यांनी दिली आहे. अनेकदा लग्न उरकल्यानंतर बालविवाह असल्याचा आणि कायदेशीर हस्तक्षेप करण्याची मागणी करणारे फोन येतात, असे त्या म्हणाल्या. त्यासाठी त्यांनी एका 16 वर्षाच्या मुलीचे उदाहरण दिले.
तिच्या कुटुंबियांनी सक्तीने तिचे लग्न लावून दिल्यानंतर रविवारी तिने हेल्पलाईनवर फोन करून माहिती दिली. मग हेल्पलाईनचे कर्मचारी ती मुलगी तिच्या मैत्रिणीकडे रहात होती तिथे गेले आणि तिला पुनर्वसन केंद्रात पाठवले. बेंगळुरूमधील या मुलीचे लग्न दोन महिन्यांपूर्वी म्हैसूरमधील पुरूषाशी करून देण्यात आले होते. त्या मुलीला पुढे शिकायचे होते. त्यामुळे ती म्हैसूरहून बेंगळुरूला पळून आली आणि मैत्रिणीच्या घरी रहात होती.